esakal | पर्यावरण : निसर्ग काय सांगू पाहतोय? 
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण : निसर्ग काय सांगू पाहतोय? 

भारतातील 68 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसल्याचे "इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. अलीकडेच भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुमारे 550 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पर्यावरण : निसर्ग काय सांगू पाहतोय? 

sakal_logo
By
योगीराज प्रभुणे

महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपले जात आहे. आपण आता प्रत्यक्ष अनुभवत असलेली ही घटना आपल्याला भयंकर वाटते. पण, हे निसर्गाने दिलेले इशारे आहेत.त्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. गेल्या सोळा वर्षांपासून वेळोवेळी निसर्गाने आपल्याला इशारा दिला आहे.

भारताच्या पूर्व किनारपट्टीला 26 डिसेंबर 2004 सुनामी धडकली. तेव्हापासून गेल्या सोळा वर्षांत एका पाठोपाठ एक घडलेल्या नैसर्गिक आपत्तींमधून आपण कोणता धडा शिकलो आहोत? 2011मध्ये जपानमध्ये सुनामी आली. 2014मध्ये केदारनाथ जलप्रलय झाला. संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र पाण्याखाली बुडाले. ईशान्य भारताचा बराच भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला. या संपूर्ण घटनांची एक शृंखला आहे. त्याचा तुकड्यांमध्ये अभ्यास करता येणार नाही. त्याकडे एका सलग दृष्टीने पाहिल्यानंतर पर्यावरणाने वारंवार दिलेले इशारे मानवाला समजतील. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातील पावसाकडे पाहिल्यानंतर एकेका प्रश्नांची उकल आपल्या पुढे येते. इतिहासातील सर्वात उष्ण महिना म्हणून या वर्षीच्या सप्टेंबरची नोंद, "कोपर्निकस क्‍लायमेट चेंज सर्व्हिस'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात केली आहे. सप्टेंबर 2019च्या तुलनेत यावर्षी सप्टेंबरमधील तापमान 0.05 अंश सेल्सियस जास्त नोंदविण्यात आले. गेल्या तीस वर्षांत (1981 ते 2010) सप्टेंबरच्या सरासरी तपमानाची तुलना केली गेली, तर यावर्षी तापमान 0.63 अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेले वर्ष हे मानवाच्या इतिहासातील दुसरे उष्ण वर्ष, अशी नोंद जागतिक हवामान संस्थेत झाली आहे. 2019मधील वार्षिक जागतिक तापमान सरासरीपेक्षा 1.1 अंश सेल्सियसने वाढले आहे (1850 ते 1900 चे सरासरी तापमान). आतापर्यंत 2016 हे सर्वाधिक उष्ण वर्ष नोंदले गेले आहे. 2010 ते 2019 या नऊ वर्षांमधील पाच वर्षे उबदार होती, असेही हवामान खात्याच्या विश्वेषणावरून स्पष्ट होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पावसाचं बदलंत कॅलेंडर 
समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांवर होताना दिसत असल्याचे वेगवेगळ्या अभ्यास प्रकल्पांमधून अधोरेखित झाले आहे. भारतातील मॉन्सूनचे कॅलेंडरमध्ये बदल होत असल्याचे आपण अनुभवत आहोत. पावसाच्या सुरवातीपासून ते परतीपर्यंतचा हा बदल सगळ्यांनाच जाणवत आहे. "भारतीय हवामान खात्या'ने परतीच्या पावसाच्या तारखांमध्येही बदल केला आहे. पावसाच्या बदलाचा थेट परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होत आहे. मॉन्सून असो की परतीचा पाऊस, जास्त पडणं हे पिकांसाठी हानिकारकच असते. मराठवाड्यात, विदर्भात इतकंच काय; पण पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधूनही आपल्यात तेच चित्र दिसते. भारतातील 68 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसल्याचे "इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे. अलीकडेच भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये सुमारे 550 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या महिन्याभरातील पुरामुळे लाखो लोक घरातून विस्थापित झाले आहेत. पाऊस वाढत असल्याचे आपण पाहतो. त्याचं कारणही पर्यावरणात दडलयं. तापमान वाढल्याने बाष्पिभवनाची प्रक्रिया वाढते. त्यातून पाण्याची वाफ जास्त तयार होते. त्यातून पर्जन्यमानतेमध्ये लक्षणीय वाढ होते. आर्क्‍टिक समुद्रातील 40 टक्के बर्फ कमी झाल्याचे उपग्रहाच्या निरीक्षणातून हवामान संस्थांनी नोंदवले आहे. गेल्या वर्षांमधील निरीक्षणाच्या या नोंदी आहेत. आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या नैसर्गिक घटना असोत, की दूरवरच्या दुर्गम भागातील निरीक्षण यातून हेच अधोरेखित होते की, निसर्ग वारंवार धोक्‍याचे इशारे देत आहे. त्याची गांभीर्याने नोंद घेऊन मानवाने आपल्या विकासाचे प्रारूप वेळीच बदलले पाहिजे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा