पुन्हा केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र?

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 25 मे 2019

साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात.

साडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो त्सुनामीत परिवर्तीत झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक प्रचारसभेत सांगतात. खरे तर त्सुनामी संहारक असते. ही त्सुनामी कशाचा संहार करेल? शिवसेना- भाजप युतीतल्या नव्याने निर्माण झालेल्या साहचर्याचा की विरोधकांचा सत्तेत परतण्याच्या मनसुब्यांचा? देशात मिळालेले यश भाजपला "एकला चलो रे' ची प्रेरणा देऊ शकते.

साहसवाद भाजपअध्यक्ष अमित शहा यांना आवडतो. 2014मध्ये भाजपने महाराष्ट्रात धाडस केले, अन्‌ शिवसेनेच्या आग्रहानुसार जागा न देता स्वबळावर निवडणूक लढविली. त्याचा लाभ झाला. मोठा- छोटा भावाच्या भूमिका बदलल्या. या वेळीही भाजपने निवडणुकीसाठी रसद उभी केली. शिवसेनेने विनंती करूनही चेहरे न बदलल्याने महाराष्ट्रात तीन जागांचे नुकसान झाले, असे भाजप नेते सांगतात. पण त्याचे कुठलेही किल्मीष न ठेवता ते "मातोश्री'वर विजयाचे पेढे घेऊन शिवसेनेला प्रखर विरोध करणाऱ्या आशीष शेलारांसह गेले. याचा वाचता येणारा सरळ अर्थ असा आहे, की प्रचंड विजयानंतरही भाजप शिवसेनेचा हात धरून ठेवणार आहे. 2019च्या विधानसभा परीक्षेची सोपी झालेली प्रश्‍नपत्रिका कठीण करण्याची भाजपची इच्छा नाही. शिवसेनेनेही जहाल मतवादी संजय राऊतांना शस्त्रे शमीवृक्षावर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अपशकुनी वादांपेक्षा सत्तेत जीव रमवण्याची सरदार- मनसबदारांची इच्छा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी महत्त्वाची मानली असल्याने लोकसभा निवडणुकांपाठोपाठ येणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका देशातील कौलाची पुनरावृत्ती ठरण्याची शक्‍यता दाट आहे. खरे तर प्रत्येक निवडणूक वेगळी असते. ती स्वत:चे ताण आणि आव्हाने घेऊन येते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडातल्या विधानसभा निवडणुका कॉंग्रेसने उत्तम प्रकारे जिंकल्या होत्या. कॉंग्रेसचे गतवैभव पुन्हा येण्याचे दिवस फार दूर नसल्याची चर्चाही सुरू झाली; पण केवळ सहा महिन्यांत चित्र बदलले. ते कसे याचा विचार कॉंग्रेसनेतृत्व करत असेल. 

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर 2014 मध्ये लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. यंदाही त्या आहेत. 2014 प्रमाणेच 19मध्येही निकालांची पुनरावृत्ती होईल? "ब्रॅंड मोदी' महाराष्ट्रातही तसाच चालेल काय? जिंकणाऱ्याचे सगळेच काही चांगले असते, असे मानण्याचे कारण नाही. लगतच्याच गुजरातमधून उदयाला आलेल्या या नेत्याबाबत एकेकाळी महाराष्ट्रात बराच दुस्वास होता. तो महाराष्ट्राच्या डावीकडे झुकणाऱ्या धर्मनिरपेक्ष कॉंग्रेसगामी वैचारिक भूमिकेमुळे होता. गुजरातच्या पिपाण्या सतत वाजवत राहिल्याने तीव्र झाला होता. आता मराठी माणसाच्या हक्‍काची भाषा बोलणारी शिवसेना भाजपसमवेत आहे. पाच वर्षांपूर्वी 63 विधानसभा मतदारसंघांत भाजपच्यासमोर गेलेली शिवसेना हाच खरे तर त्या वेळचा खरा विरोधी पक्ष. तो आज भाजपसमवेत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सरकारने आपल्या परीने सोडवला आहे.

कर्जमाफीची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोचवण्याची सोय केली आहे. दुष्काळ भीषण खरा; पण तो सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवला. प्रशासन सज्ज राहील याची काळजी घेतली. या सगळ्याचे प्रतिबिंबही निकालात पडले आहे. 
कॉंग्रेसच्या हाती जेमतेम एक जागा लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची कामगिरी तुलनेने चांगली असली तरी या पक्षाला किमान दोन आकडी जागा जिंकण्याची इच्छा होती. त्या ईर्ष्येने निवडणुकीत ते उतरले होते. या दोन्ही पक्षांच्या दिमतीला राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. या सेनेपेक्षाही त्यांच्या सेनापतीची एकट्याचीच ताकद अफाट; पण कॉंग्रेसविरोधी मतदार हाच आपला जनाधार आहे हे लक्षात न आलेले राज ठाकरे आज "निकाल अनाकलनीय आहे', असे म्हणताहेत.

त्सुनामीच्या कारणांचे आकलन त्यांना झाले, तरी चार महिन्यांत त्यावर मात करण्याची तयारी ते करू शकतील, असे दिसत नाही. लोकसभेच्या निकालांचे विधानसभा मतदारसंघनिहाय आकडे एक- दोन दिवसांत येतील; पण किमान 200 मतदारसंघांत आज भाजप-सेनेला अनुकुलता आहे. विखे पाटील, क्षीरसागर असे बडे नेते प्रवेशास उत्सुक आहेत. बाहेरून आलेले उमेदवार भलेही निष्ठावंतांना आवडत नसतील; पण त्यांना विचारतेच कोण, अशी स्थिती निकालाने आणून ठेवली आहे. फाजील आत्मविश्‍वासाने तेच चेहरे पुन्हा रिंगणात उतरवण्याचे धाडस शिवसेनेने केले नसते, तर आणखी तीन जागा जिंकत सातारा, बारामती आणि चंद्रपूर वगळता 45 जागा युतीने जिंकल्या असत्या. थोडक्‍यात आजच्या घडीला नरेंद्र मोदी लाटेमुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सर्वाधिक उत्तम परिस्थितीत आहे.

शिवसेनेचे हित या पक्षाशी जमवून घेण्यात आहे. या ग्रहांचा अचूक फायदा घेण्याचे कसब असणारे देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेच. सर्वाधिक चिंतेची स्थिती आहे ती कॉंग्रेसची. शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झालेल्या आमदार सुरेश धानोरकर यांना पहिल्या उमेदवार यादीत तर संधीच दिली गेली नाही. मग काही ध्वनिफितींमधले संवाद समोर आले अन ते उमेदवार झाले.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव करीत या नाकारलेल्या उमेदवारानेच कॉंग्रेसला निरंक होऊ दिले नाही. अशा मित्राला सावरण्याचे काम "राष्ट्रवादी'ला करावे लागेल. एकूणच फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विरोधकांपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. म्हणूनच 2014च्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विरोधकांना शुभेच्छा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In India again Modi Government and in Maharashtra may Devendra Fadnavis