वाचनसंस्कृतीचा पाईक

पुस्तकांची दुनिया प्रश्नांच्या गर्तेत हरवत आहे. सोशल मीडियाच्या आहारी सगळेच गेले आहेत.
Book
Book sakal

सा यकलवरून फिरत्या वाचनालयाची संकल्पना यशस्वी करणाऱ्या जीवन इंगळे यांचा ‘श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कारा’ने गोैरव होत आहे; तो सार्थ अन् उचित असाच आहे. सातारा जिल्ह्यातील खटावसारख्या दुष्काळी, ग्रामीण भागात सायकलवरून फिरत्या वाचनालयाद्वारे जीवन इंगळे यांनी वाचनसंस्कृती जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी केलेली धडपड थक्क करणारी आहे.

ती वाचनसंस्कृतीला बळ देणारी आहे. सध्याच्या मोबाईल, इंटरनेटच्या युगात वाचनसंस्कृती लोपत पावते की काय, अशी चर्चा आहे. पुस्तकांची दुनिया प्रश्नांच्या गर्तेत हरवत आहे. सोशल मीडियाच्या आहारी सगळेच गेले आहेत.

अशा परिस्थितीत ग्रामीण भागात तर त्याची तीव्रता अधिकच प्रत्ययास येते. अशा स्थितीत जीवन इंगळे यांनी सायकलवरून फिरत्या वाचनालयाची संकल्पना यशस्वी केली आहे. त्यांची ही प्रेरक कथा आता सातासमुद्रापार पोहोचली आहे.

जीवन इंगळे यांना सुरवातीपासूनच सामाजिक संवेदनशीलतेचे बाळकडू लाभले. त्यांचे वडील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये कार्यरत होते. सामाजिक बांधिलकीचा हाच वारसा त्यांनी कसोशीने जपला आहे.

जुन्या अकरावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण. सुरवातीच्या काळात ते शेती करत. प्रयोगशील शेतीत त्यांचा हातखंडा होता. अर्थात, त्यात मर्यादितच यश लाभले. मात्र वाचनाची आवड मुळातच होती. वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक त्यांनी वाचले अन् त्यांच्या आयुष्याला जणू कलाटणी मिळाली. मग हाती येतील ती पुस्तके ते वाचत राहिले.

त्यांचा पुस्तकांचा संग्रह देखील वाढत राहिला. त्यातूनच मग पुढे फिरत्या वाचनालयाची संकल्पना आकारास आली. सायकलवरून ते परिसरातील गावोगावी फिरत. मुलांना, ग्रामस्थांना पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त करत. त्यातून त्यांचा लोकसंग्रहसुद्धा वाढत गेला.

त्यांच्या प्रयत्नांमुळे वाचकांची संख्याही वाढत राहिली. सध्याच्या घडीला तीन हजारांहून अधिक पुस्तकांची संपदा त्यांच्या संग्रही आहे. विविध प्रकारची मासिके, नियतकालिकेही त्यांच्याकडे उपलब्ध असतात. शेतकऱ्यापासून गृहिणींपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत साऱ्यांनाच त्यांच्या या आगळ्या फिरत्या वाचनालयाचा लाभ झाला आहे.

वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांच्या या वाचनालयाचा नियमही अगदीच साधासोपा आहे. वाचनाची आवड असणारा कुणीही केवळ एक रुपया भरून या फिरत्या वाचनालयाचा आजीवन सदस्य होऊ शकतो. एक तपाहून अधिक काळ जीवन इंगळे यांनी हा सेवाभावी उपक्रम अखंडपणे सुरू ठेवला आहे.

आजवर राज्यातील पाचशेहून अधिक शाळा-विद्यालयांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृतीचे मोल विशद करून त्यांना वाचनाला प्रवृत्त केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, या साऱ्या प्रवासात सायकल हीच त्यांचा आधार बनली आहे.

आतापर्यंत तब्बल तीस हजार किलोमीटरचे अंतर त्यांनी सायकलवरून पार केले आहे. त्यांनी अगदी हेमलकसा, आनंदवनपर्यंत सायकलवरूनच मजल मारली आहे. प्रकाश आमटे, डाॅ. विकास आमटे, डाॅ. अभय बंग, पोपटराव पवार, अण्णा हजारे यासारख्या समाजातील मान्यवरांपर्यंत ते पोहोचले आहेत.

त्यांच्या या अनोख्या संकल्पनेची दखल ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेने घेतली आहे. त्यामुळे केवळ राज्यातूनच नव्हे, तर अगदी दुबई, अमेरिकेतूनही त्यांच्याकडे पुस्तकांच्या रुपाने मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आज वयाच्या ६८व्या वर्षीदेखील ते दररोज दहा किलोमीटर सायकल चालवत असतात. आपल्या प्रयत्नातून वाचनसंस्कृतीचे संवर्धन करत असतात.

सर्वोदय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, पाणी बचत, व्यसनमुक्ती, सुदृढ आरोग्य इत्यादी उपक्रम ते यशस्वीपणे राबवीत आहेत. खास करून मुलांसाठी संस्कार वर्गाच्या आयोजनात त्यांचा विशेष पुढाकार असतो. बालसंस्कार हा त्यांच्या आत्मीयतेचा विषय आहे. लहान मुलांवर संस्कार व्हावेत, या दृष्टीने ‘घर तेथे श्यामची आई’ ही संकल्पनाही ते राबवित असतात. मुलांना व्यायामाबरोबरच देशी खेळासाठी ते प्रोत्साहित करत असतात. त्यांच्या या कामगिरीचा विविध पुरस्कारांनी गौरव झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com