नअस्कार! ऐका हो ऐका, येते दोन-तीन महिने मराठी रंगभूमी गजबजणार आहे. रंगभूमी गजबजेल, आणि रंगगृहांमधल्या खुर्च्याही गजबजतील. जागोजाग प्रयोग लागले आहेत, आणि बहुतेक सगळे हौसफुल्ल चालले आहेत. तिकिटबारीला रांगा आहेत..सकाळी पहिला चहा घेऊन अनेक नाट्यरसिक गावातल्या नाट्यगृहांसमोर नंबर लावू लागले आहेत. तिकिटं मिळाल्यावर ‘जीतम जीतम’च्या विजयी आरोळ्या ठोकत लॉटरीचं तिकिट नाचवावं, तशी नाटकाची तिकिटं नाचवत आहेत.सुंदर नाटकं. सुंदर कलावंत. आणि त्याहीपेक्षा सुंदर, सुस्वरूप नाट्यरसिक युवक- युवतींची गर्दी! आणखी काय हवं? अतएव, ‘घाला नाटक, करा कल्ला, जमवा गल्ला’ असा सुवर्णकाळ येवोनी ठेला आहे. मराठी रंगभूमीचा हा सुवर्णकाळ निरंतर चालो, हीच आम्हा नाट्यरसिकांची इच्छा आहे..मध्यंतरीचा बराच मोठा काळ हलाखीचा गेला. रंगभूमीवरचे गाजलेले कलावंत नाइलाजाने मालिकांचे एपिसोड खेचत होते. वास्तविक ही सगळी गुणी कलावंत मंडळी, पण डेली सोपच्या गिलोटिनखाली निमूटपणे मान देण्यावाचून त्यांना गत्यंतरच उरलं नव्हतं. रिकाम्या थेटरात किती करणार खेळ?पण आता चित्र बदललंय. दिवाळीनंतरच्या हंगामात चांगली एक-दोन नव्हे, डझन-दीड डझन मराठी नाटकं रंगभूमीवर येत आहेत. काही आलीसुद्धा! नाट्यरसिक पुन्हा नाट्यगृहाकडे परतले, तसे गुणी, ‘जुने अने जाणिते’ कलावंतही आले. सयाजी शिंदेंचा ‘सखाराम बाईंडर’ आणि त्याच्या जोडीला लक्ष्मी आणि चंपा आल्या आहेत..शरद पोंक्षेंचे ‘नानासाहेब’ आणि ऋतु प्रभुदेसाईची ’बयो’ प्रा. वसंत कानेटकरांच्या ‘हिमालयाची सावली’ मधून भेटणार आहेत. ही दोन्ही नाटकं तशी १९७२ ची, पण साडेचार दशकांनंतरही त्यांची जादू कायम आहे. चाळीसेक वर्षापूर्वी ‘अफलातून’ हे नाटक गाजलं होतं.तेही परत येतंय…खुद्द महेश मांजरेकर ‘शंकर जयकिशन’ या नाटकातून भेटायला येणार आहेत. जोडीला भरत जाधव आहे. जयवंत दळवींचं ‘कालचक्र’ हे जुनं नाटक तर खऱ्या अर्थानं कालातीत आहे. काल तुम्ही आमच्यावर अवलंबून होता, आज आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत! हे एक कालचक्र आहे. या कालचक्रातून कोणाची सुटका आहे का? वृद्धांना निरुपयोगी म्हणून फेकून देणाऱ्या पिढीवरचं हे अफाट भाष्य होतं..हे नाटकही पुन्हा येतंय. सुरेश खरे यांचं हॉरर मिस्ट्रीवालं ‘कुणीतरी आहे तिथं’, रत्नाकर मतकरींची सदाबहार कॉमेडी ‘एकदा पहावं करुन’, आचार्य अत्र्यांचं ‘भ्रमाचा भोपळा’ किंवा ‘व्यक्ती आणि वल्ली’ असा बराच जुना ठेवा बाहेर येतोय. ‘देवबाभळी’सारखं थक्क करणारं नाटक देणाऱ्या प्राजक्त देशमुखचं नवं नाटक ‘करुणाष्टके’ आल्यामुळे प्रतीक्षा संपली आहे, शिवाय ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या गाजलेल्या एकांकिकेचं दोन अंकी नाटक करुन ते रंगमंचावर चंद्रकांत कुलकर्णी घेऊन येतायत..याखेरीज, याखेरीज -तब्बल अठ्ठावीस हज्जार किलोमीटरचा प्रवास करुन विक्रमवीर रंगधर्मरक्षक प्रशांत दामले यांची टीम पुन्हा भारतात येऊन लँड झाली आहे, आणि ‘शिकायला गेलो एक…’चे दणक्यात प्रयोग केले म्हणे. अमेरिकेत त्यांनी पंधरावीस दिवसात सोळाएक प्रयोग केले म्हणे..न्यू जर्सीच्या प्रयोगाने दौऱ्याची सांगता झाली. बोस्टन, ऑस्टिन, फ्लोरिडा, सिएटल, बे एरिया, ह्यूस्टन, सिनसिनाटी, सेंट लुइस, शिकागो, डेट्रॉइट, वॉशिंटन डीसी, पिट्सबर्ग, क्लीवलंड, डॅलस, रॅले आणि आज सगळ्यात शेवटी न्यू जर्सी…दामल्यांसाठी हे काही नवं नाही. भारतात आल्या आल्या त्यांनी नवा धमाका चालू केलाय. या दामले महाशयांना दमणूक म्हणजे माहीत नाही. एकंदरित काय, तर नाटक, बटाटावडा आणि कॉफीचे दिवस परत आले आहेत. रसिकांनो, सुवर्णकाळासाठी तयार रहा! मी ऑलरेडी रांगेत उभी आहे….सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.