esakal | रोलमॉडेल
sakal

बोलून बातमी शोधा

Indian cricketer Mithali Raj

चेंडू मारण्याची पद्धत पाहून प्रशिक्षकांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली आणि त्यातून त्या मुलीला क्रिकेटची गोडी कधी लागली, हे तिचे तिलाच कळले नाही. ही मुलगी म्हणजेच महिला क्रिकेटमधील आजची सर्वोत्तम फलंदाज मिताली राज.

रोलमॉडेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घरात लष्करी शिस्त असूनही लहानपणी तिला त्याची सवय नव्हती. तिला झोप अतिप्रिय होती. त्यामुळे हवाई दलातून निवृत्त झालेल्या वडिलांनी तिला सिकंदराबाद येथील क्रिकेट प्रशिक्षण वर्गात पाठविले. तेव्हा ती पार मैदनावरच्या सीमारेषेपलीकडे भावाचा सराव संपण्याची वाट बघायची. भाऊ परत आला की त्याची बॅट घ्यायची आणि मैदानाच्या चारही बाजूला जमेल तितका वेळ चेंडू मारत बसायची. चेंडू मारण्याची पद्धत पाहून प्रशिक्षकांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली आणि त्यातून त्या मुलीला क्रिकेटची गोडी कधी लागली, हे तिचे तिलाच कळले नाही. ही मुलगी म्हणजेच महिला क्रिकेटमधील आजची सर्वोत्तम फलंदाज मिताली राज. तिने अल्पावधीत अशी काही प्रगती केली, की जवळपास दोन दशके तिने महिला क्रिकेटमध्ये ‘राज्य’ केले.

निधीची कमतरता, महिला क्रिकेटला नसलेली मान्यता आणि अभावाने उपलब्ध होणाऱ्या संधी, अशा संकटांचा सामना भारतीय क्रिकेट करीत असताना भारतीय महिला क्रिकेटमध्ये मितालीचा उदय झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९९९ मध्ये पदार्पणातच तिने आयर्लंडविरुद्ध नाबाद शतकी खेळी केली. त्यानंतर तीन वर्षांनी तिला कसोटी खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत शून्यावर परतलेल्या मितालीने जिद्दीने दुसऱ्या कसोटीत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढे २००३ पासून अशी वेळ आली, की मितालीशिवाय भारतीय संघ पूर्णच व्हायचा नाही. कर्णधारपदासाठी अनेक खेळाडू आस लावून बसतात, तेथे कर्णधारपद मितालीकडे चालत आले. त्यानंतर पहिल्याच विश्‍वकरंडक स्पर्धेत तिने आपल्या नाबात ९१ धावांच्या खेळीने भारताला अंतिम फेरीत नेले. पुढे कसोटी क्रिकेटमध्ये दुहेरी शतक करण्याची कामगिरी केली. क्रिकेटमध्ये ‘टी २०’ला सुरवात झाली, तेव्हा त्याच्याशीही तिने झटपट जुळवून घेतले. क्रिकेटमध्ये येऊ पाहणाऱ्या अनेक तरुणींची मिताली ‘रोल मॉडेल’ ठरली. तिच्याकडे पाहून क्रिकेटला सुरवात करणाऱ्या अनेक खेळाडू आज भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. वाढलेले वय खेळातून डोकावू लागल्यावर तिने तरुण क्रिकेटपटूंना संधी देण्यासाठी ‘टी २०’ क्रिकेटपासून स्वतःला दूर करण्याचा निर्णय घेतला. पण, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ती अजूनही कर्णधार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटमधील मितालीचे ‘राज’ फक्त ‘टी २०’पुरते संपुष्टात आले आहे. पण, एकेकाळी झोपेची आणि नृत्याची आवड असलेल्या एका मुलीने क्रिकेटमध्ये येऊ पाहणाऱ्या मुलींच्या एका पिढीला जागे केले, हे कधीच विसरता येणार नाही.

loading image
go to top