Loksabha 2024 Himachal Pradesh: बंडनाट्यानंतर काँग्रेस मुख्यमंत्र्यांची सत्त्वपरीक्षा, भाजपसाठी हिमाचल लोकसभा प्रतिष्ठेची..

राज्यसभेच्या निवडणुकीने हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सरकारसमोर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. सरकार तरले असले तरी ते टिकवण्यासाठी मुख्यमंत्री सुक्खूंना लोकसभेच्या निवडणुकीत विजय खेचून आणावा लागणार आहे.
himachal pradesh Chief Minister Sukhu have to win Lok Sabha elections 2024
himachal pradesh Chief Minister Sukhu have to win Lok Sabha elections 2024Sakal

दयानंद माने

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या निवडणूक प्रचारयंत्रणेचे प्रमुख अमित शहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा मिळविण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ते सर्व प्रकारच्या मार्गांचा अवलंब करत बारकाईने निवडणूक व्यवस्थापन राबवत आहेत, हे हिमाचल प्रदेशातील सध्याच्या राजकारणाकडे पाहिले असता लक्षात येईल.

देशाच्या राजकीय परिप्रेक्ष्याकडे पाहिल्यास भाजपला उत्तर भारतात अनुकूल, तर दक्षिण भारतात प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे दिसते. अर्थात ते भाजपला नवीन नाही. मात्र उत्तर भारतात एकाही जागेची जोखीम घ्यायची नाही हे भाजप जाणून असल्याने हिमाचल प्रदेशसारख्या चार लोकसभा जागांच्या राज्यालासुद्धा महत्त्व आले आहे. म्हणूनच कंगना राणावतसारख्या तेवढ्याच लोकप्रिय व वादग्रस्त अभिनेत्रीला निवडणूक रिंगणात उतरविले आहे.

निवडणुकीने फिरवले गणित

हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील असे राज्य आहे की, जिथे सत्तेचा लंबक दर विधानसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये फिरतो. १९५२पासून या राज्यात चौदा विधानसभा निवडणुका झाल्या.

सुरुवातीच्या तीन (१९५२ ते १९७२) आणि नंतरच्या १९८२ व १९८५ च्या दोन निवडणुका काँग्रेसने सलग जिंकल्या. १९९० ते २०२२ पर्यंतच्या आठ निवडणुकीत मात्र भाजप व काँग्रेस असा आळीपाळीने सत्ताबदल झाला. विधानसभेच्या चौदापैकी नऊ निवडणुकीत काँग्रेस तर पाचवेळा भाजपला सत्ता मिळाली.

भाजपचे शांताकुमार व प्रेमकुमार धुमल तर काॅंग्रेसचे वीरभद्र सिंह हे राज्यातील महत्त्वाचे नेते. त्यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवत. वीरभद्र सिंह चारवेळा, तर धुमल तीनवेळा मुख्यमंत्री राहिले. सध्या काॅंग्रेसचे सुखविंदरसिंह सुक्खू मुख्यमंत्री असून, त्यांना नाराजीचा सामना करावा लागतो आहे.

त्याचे कारण गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काॅंग्रेसचा झालेला पराभव. येथील राज्यसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. जो पक्षासाठी धक्कादायक ठरला. कारण राज्यात काँग्रेसचे सरकार, त्याचे ४० आमदार व तीन अपक्षांचे समर्थन प्राप्त असतानाही काॅंग्रेसची सहा व अपक्षांची नऊ मते फुटून भाजपचे उमेदवार हर्ष महाजन निवडून आले.

सिंघवी आणि महाजन यांना समसमान (३४-३४) मते मिळाल्याने टाॅसवर झालेल्या निवडीत सिंघवींचा पराभव झाला. भाजपने देशभरात प्रत्येक निवडणुकीत अवलंबलेल्या कूटनितीचा हा परिणाम आहे. या फुटलेल्या आमदारांना भाजपचे समर्थन होते.

तसेच विधानसभेत कटमोशन व अर्थसंकल्पावरील मतदानापासूनही हे आमदार दूर राहिल्याने या सहा बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतर्गत विरोधी कायद्याचा आधार घेत अपात्र ठरवले. या सहा आमदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र निवडणूक आयोगाने या सहाही ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

भाजपची जोरदार तयारी

या घडामोडीनंतर आपल्या सरकारच्या आमदारांवर मुख्यमंत्री सुक्खू यांचा वचक नाही. परिणामी त्यांनी राजीनामा देऊन पायउतार व्हावे, म्हणून सुक्खूविरोधी गट सक्रिय आहे. पक्षश्रेष्ठींनी यावर समन्वय समिती नेमल्याने वादावर पडदा पडला आहे.

लोकसभेच्या निवडणुकांचे कारण देत सुक्खू यांना तीन महिन्यांंचा अवधी दिला आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या चार आणि विधानसभांच्या सहा जागांची निवडणूक सुक्खू यांच्यासाठी सत्वपरीक्षाच आहे. निवडणुकीतील यशापयशावर त्यांच्या पदाचा फैसला होईल.

या पार्श्वभूमीवर सुक्खू यांनी पक्षाची डागडुजी प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह, मंत्री विक्रमसिंह व सहकाऱ्यांच्या मदतीने चालवली आहे. कालच त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन प्रचाराचे नियोजन केले आहे.

दुसरीकडे भाजपने पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या या राज्यातील चारही लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. कांगडातून डॉ. राजीव भारद्वाज, मंडीतून अभिनेत्री कंगना राणावत, हमीरपूरमधून केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर तर सिमल्यातून सुरेशकुमार कश्यप हे उमेदवार आहेत.

मागच्या तीन लोकसभा निवडणुकीत मंडी वगळता उर्वरित तिन्हीही मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. मंडी हा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचा मतदारसंघ. २०२१च्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी व प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह निवडून आल्या होत्या. ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केल्याने कंगना राणावत यांना रिंगणात उतरवले आहे.

त्यांनी प्रचारही धडाक्यात सुरू केला आहे. अनेक विषयांवर अत्यंत टोकाची मते व्यक्त केलेली ही अभिनेत्री आपल्या काही वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत येते काय, असा तिच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न होता. तो तिने निकाली काढला आहे. मात्र मैदान अजून बरेच दूर आहे.

श्रीनेत यांची हुकली उमेदवारी

हिमाचल प्रदेशात १ जून रोजी मतदान आहे. तोपर्यंत कंगना देशभरातील भाजपच्या प्रचारात सहभागी होऊ शकतात. कंगना यांच्या मंडीतील रोड शोवर टीका करताना काॅंग्रेसच्या प्रवक्त्या व सोशल मीडिया विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी असभ्य भाषेत टीका केली होती. भाजपचा आयटी सेल त्यांच्यावर तुटून पडला.

त्यानंतर श्रीनेत यांनी सारवासारव करत ते माझे अकाउंट नव्हते, असा दावा केला. काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनीही श्रीनेत यांचा पोस्टचा निषेध करत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत म्हटले की, कंगना आमची बहीण आहे. आम्ही तिचा योग्य तो सन्मान करू. तथापि, या वादाने उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून श्रीनेत यांना मिळणारी उमेदवारी रद्द झाली, असे बोलले जाते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com