अग्रलेख : पुन्हा खुणावतो चंद्र!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 June 2019

भारताची ‘चांद्रयान- २’ ही मोहीम गुंतागुंतीची आणि म्हणूनच देशाला आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा अभिमान वाटावी अशी आहे. ही खरेतर आपल्या वैज्ञानिकांनी उच्चकोटीचे विज्ञान-तंत्रज्ञान व अथक परिश्रमांच्या बळावर घडविलेली क्रांतीच म्हणावी लागेल.

भारताची ‘चांद्रयान- २’ ही मोहीम गुंतागुंतीची आणि म्हणूनच देशाला आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा अभिमान वाटावी अशी आहे. ही खरेतर आपल्या वैज्ञानिकांनी उच्चकोटीचे विज्ञान-तंत्रज्ञान व अथक परिश्रमांच्या बळावर घडविलेली क्रांतीच म्हणावी लागेल.

ये णारा जुलै महिना भारताच्या, तसेच आपली अवकाश संशोधन संस्था- ‘इस्रो’च्या दृष्टीने ऐतिहासिक असेल. ‘चांद्रयान-२’च्या रूपाने पुन्हा एकदा लाडक्‍या चांदोबाला गवसणी घालण्याचे आणि त्या रूपाने भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाठविण्याच्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचे निश्‍चित झाले आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी बुधवारी ही बहुप्रतीक्षित घोषणा केल्यानंतर प्रत्येक भारतीय अभिमानाने मोहरून गेला नसता तरच नवल. येत्या १५ जुलैच्या पहाटे पावणेतीनच्या सुमारास देशाचे ३.८४ टन वजनाचे दुसरे चांद्रयान घेऊन ‘जीएसएलव्ही मॅक-३’ हे अधिक क्षमतेचे भूस्थिर अवकाशप्रक्षेपक अवकाशात झेपावेल. ही मॅक श्रेणी अवकाशवाहनाच्या वजन वाहून नेण्याच्या क्षमतेवर निश्‍चित होते. साधारणपणे पन्नास दिवसांनंतर सहा किंवा सात सप्टेंबरला चांद्रयानातील ‘विक्रम’ नावाचे लॅंडर हळूवारपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात उतरेल. अवघ्या तीन लाख ८४ हजार किलोमीटरवरील चंद्रावर पोचण्यासाठी इतका अधिक कालावधी यासाठी, की जवळपास तीन आठवडे चांद्रयान पृथ्वीभोवती विविध कक्षांमध्ये घिरट्या मारत राहील. पृथ्वी व चंद्राच्या विविध कक्षांमधील परिवलन गतीशी जुळवून घेत राहील. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा तशाच घिरट्या मारल्या जातील आणि साधारणपणे एक वर्ष चंद्राभोवती फिरणारा ‘ऑर्बिटर’ चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर उंचीवर सोडला जाईल. भारताच्या अवकाश विज्ञान प्रगतीचे अध्वर्यू विक्रम साराभाई यांचे नाव दिलेला ‘विक्रम’ लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर त्यातील ‘प्रज्ञान’ रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरेल आणि पुढचे पंधरा दिवस गोगलगायीच्या संथ गतीने पाचशे मीटर पुढे सरकताना चंद्राच्या पृष्ठभागाचा विविध अंगांनी अभ्यास करील, ते तपशील ‘ऑर्बिटर’कडे पाठविले जातील. पुढचे वर्षभर ‘ऑर्बिटर’कडून चंद्राची त्रिमितीय छायाचित्रे घेऊन पृथ्वीवर धाडली जातील.

उत्तर ध्रुवाच्या तुलनेत अधिक काळ सावलीत राहणारा चंद्राचा दक्षिण ध्रुव अवकाशयान उतरविण्याच्या दृष्टीने अवघड मानला जातो; पण तेथे यान उतरविण्याचा पराक्रम भारताने पहिल्या चांद्रयानावेळीच ऑक्‍टोबर २००८ मध्ये नोंदविला आहे. त्या मोहिमेनेच चंद्रावर खनिजांमध्ये सामावलेले जलसाठे असल्याचे अनुमान काढले आणि नंतर अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था- ‘नासा’ने त्या निष्कर्षावर शिक्‍कामोर्तब केले. चंद्रावर मानवी वस्तीची शक्‍यता अधिक प्रबळ झाली. अकरा वर्षांपूर्वी पहिले ‘चांद्रयान’ चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले होते. ते ‘क्रॅश लॅंडिंग’ होते. आता उपकरणांना धक्‍का लागणार नाही अशा रीतीने हळूवार- ‘सॉफ्ट लॅंडिंग’ होणार आहे. अशा रीतीने ते यशस्वी करणारा भारत हा जगातला अवघा चौथा देश असेल. अमेरिका, रशिया व चीनलाच ही कामगिरी याआधी शक्‍य झाली आहे.
भारताची ही मोहीम खूप गुंतागुंतीची आणि म्हणूनच देशाला आपल्या शास्त्रज्ञांचा मनस्वी अभिमान वाटावी अशी आहे. एकतर प्रक्षेपणापासून ते ‘विक्रम’ लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेपर्यंत किंवा त्यापुढे ‘प्रज्ञान’ रोव्हरच्या कामगिरीपर्यंत या मोहिमेला अनेक टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर अचूकता साधावी लागणार आहे. आणखी एक बाब अमेरिका, रशिया किंवा चीन या जगातल्या अवकाशशक्‍ती आणि भारत यांची तुलना करता अधिक अभिमानास्पद आहे. देशाच्या स्वातंत्र्याला पाऊणशे वर्षे पूर्ण होतील, तेव्हा २०२२ मध्ये मानवी यान चंद्रावर पाठविण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा हा सध्याचा मोठा टप्पा आहे. अमेरिकेने २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग व आल्विन आल्ड्रीन या अंतराळवीरांना चंद्रावर उतरविले, तेव्हा बावीस वर्षांपूर्वी पारतंत्र्यांच्या बेड्यांमधून मुक्‍त झालेला आपला देश भुकेचा सामना करीत होता. अमेरिकेतूनच आयात केलेल्या निकृष्ट गव्हावर देशाची भूक भागविली जात होती. आता पन्नास वर्षांनंतर हाच देश अवकाशातील मोहिमांच्या रूपाने अमेरिकेची बरोबरी करू पाहात आहे. ही खरेतर आपल्या थोर व कष्टाळू वैज्ञानिकांनी उच्चकोटीचे विज्ञान-तंत्रज्ञान व अथक परिश्रमाच्या बळावर घडविलेली क्रांती आहे. अकरा वर्षांच्या अंतराने चंद्राला घातलेली गवसणी आणि दरम्यान मंगळाभोवती घिरट्या घालण्यासाठी पाठविलेले मंगळयान या वैज्ञानिक क्रांतीच्या ठळक खुणा आहेत. त्याशिवाय, शिक्षण, आरोग्य, दळणवळण वगैरे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुखाचे क्षण पेरणाऱ्या विविध उपग्रहांच्या प्रक्षेपणाने ही क्रांती केवळ वैज्ञानिक न राहता सामाजिक, मानवीयदेखील बनली आहे. हा प्रवास सर्वसामान्यांना रोज भेडसावणाऱ्या समस्यांवरील भविष्यातील उत्तर विज्ञान व तंत्रज्ञानातच आहे, हा विश्‍वास दृढ बनविणाराही आहे. भारतीय अवकाश मोहिमांमधील यशाचे प्रमाण जगाने हेवा करावा इतके मोठे आहे. दुसरी चांद्रयान मोहीम यशस्वी होईलच. तो क्षण महिनाभरानंतर अवतरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indias planning to build its own space station says isro in editorial