घर असावे घरासारखे...

घर असावे घरासारखे...

रविवारचा सुटीचा दिवस. निवांतपणे सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचताना रेडिओवरील धून कानावर पडली. ""घराला घरपण देणारी माणसं...‘ ही धून भूतकाळात घेऊन गेली. मला लहानपणचे आमचे एकत्र कुटुंब आठवले. आई-वडील, भाऊ-बहिणी, नातलग. मज्जाच मज्जा. मनसोक्त हसणं, खेळणं, बागडणं, रुसणं-फुगणं, लगेच माफ करणं, काळजी घेणं, आपलेपणा. खूपच आनंदाचं जगणं होतं ते. त्या भावविश्‍वात जाताना घराच्या भिंतीवरील ती कविता...
"घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
परस्परांवर प्रेम असावे, नकोत नुसती नाती‘‘

डोळ्यांसमोर तरळून गेली. पूर्वी लहान गावांत भरलेली घरे होती. मिळकत कमी होती, गरजा कमी होत्या; पण माणसं घरात एकमेकांच्या सहवासात रमत होती. कालांतरानं घरातील लोक उद्योगधंद्यासाठी, उपजीविकेसाठी घर सोडून दूर गेली. परिणामी एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आली. एकत्र कुटुंबात अडीअडचणीला, एकमेकांच्या मदतीसाठी माणसं असतात. आजार, अपघात, संकट अशा प्रसंगी हीच माणसं उपयोगी पडतात. पूर्वी भरल्या घरात सगळ्या गोष्टी निभावून नेता येत असत. आता लहान घरकुलावर संकटाच्या वेळी आभाळच कोसळतं. एकत्र कुटुंब ही संस्काराची पाठशाळा होती. सर्व वयोगटांतील माणसं तिथ असत. मुलांचं समाजीकरण व मूल्यशिक्षण तिथं सहज घडत असे. घर नावाचं ते लहानसं जग मोठं आनंददायी होतं. आता हे जग विखुरलं गेलं आहे. तरीपण सणासुदीला व यात्रेनिमित्त एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करताना मन उल्हासित होत असतं. माणूस संपूर्ण दिवस बाहेर असला, तरी सायंकाळी त्याचे पाय घराकडेच वळतात. रामकृष्ण परमहंसांनी मठालाच आपलं घर मानलं होतं. आजाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी स्वतःला मठात न्यावे, अशी इच्छा व्यक्त केली. जगाचा निरोप घेताना आपल्या मूळस्थानी पोचावे अशी त्यांची भावना होती. 


जे. कृष्णमूर्ती आजाराला तोंड देत, ज्या वेळेस उपचारांच्या पैलतीरावर गेले, त्या वेळेस निकटवर्ती अभ्यासकांना म्हणाले, "हा देह माझ्या कुटीकडे घेऊन चला.‘ मराठी तत्त्वशाळा महाकोशाचे रचनाकार देविदास वाडेकर यांनी आपल्या अखेरच्या आजारात ""मला घरी घेऊन चला‘‘ एवढाच आग्रह धरला.
पूर्वी घर हे एक सुखद, सुरक्षित, प्रेममय, आधारयुक्त असे स्थान होते. एकत्र कुटुंबातील लोक एकमेकांवर खूप प्रेम करत. आज घरे विभक्त झाली आहेत. घरच्या लोकांचा कंटाळा व बाहेरच्या लोकांबरोबर विरंगुळा, अशी समाजरीत वाढली आहे. प्रेमाची धारा, सुसंवाद दिवसेंदिवस कमी होत चाललाय. मनुष्याने आत्मकेंद्रीपणा कमी करून थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त आणली, तर सर्व आवडीच्या गोष्टी व व्यक्तींशी आनंदाने सुसंवाद साधता येईल. हे तारतम्य सुटले, एकमेकांकडे दुर्लक्ष केले, जो तो आपल्याच नादात राहिला, तर मात्र भरल्या घरात रितेपणा येऊन अशांतीचा शिरकाव होऊ लागतो. प्रत्येकाने आपल्या आवडीनिवडी, क्षमता, स्वभाव विचारात घेऊन, एकमेकांच्या मर्यादा ओळखून, एकमेकांच्या आविष्काराच्या पद्धती जाणून एकमेकांचे अस्तित्व व अस्मिता सांभाळली, तर घर सुखी होते. अशा घराचं अंगण सुंदर असतं. त्या भोवतालचं जगही त्याला प्रतिसाद देतं. घराला स्वर्ग बनवायचे असेल, तर एकमेकांवर - निःस्वार्थीपणे प्रेमाची उधळण करा. त्यासाठी त्यागाची- समर्पणाची भावना ठेवा. मनाची शुद्धता, प्रेम, करुणा, मैत्रीचा घरातील लोकांवर वर्षाव करा. संत ज्ञानेश्‍वरांनी विश्‍वासासाठी पसायदान मागितले. ""हे विश्‍वची माझे घर‘‘ ही संकल्पना उदयास आणली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com