
गणेश हिंगमिरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारसंबंधांचा वेगळा अध्याय सुरू झाला. ब्रिटन व भारत यांच्यामधील आंतरराष्ट्रीय व्यापार पुढील पाच वर्षात दुप्पट करण्याचा संकल्प या कराराद्वारे करण्यात आला आहे, भारतातील वस्तूंना या कराराद्वारे नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष करून वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, हस्तकला इत्यादी क्षेत्रातील वस्तूंसाठी शून्य टक्के शुल्क लावले जाणार आहे, त्यामुळे कोल्हापुरी चप्पल, पैठणी ते सावंतवाडीच्या खेळण्यांपर्यंत अनेक वस्तूंना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत, विशेष करून या वस्तूंना जीआय मानांकन मिळालेले असल्याने भारतातील गुणवत्तापूर्वक माल म्हणून अधिक प्रीमीयम या वस्तू मिळवू शकतील, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांनासुद्धा या करारामुळे चांगली संधी मिळाली आहे, हे पदार्थ देखील करविरहित होतील व त्यांना ब्रिटनची बाजारपेठ उपलब्ध होईल, त्याचबरोबर प्रक्रियायुक्त पदार्थ, फळे, भाजीपाला, मसाले, चहा व कॉफी यांच्यासाठीसुद्धा ब्रिटनने आपली बाजारपेठ शून्य आयात करापर्यंत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या कराराच्या माध्यमातून दिले आहे,