पर्यावरण :  महापुरांचे मूळ 

योगीराज प्रभुणे
Friday, 24 July 2020

पर्यावरण आणि पूर यांचा जवळचा संबंध आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणीय बदल होताना दिसतात. त्याचा थेट परिणाम ऋतूचक्र बदलण्यात होत आहे. देशात गेल्या वर्षभरात हवामानाशी संबंधित 19 मोठ्या घटना घडल्या.

मॉन्सूनच्या आगमनानंतर जूनपासून देशात सर्वदूर नसला, तरी पाऊस सुरू झाला आहे. यंदाच्या पावसाळ्याची सुरवातच "निसर्ग' चक्रीवादळापासून झाली. या चक्रीवादळामुळे कोकणात धुवाधार पाऊस पडलाच, पण मध्य महाराष्ट्रातही दमदार सरी पडल्या. त्यामुळे जूनच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस या काळात मध्य महाराष्ट्र आणि कोकण या हवामान उपविभागांत नोंदला गेला. पण, त्यानंतर दडी मारलेल्या पावसाने अद्यापही म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. त्यामुळे काळजीचे वातावरण आहे. उत्तर आणि ईशान्य भारतात मात्र पावसाने धुमाकूळ घातलेला दिसतो. आसाममधील 90 टक्के जिल्हे पाण्याखाली आहेत. पन्नास हजारांहून अधिक लोकांपुढे मदत छावण्यांच्या आश्रयाला जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही. या घटनेमुळे गेल्या वर्षी पाण्याखाली गेलेल्या सांगली जिल्ह्यातील महापुराची दृष्ये डोळ्यांपुढे येतात. पंचगंगेचे कोल्हापूरमध्ये शिरलेले पाणी, पाण्याखाली गेलेली उभी पिके, वाहून गेलेली घरे, गुरे असे सगळे आठवते. त्यामुळे जून आला की काळजात धस्स होते. 

 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बदलते ऋतूचक्र 
पर्यावरण आणि पूर यांचा जवळचा संबंध आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणीय बदल होताना दिसतात. त्याचा थेट परिणाम ऋतूचक्र बदलण्यात होत आहे. देशात गेल्या वर्षभरात हवामानाशी संबंधित 19 मोठ्या घटना घडल्या. या दुर्घटनांत 1357 जणांचे प्राण गेले. त्यापैकी 63 टक्के पाऊस आणि पूर यांच्याशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या 65 वर्षांपैकी प्रत्येक वर्षात देशातील कोणत्या ना कोणत्या भागात पुराचे थैमान ठरलेले असते. कधी केदारनाथ, कधी सांगली-कोल्हापूर, तर कधी सध्या सुरू असलेला आसाममधील महापूर. दरवर्षी पुरात शेकडो लोकांचा मृत्यू होतो. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1952 ते 2018 या 65 वर्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांतील मिळून दहा लाखांहून अधिक जण मृत्युमूखी पडले आहेत. पुरामुळे 258 दशलक्ष हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. कोट्यवधी घरांची पडझड झाली. या सगळ्यांमुळे हजारो कोटी रुपयांचा फटका देशाला, तसेच नागरिकांना बसला आहे. देशात 2018 मध्ये आलेल्या पुरात 95 हजार 736 कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान 2017 मधील पुराच्या तुलनेत अडीचपट जास्त होते, हे लक्षात घेतले तर महापुरामुळे किती मोठी किंमत मोजावी लागते, हे स्पष्ट होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापुराची बदलती कारणे 
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, नद्यांच्या खोऱ्यात पडणारा मुसळधार पाऊस हे पुराचे एक कारण आहे. भारतातील बहुतांश नद्या गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दुथडी भरून वाहत होत्या. देशातील 25 नद्यांना उच्चांकी पूर आल्याची नोंद झाली. देशात वर्षान्‌वर्षे पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो आणि तो ओसरतोही. पण, गेल्या दशकभरात पुराबद्दल विचित्र काही बाबी समोर येत आहे. या काळात पूर फक्त लवकर आले असे नाही, तर ते दीर्घ काळ टिकून राहिले आहेत. काळजीची गोष्ट म्हणजे आलेले पूर आणि त्या भागात पडलेला पाऊस यांचे प्रमाण प्रत्येक ठिकाणी जुळतेच असे नाही. पुराच्या घटना दिसताना अकस्मात दिसतात, पण त्यांच्या मुळापर्यंत जाऊन नेमक्‍या कारणांचा शोध आता पर्यावरणतज्ज्ञ घेत आहेत. त्यावेळी नदीपात्रांमधील बांधकामे, त्यात जागोजागी केलेली अतिक्रमणे, नदीपात्रांमध्ये उभारलेले अडथळे, नद्यांचे बदललेले प्रवाह ही कारणे पुढे येऊ लागली आहेत. नदी, नाले, ओढे यांच्या नैसर्गिक प्रवाहात केलेल्या घुसखोरीमुळेही महापुराचा फटका बसत असल्याचे दिसते. "नेमेचि येतो पूर... ' हे चित्र लक्षात घेता भविष्यात नदीकाठावरील शहरे, शिवारातील पिके, गोठ्यातील गोधन आणि माणसांचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी नद्यांचा कोंडलेला श्‍वास मोकळा करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षीच्या महापुरातून योग्य तो धडा घेऊन तातडीने पावले उचलण्याची आज गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yogiraj prabhune writes article about Environment and floods