भारत- फ्रान्सचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India France cultural political relations

भारत- फ्रान्सचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ

भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशामुळे प्रभावित झालेले फ्रान्सच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाचे महावाणिज्य दूत जीन-मार्क सेरे-शार्लेट सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत आल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. भारत-फ्रान्स सांस्कृतिक संबंधांपासून ते राजकीय मैत्रीपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी मनमोकळे भाष्य केले. त्याचाच आढावा घेणारी ही मुलाखत.

- अक्षता पवार

प्रश्‍न : भारतामध्ये तुम्ही अनेकदा आला आहात. तुम्हाला या देशातील सर्वाधिक आवडणारी गोष्ट कोणती ?

भारत हा देश वैविध्याने परिपूर्ण आहे. विविधतेत एकतेचे उत्तम उदाहरण असलेल्या या देशात भाषा, पेहराव, खाद्य पदार्थ तसेच ऐतिहासिक वारसा आदी देशाची खरी ओळख आहे. देशातील प्रत्येक राज्यात असलेली वास्तुकला ही इतिहासाने समृद्ध आहे. फ्रान्स येथे असलेल्या ‘मुघल गार्डन’ येथून भारताच्या समृद्ध इतिहासाबाबत ओढ वाढत गेली. भारताच्या इतिहासाला समजून घेण्याची आवड, तसेच येथील पोशाख, कला अशा एक ना अनेक गोष्टी आकर्षक ठरत होत्या. त्यामुळे या देशात येऊन या सर्व गोष्टी अनुभवायची इच्छा नेहमी होते. भारतात दिल्ली, कोलकत्ता, ओडिशा, औरंगाबाद, मध्य प्रदेश, राजस्थानसह वेगवेगळ्या राज्यांना भेट दिली आहे. प्रत्येक राज्यातील कला, संस्कृती, हस्तकला, रंग आणि ऐतिहासिक वारसा या सर्व आवडणाऱ्या गोष्टी आहेत.

प्रश्‍न : फ्रान्स आणि भारत यांच्यातील समान रुची आणि मूल्ये कोणती?

भारत आणि फ्रान्सचे संबंध वर्षानुवर्षे आहेत. या दोन्ही देशांमधील समानता पाहिली तर दोन्ही देशांमध्ये विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांना प्राधान्य दिले जाते. ज्या प्रमाणे भारत आज स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे, त्याचप्रमाणे इंडो-फ्रेंच मैत्रीपूर्ण संबंधालाही ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर भारत-युरोप यांच्यातील मैत्रीला देखील ६० वर्षे पूर्ण झाली असून भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध काळानुसार घट्ट होत असून त्यांच्यातील विश्र्वास दृढ होत आहे. तसेच या संबंधांमुळे भारत व फ्रान्सच्या सामाईक मूल्यांचा दीर्घकाळाचा इतिहास देखील दिसून येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फ्रान्सचा उल्लेख भारताच्या सक्षम भागीदारांपैकी एक असा केला आहे. हे दोन्ही देश भूराजकीय, अणु, अवकाश आणि संरक्षण यांसह अनेक धोरणात्मक क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करत आहेत. दहशतवाद, धोरणात्मक अर्थव्यवस्था यावर आधारित आंतरराष्ट्रीय संबंधांचे समान दृष्टीकोनापासून ते विविध क्षेत्रात मजबूत द्वीपक्षीय संबंध स्थापित करण्यावर सातत्याने भर दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक भागीदारीमुळे हे दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत.

प्रश्‍न : महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांना तुम्ही भेट दिली आहे. पण पुणे शहराप्रती असलेले प्रेम अधिक का? आणि या शहरातील सर्वाधिक भावणारी गोष्ट काय ?

मी यापूर्वीही पुण्याला भेट दिली आहे. येथील हवामान आणि निसर्गरम्य वातावरण मनाला भावणारे आहे. उद्योग, शिक्षण, कला, संस्कृती, ऐतिहासिक वारसा अशा अनेक पैलूंसाठी पुणे हे अत्यंत महत्‍‍त्वाचे आहे. त्यामुळे फ्रान्सच्या काही कंपनींची शाखा पुण्यात आहेत. त्यामध्ये मिशेलिन, यूबी सॉफ्ट सारख्या कंपनीचा समावेश आहे. तर ‘अलायन्स फ्रँकेस’ (फ्रेंच अलायन्स) या संस्थेच्या १४ शाखा भारतात असून त्यातील एक पुण्यात आहे. फ्रेंच संस्कृती आणि भाषेबद्दलचे प्रेम शहरात पसरविण्याचे उत्कृष्ट काम ‘अलायन्स फ्रँकेस’ करत आहे. त्यात पुणेकरांकडून मिळणारा प्रतिसाद आणि प्रेम यामुळे पुणे शहराबद्द्ल विशेष आकर्षण आहे.

प्रश्‍न : फ्रान्स आणि भारत यांच्यातील भागीदारी आणि सहकार्य वाढविण्याच्या अनुषंगाने राबविलेले उपक्रम? भारत-फ्रेंच संबंध मजबूत करण्यासाठी तुम्ही कसे कार्य करत आहात?

फ्रान्सच्या नागरिकांना पूर्ण भारत माहिती नसून अशीच परिस्थिती भारतीय नागरिकांची देखील फ्रान्स देशाबाबत आहे. केवळ आयफेल टॉर म्हणजे फ्रान्स नव्हे, तसेच, भारत म्हटले की ते फक्त ताज महालपर्यंत मर्यादित नाही. या पलिकडे ही दोन्ही देशांमध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे फ्रान्स आणि भारत यामधील दुवा म्हणून काम करण्याची जबाबदारी पार पाडत आहे. दोन्ही देशांचा वेगवेगळ्या विषयांवर एक सारखा दृष्टिकोन असून ते एकत्रितपणे कार्य करतील यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये भारतातील विद्यार्थ्यांना फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये शिक्षणाची आणि फ्रान्सच्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात, या अनुषंगाने भारत सरकारबरोबर करार केले आहेत. त्याचबरोबर दोन्ही देशातील उद्योगांमध्ये सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करणे. युरोपमधील गुंतवणुकीसाठी फ्रान्स हे सर्वात आकर्षक ठिकाण ठरत आहे. तर फ्रान्समधील आशियायी गुंतवणूकदारांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे. फ्रान्स हा भारतासाठी थेट परकीय गुंतवणुकीचा महत्त्वाचा स्रोत आहे. दरम्यान, औद्योगिक प्रकल्प किंवा महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भागीदारी विकसित करण्यासाठी, कौशल्य आणि प्रोत्साहन यांची सांगड घालण्याची गरज आहे.

चित्रपट क्षेत्राच्या माध्यमातूनही दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक संबंध घट्ट करण्याचे प्रयत्न केले जाता आहेत. जूनमध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारत हा सन्मानाचा देश होता. तर या नोव्हेंबरमध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कंट्री इन फोकस’ हा मान फ्रान्सला मिळाला. विविध भारतीय चित्रपटांना फ्रान्समधील चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत. बॉलिवूडमधील अनेक चित्रपट मी पाहिले आहेत. त्यातील ‘क्वीन’ हा चित्रपटात फ्रान्सची झलक होती. चित्रपटांच्या माध्यमातून ही संस्कृती समजण्यास शक्य होते. या व्यतिरिक्त संस्कृती आणि भाषा यावर लक्ष केंद्रित करत दरवर्षी भारतात ‘बोन्जूर इंडिया’ आणि फ्रान्समध्ये प्रत्येक तीन वर्षांनी ‘नमस्ते फ्रान्स’ या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये दोन्ही देश आपापल्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात. फ्रान्समधील भारतीय प्रशासकीय विभागाशी सातत्याने समन्वय साधला जातो. मला वाटते, भारत आणि फ्रान्समध्ये विविधता आहे. हे दोन्ही देशांच्या मजबूत गुणधर्मांपैकी एक असून आपण ते आणखी विकसित केले पाहिजे.

प्रश्‍न : धोरणात्मक दृष्टिकोनातून दोन्ही देशांतील भागीदारी किंवा मैत्री कशी महत्त्वाची आहे?

कोरोनाकाळात अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विनंतीनुसार, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय लोकांच्या समर्थनार्थ एकता अभियान राबविले. यामध्ये ऑक्सिजन जनरेटर, द्रव ऑक्सिजन कंटेनर, रेस्पिरेटर्स आदी वैद्यकीय उपकरणे भारताला पुरविले. तसेच फ्रान्सच्या अडचणीच्या प्रसंगांमध्ये भारतानेही वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा आणि मदत पोचविली. त्यामुळे अशा प्रसंगातून स्पष्ट होत आहे की, कठीण काळात दोन्ही देशांनी एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र काम केले. धोरणात्मक भागीदारीमागे खरी आणि खोल मैत्री असते. दोन्ही देशांतील प्रत्येक व्यक्तीमध्ये मैत्रीपूर्ण भावना असणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध प्रसंगांमध्ये ही भागीदारी निभावणे शक्य होईल.

प्रश्‍न : संरक्षणाच्या अनुषंगाने नव्या युद्धनीतीसाठी दोन्ही देशांद्वारे केले जाणारे प्रयत्न?

जागतिक स्तरावर युद्धाचे स्वरूप नक्कीच बदलत आहे. त्यात भारत व फ्रान्स हे दोन्ही देश सागरी सुरक्षा आणि सायबर सुरक्षेवर भर देत आहेत. अलीकडेच फ्रेंच पोलिस तज्ज्ञांनी भारतातील तज्ज्ञांना भेटून सायबर गुन्ह्यांशी लढा देण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण केली. यामध्ये डार्क वेब, एन्क्रिप्शन आणि ड्रोनचे फॉरेन्सिक आदींचा समावेश आहे. तर फ्रेंच आणि भारतीय नौदलाने अलीकडेच फ्रान्सच्या रियुनियन बेटावर आधारित हिंदी महासागरात संयुक्त गस्त घातली. या महत्त्वपूर्ण प्रदेशात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे सागरी क्षेत्र जागरूकता वाढवत आहोत. तर राफेल या लढाऊ विमानांसाठी भारत फ्रान्समधील करार देखील संरक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील सशस्त्र दलांद्वारे युद्ध अभ्यास केले जातात. नुकतेच दोन्ही देशांदरम्यान हवाई दलाद्वारे गरुड हा युद्ध अभ्यास पार पडला. यामुळे पारंपरिकच नाही तर बदलत्या युद्धनीतीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते.