कार्यकर्त्यांच्या वैचारिकतेची मशागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Campaign

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यातर्फे चार व पाच नोव्हेंबरला शिर्डी येथे प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ हे दोन दिवसीय अभ्यासशिबिर होत आहे.

कार्यकर्त्यांच्या वैचारिकतेची मशागत

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यातर्फे चार व पाच नोव्हेंबरला शिर्डी येथे प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ हे दोन दिवसीय अभ्यासशिबिर होत आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची परंपरा खंडित झाली असताना, ती पुन्हा सुरू करण्याचा हा प्रयत्न. त्यामागची भूमिका विशद करणारा लेख.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून एक विचारधारा घेऊन चालला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही विचारधारा आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेच्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी जो दृष्टिकोन दिला, तो पुढे नेण्याचे काम नंतरच्या काळात पक्षाचे संस्थापकअध्यक्ष शरद पवार यांनी केले. राजकारण करताना समाजकारणाला प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन सातत्याने कार्यकर्त्यांना दिला. ही जाणीव विकसित होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावर त्यांनी भर दिला. कार्यकर्त्यांचे वर्तमानासंदर्भातील आकलन सुधारले पाहिजे, भूतकाळातल्या घटनांचा योग्य अन्वयार्थ लावून भविष्यातील आव्हानांचा आवाका त्यांना यावा व त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कार्यकर्ते सर्वार्थाने सिद्ध झाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह राहिला. त्या दृष्टिकोनातून पक्षाने कार्यकर्त्यांसाठी अनेक शिबिरे घेतली.

पक्षाचा कार्यकर्ता सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ असावा; स्थानिक तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत सजग असावा, असा शरद पवार यांचा आग्रह राहिला आहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा केंद्रबिंदू असून त्याच्याशी संवादाची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यादृष्टीने मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ‘चांदा ते बांदा परिवार संवाद यात्रा’ काढून तालुका पातळीपर्यंत हजारो कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संवाद साधला. त्यातून जनतेचे प्रश्न, भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या माध्यमातून संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. सध्या सदस्यनोंदणी सुरू आहे. त्या मोहिमेलाही शिबिरानंतर चालना मिळेल.

सत्ता असो वा नसो...

सत्ता येते आणि जाते. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे, ही आमची भूमिका. सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न आम्ही केले, आता विरोधी पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे. लोकशाहीत जी भूमिका वाट्याला येईल, ती आम्ही निष्ठेने पार पाडतो. कार्यकर्त्यांनीही ती भूमिका समजून घ्यावी. आपल्यासमोरची भविष्यातील आव्हाने कोणती आहेत, याचे आकलन करून घ्यायला हवे. त्या दृष्टिकोनातून या शिबिराचे विशेष महत्त्व आहे.

पुरोगामी विचार मांडणारा अशी ओळख असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने चोख भूमिका बजावली आहे. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांत पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावून पुरोगामी विचारधारेला ताकद देण्याचे काम केले आहे. येत्या जून महिन्यात पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार असून यापुढील काळात पक्षाची भूमिका अधिक महत्त्वाची असेल. महाराष्ट्राच्याही या पक्षाकडून मोठ्या अपेक्षा असतील. या अपेक्षांबाबत कार्यकर्त्यांनी अधिक सजग व्हावे, त्यांची सामाजिक-सांस्कृतिक भूमिका अधिक प्रगल्भ व्हावी, या दृष्टिकोनातून शिबिरात मार्गदर्शन करण्यात येईल. राजकीय आव्हानांचा सामना करण्यासंदर्भातील मार्गदर्शन ज्येष्ठ नेते करतील. शिवाय वर्तमानाचा आवाका वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

पुढच्या आव्हानांचा सामना

राज्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच आजवरच्या २३ वर्षांच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेत राहिला. केंद्रातील सत्तेत पक्ष दहा वर्षे राहिला. पवार यांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुस-या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्ष अग्रभागी राहिला. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हे काम जोमाने सुरू ठेवण्यासाठी शिबिर महत्त्वाचे ठरेल. देशात अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. विरोधी नेत्यांची मुस्कटदाबी होत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या सहाय्याने राज्याराज्यांतील लोकनियुक्त सरकारे अस्थिर करण्याचे राजकारण सुरू आहे.

महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न अडीच वर्षे सातत्याने केले गेले आणि अखेरीस ते पाडण्यात आले. नव्या सरकारच्या मदतीने येथील उद्योग गुजरातला पळवण्यात येत असून, त्याद्वारे येथील तरुणांचे रोजगार हिसकावून घेतले जात आहेत. एरवी गुण्यागोविंदाने नांदणा-या काही समाजघटकांना भीतीच्या छायेत ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण केले जात आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी केली जात आहे. केंद्राला आर्थिक आघाडीवर अपयश आले असून त्यापासून समाजाचे लक्ष वळवण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नावर कुठल्याही स्तरावर टप्प्यावर गांभीर्य दिसत नाही.

महागाईच्या भडक्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून सुरू आहेत. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांसंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल, याविषयी शिबिरामध्ये मंथन होणार आहे.

(लेखक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.)