
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनात अनेक नावे भारतीय असली, तरी भव्या लाल यांचा समावेश ही विशेष घटनाच आहे. ‘नासा’सारख्या जागतिक महत्त्वाच्या संस्थेचे प्रमुख कार्यकारी पद भूषविणे हे लाल यांना जसे भूषणावह आहे.
अमेरिकेत अवकाश संशोधन संस्थेची अर्थात ‘नासा’ची स्थापना १९५८मध्ये झाली. त्यानंतर ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुखांच्या नावांच्या यादीमध्ये पहिल्यांदाच भारतीय अमेरिकी महिलेची निवड झालेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनात अनेक नावे भारतीय असली, तरी भव्या लाल यांचा समावेश ही विशेष घटनाच आहे. ‘नासा’सारख्या जागतिक महत्त्वाच्या संस्थेचे प्रमुख कार्यकारी पद भूषविणे हे लाल यांना जसे भूषणावह आहे, तसेच ते भारतवासीयांची मान उंचावणारेही आहे. याचे कारण असे, की आतापर्यंत या पदावर कोणतीही महिला नियुक्त झालेली नाही. उपप्रमुखपदावर काही महिलांची गेल्या काही काळात निवड झाली आहे; पण प्रमुख पदाचा प्रथमच मान मिळाला तो भव्या यांना. अर्थात, त्यांची कामगिरीही त्यांच्या नावाप्रमाणेच भव्य आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दिल्लीतील एका मध्यमवर्गीय घरात भव्या यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची अतीव आवड. म्हणजे, सर्व मुले खेळत असत तेव्हा भव्या वाचत बसायची. त्यामुळे ती अनेकदा नातेवाईकांमध्ये कुतूहलाचा विषय होती, त्याचबरोबर चित्रकला, गायन हाही तिचा आवडीचा छंद. दिल्लीतल्या घरात अनेक भिंतींवर तिची चित्रे आहेत. अंदाजे सातवी-आठवीत असताना तिचे चित्र रशियन नियतकालिकाच्या स्पर्धेत निवडले गेले होते. तेव्हा तिला काही दिवस रशियात जाण्याची संधी मिळाली होती. अभ्यासात आधीपासूनच हुशार असल्यामुळे वर्गात कायम पहिली येत होती. त्यामुळे अनायासे अमेरिकेत ‘एमआयटी’मध्ये प्रवेशाची संधी मिळाली, पण ऐंशीच्या दशकात एकुलत्या मुलीला अमेरिकेत एकटीला कसे पाठवायचे, ही चिंता आई-वडिलांना सतावत होती. त्यात नातेवाईकांचाही दबाव होता. एवढ्या दूरवर मुलीला पाठवणे म्हणजे कठीणच, पण अमेरिकेतील विद्यापीठातील लोकांनी त्यांना समजावले. भव्या एक हुशार मुलगी आहे. तिच्यासाठी ही फारच मोठी संधी आहे हे त्यांनी भव्याच्या आई-वडिलांना समजावून सांगितले आणि त्यांनाही ते पटले.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अमेरिकेत एमआयटीतून भव्या यांनी विज्ञान विषयातील पदव्या संपादन केल्या. शिवाय, तंत्रज्ञान-धोरण, सार्वजनिक प्रशासन अशा विषयांमध्ये त्यांनी डॉक्टरेट संपादली आहे. अभियांत्रिकी आणि अवकाश तंत्रज्ञान त्यांना उत्तम अवगत आहे. संरक्षण विश्लेषण संस्था आणि विज्ञान-तंत्रज्ञान धोरण संस्थेच्या त्या संशोधक सदस्य होत्या. व्हाईट हाऊसच्या अवकाश तंत्रज्ञान, रणनीती आणि धोरणे ठरवणाऱ्या समितीमध्येही त्या आहेत. अंतराळ संशोधनात अभियांत्रिकी यंत्रणा, नवे सिद्धांत, प्रयोग करण्यात त्या आघाडीवर असतात. पृथ्वीच्या खालच्या कक्षेतील प्रयोग, छोटे उपग्रह, अवकाश अणुऊर्जा, अवकाश विज्ञान या विषयांत त्यांनी मोठे कार्य केले आहे. अवकाश संशोधनातील त्यांचे जवळजवळ ५० प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. अमेरिकेतील अवकाश संबंधित अनेक संस्थांवर भव्या यांनी विविध पदे भूषवली आहेत. अत्यंत शांत स्वभावाच्या भव्या यांनी अवकाश संशोधनात अजोड कामगिरी बजावली आहे. त्यांचे पतीही तेथे विद्यापीठात प्रोफेसर आहेत, शिवाय व्हाईट हाऊसमध्ये वरिष्ठ अधिकारीही आहेत. कल्पना चावला, सुनीता विल्यम्सनंतर आणखी एक भारतीय नाव यानिमित्ताने चमकले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप