हौस ऑफ बांबू : सुलस अभंगगाथा!

house of bambu
house of bambu

नअस्कार! गेले काही दिवस निराळीच लक्षणे जाणवत होती. अंगात कणकण, डोकं जडजड, पोटात मळमळ…डॉक़्टरांना विचारलं तर म्हणाले, ‘‘कुणा साहित्यिकाला बक्षीस-बिक्षीस मिळाल्याचं वाचनात आलं का? ’’ मी फोनच ठेवून दिलान! काही काळानंतर अचानक मला सटासट अभंग होऊ लागले. असंच पुढे चालू राहिलं तर नवी गाथा लिहून होईल, त्याला सर्कारी बक्षीसही मिळेल असे वाटून गेले. वानोळा म्हणून त्यातले काही अभंग देत आहे.
वाचकांच्या मनरुपी इंद्रायणीत ते तरंगोत, अशी इच्छा आहे. वाचा :
आली आली देवा । आली दुजी लाट ।
फुटले लल्लाट । दुसऱ्यांदा ।।
पुन्हा हाहाकार। पुन्हा ते तांडव।
कोविड मांडव । गजबजे।।
पुन्हा धावाधाव । एका खाटेसाठी।
लागे भित्यापाठी । पिशाच्च हो ।।
किती शोधू देवा। न मिळे गा खाट।
लागली गा वाट । आयुष्याची।।
हिंडले हिंडले । सुटलासे धीर।
रेमडेसिवीर। नाही नाही।।
ऑक्सिमीटरात। घालोनिया बोट।
मोजिते म्या नीट । प्राणवायू ।।
धडधडे छाती। लागता ठसका ।
घेतला धसका । विषाणूचा ।।

काढे नि वाफारे । आता नित्य झाले ।
तब्बेतीचे झोले । येथतेथ ।।
मी तो देवलसी। आहे अभ्यंतरी ।
सबाह्य असे जरी । तर्कदुष्ट ।।
सर्सावोनि बाही । घ्यावी म्हणे लस ।
नर्स म्हणे बस । खुर्चीमाजी ।।
दीड इंची सुई । जावी दंडामाजी।
लस घ्यावी ताजी । पुणेरी हो ।।
बैसले बैसले। तिष्ठले तिष्ठले ।
कंटाळोनि गेले। लसकेंद्री ।।
अधिकारी म्हणे । संपला गा साठा ।
तातडीने गाठा । आपुले घर ।।
कोविशील्ड असो। किंवा कोवॅक्सिन ।
दोन्ही संजीवन । आहेतचि ।।
परंतु, गा दोन्ही । जाहल्या गायब ।
कुणां पुसूं जाब । बाई माझे?।।
म्हणे नमोवाणी । करा अभिनव ।
लस महोत्सव । साजरा हो ।।
घरी नाही दाणा । कडकीचा ठाव ।
तरी बाजीराव । म्हणा आम्हा ।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com