
‘एअर इंडिया’ने अशी सेवा प्रथमच सुरू केली आणि तिचा पहिला मान या चौघींना मिळाला. पूर्णतः महिलांनी नेतृत्व केलेल्या या विमानाने ८६०० मैलांचा हा कठीण प्रवास १७ तासांत यशस्वीपणे पूर्ण केला.
भारतीय महिलेला पहिल्यांदा वैमानिकाचा परवाना मिळाल्याच्या घटनेला आता ८५ वर्षे उलटून गेली. १९३६ मध्ये सरला ठकराल यांना तो सन्मान मिळाला आणि त्यांनी सुमारे १००० तासांचा विमान प्रवास यशस्वी पार केला. त्यानंतरही महिलांनी अनेक विक्रम पादाक्रांत केले, त्यावर अलीकडेच कळस चढवला तो चौघीं जणींनी. कॅप्टन झोया अग्रवाल, कॅप्टन पापागरी थनमई, कॅप्टन शिवानी मन्हास आणि कॅप्टन आकांक्षा सोनावणे यांनी ऐतिहासिक गगनभरारी घेतली. एअर इंडियाच्या बोईंग विमानाने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या विमानतळाहून भारतात दक्षिणेकडे बंगळूरु विमानतळापर्यंत प्रवास केला, तोही उत्तर ध्रुवावरून. ‘एअर इंडिया’ने अशी सेवा प्रथमच सुरू केली आणि तिचा पहिला मान या चौघींना मिळाला. पूर्णतः महिलांनी नेतृत्व केलेल्या या विमानाने ८६०० मैलांचा हा कठीण प्रवास १७ तासांत यशस्वीपणे पूर्ण केला. ८६० किलोमीटरच्या वेगाने ३० ते ३२ हजार फूट उंचीवरून त्यांनी उत्तर ध्रुव ओलांडला आणि भारतीयांची मान उंचावली. भारतीय हवाई इतिहासात त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॅप्टन झोया अग्रवाल यांनी या प्रवासासाठी सुमारे वर्षभर तयारी केली होती. मुळात या क्षेत्रात भारतात महिलांचे प्रमाण कमी आहे. हवाई क्षेत्र निवडताच झोयाच्या कुटुंबाने आधी विरोध केला होता. तिच्या आईने अगदी डोळ्यात अश्रू आणले होते. या क्षेत्रात कसा निभाव लागणार, याची चिंता तिच्या आईला होती; मात्र काहीतरी वेगळे करायचे, यावर झोया ठाम होती; पण म्हणून हवाई क्षेत्रात लगेच काही संधी मिळाली नाही. वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही झोयाला काही वर्षे काम मिळाले नाही. महिलांवर लगेच विश्वास ठेवायला किंवा जोखीम द्यायची तयारी नसते, त्याचे प्रत्यंतर तिला आले. त्यामुळे काही वर्षे झोयाने वैमानिक प्रशिक्षण वर्ग घेतले; पण या ऐतिहासिक विमान उड्डाणाच्या संधीने स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान झोयाला मिळाले. झोया २०१३ मध्ये सर्वात कमी वयात बोईंग चालविणारी महिला वैमानिक ठरली होती. त्यानंतर तिने ही दुसरी मोठी झेप घेतली.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जगाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाणारा हा प्रवास सोपा नव्हताच. त्यामुळेच या चौघींना त्याची तयारीही खूप करावी लागली. उत्तर ध्रुवावरून प्रवास करणे हे वैमानिकांसाठी आव्हानात्मक असते. यात अनेक अडचणी येतात. प्रतिकूल हवामान, सौर किरणांचा परिणाम विमानांवर होतो. शिवाय जवळपास अडचणीच्या वेळी मदत घ्यावी, असे विमानतळही नाहीत. अशा आव्हानांना तोंड देण्याची तयारी आम्ही केली, असे कॅप्टन पापागरी सांगतात. कॅप्टन आकांक्षा सोनावणे यांनी मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर फ्लोरिडामध्ये वैमानिक प्रशिक्षण पूर्ण केले. मोठ्या बहिणीकडून प्रेरणा घेऊन त्या या क्षेत्राकडे वळल्या. त्यांची मोठी बहीण तेजलही ‘एअर इंडिया’मध्ये कॅप्टन आहेत. शिवानी मन्हास जम्मू-काश्मीरच्या आहेत. त्यांचा ही अनुभव संस्मरणीय होता. चिकाटी, एकाग्रता आणि क्षमतेच्या जोरावर या चौघींनी हे साध्य केले. सध्या भारतीय हवाई क्षेत्रात महिला वैमानिकांचे प्रमाण १२टक्के आहे. तेही जगाच्या तुलनेत जास्त आहे. त्यातच या चौघींच्या गगनभरारीमुळे अनेक मुलींना या क्षेत्राकडे वळण्याची स्फूर्ती मिळेल, यात शंका नाही.