
दीपा कदम
मुंबईतल्या कबुतरखान्यांमध्ये जाऊन त्यांना नियमित दाणापाणी करणं ही जैन आणि गुजराती समाजाची परंपरा आहे. माधुरी हत्तीण जरी जैन मठाची असली तरी तिच्यासाठी अख्खं कोल्हापूर तळमळीने रस्त्यावर उतरलं. मुंबईत मात्र तसे होताना दिसत नाही. मुंबईत एकूण ५१ कबुतरखाने आहेत. या कबुतरखान्यांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमध्ये बुरशी, बॅक्टेरिया, परजीवी असतात. कबुतरांची विष्ठा सुकून हवेत मिसळते आणि श्वासावाटे शरीरात जाते. यामुळे सायलोसिस, हिस्टोप्लास्मोसिससारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. उघड्यावर प्राणी- पक्ष्यांसाठी अन्नधान्य टाकले जाऊ नये, असे न्यायालयाचे आदेश असतानाही मुंबईत कबुतरांना जाणीवपूर्वक दाणे टाकले जात आहेत. ताडपत्री टाकून बंद केलेल्या कबुतरखान्यांमध्ये जबरदस्ती शिरकाव केला जातोय, तर कुठे कारवर पत्र्याचे ट्रे लावून कबुतरांना खाद्य पुरवले जात आहे.