कस्तुरबांवरील नवा चरित्रग्रंथ

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा. उद्या ( ११ एप्रिल) त्यांची १५५ वी जयंती आहे.
kasturba gandhi Biography book
kasturba gandhi Biography booksakal

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा. उद्या ( ११ एप्रिल) त्यांची १५५ वी जयंती आहे. त्यानिमित्त डॉ. विश्वास पाटील यांनी सिद्ध केलेल्या ‘कस्तुरबा गांधी - जीवनचरित्र’ या ग्रंथप्रकल्पाविषयी.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यातही महाराष्ट्रात गांधीजी आणि कस्तुरबा यांचे संदर्भ आणि स्थान फार हृदयस्पर्शी आहे.

पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये चलेजाव आंदोलनानंतर अटक झाल्यावर गांधीजींसह कस्तुरबांना तिथे कारावासात ठेवण्यात आले होते. या कारावासातच त्यांचा आजारपणात २२ फेब्रुवारी १९४४ रोजी मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी तिथेच करण्यात आला. आणि आज कस्तुरबांची समाधी त्या जागेवर आहे.

काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभनाताई रानडे यांना आचार्य विनोबा म्हणाले होते की, हे तीर्थक्षेत्र होईल. आज खरोखर भारतातील आणि परदेशातील अनेक अभ्यासक आणि जाणकार लोक ‘आगाखान पॅलेस’ला भेट द्यायला येत असतात. गांधीजी आणि कस्तुरबा यांचे तेथील वास्तव्य ही इतिहासाची पाने आहेत. गांधीजींचे पुत्रवत सचिव महादेवभाई देसाई आणि कस्तुरबा या दोघांच्या समाधी आज तेथे आहेत.

धुळ्यातील शहाद्याचे गांधीविचार आणि चरित्राचे व्यासंगी अभ्यासक डॉ. विश्वास पाटील यांनी गांधीजींवर हिंदीमधून विपुल लेखन केले आहे. ‘कस्तुरबा गांधी- जीवनचरित्र’ हा खंडात्मक चरित्रग्रंथ लिहून मोठे योगदान मराठीतील चरित्रसाहित्याला दिले आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे.

गांधीजींच्या सावलीप्रमाणे कस्तुरबा जगत आल्या, वागत आल्या. मात्र त्यांची चरित्रे फार कमी प्रकाशित झाली. मराठीमध्येच नव्हे तर अन्य कोणत्याही भाषेत नाही इतके तपशीलवार असे पहिलेच कस्तुरबाचरित्र आहे. तब्बल ४७० पानांचा हा ग्रंथ असून लेखकाने पाच विभागात या चरित्राची मांडणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेतील संदर्भसाधनांचा विपुल उपयोग केला आहे.

याबरोबरच गांधीजींची आत्मकथा- सत्याचे प्रयोग, Collected works of Mahatma Gandhi यांचा ठळक आधार लेखकाने घेतला आहे. लेखकाचा अभ्यास त्यात जाणवतो आणि विषयाशी ते किती तादात्म्य झाले होते, हेही पुस्तक वाचताना जाणवते. एका महान स्त्रीचे आणि मातेचे आपण चरित्र लिहित आहोत, ही त्यांची तरल भाववृत्ती आणि त्याला अनुसरून अंगीकारलेली शैली यामुळे चरित्राला अंगभूत वेगळेपण लाभले आहे.

कस्तुरबांच्या चरित्रातील विविध प्रसंग या ग्रंथात वाचायला मिळतात. ग्रंथाच्या परिशिष्टामध्ये कस्तुरबांची काही निवडक भाषणे, गांधींनी त्यांना आणि त्यांनी गांधींना लिहिलेली पत्रे, कस्तुरबांचे हस्ताक्षर आणि तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांशी कस्तुरबांच्या प्रकृतीसंदर्भात गांधींशी केलेला पत्रव्यवहार असा दस्तावेज आहे.

विशेषत: कस्तुरबांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी नियमाप्रमाणे गांधीजी किती कळकळीने तुरुंग अधिकाऱ्यांना पत्र लिहित होते, याचे काही तपशील इथे वाचायला मिळतात. पाचव्या भागात कस्तुरबांचा विस्तृत जीवनपट दिला आहे.

साहित्य- संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी मनोगतात म्हटले आहे : ‘गांधीजी आणि कस्तुरबा यांचे दाम्पत्यजीवन परस्परपूरक व परस्परप्रेरक होते. कस्तुरबांनी शाळेचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. एक समर्पित गृहिणी, अग्रणी नेता, झुंजार स्वातंत्र्यसैनिक अशी त्यांची विविध रूपे आहेत. कस्तुरबांचे जीवन गांधीजींच्या जीवनाशी एकाकार झालेले होते. तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आगळावेगळा कंद होता...’

डॉ. पाटील यांनी प्रस्तावनेत जे लिहिले आहे, त्यातून या चरित्राची दिशा आणि कस्तुरबांचे व्यक्तिगत सामर्थ्य याचा प्रत्यय येतो.

लेखक लिहितात : ‘...कस्तुरबा सामान्य गृहिणी होती. असामान्य आई बनली. बायको बनून आली होती. आई होऊन जगली. गांधीजी विचार करत राहिले. तो विचार ती जगत राहिली. ती केवळ गांधी ग्रंथाच्या समासातील नोंद नव्हती. तळटीप नव्हती. गाळलेली जागा नव्हती. अनेकदा ती स्वगत बनली. अनेकदा कंसातील सूचना बनली. तिचे स्वतंत्र विचारविश्व होते. तिचे आपले म्हणून काही आदर्श होते. तिने सदा नवऱ्याची पाठराखण केली.

तिला आवडो वा न आवडो, तिने नवऱ्याचा पंथ धरला. रुचो वा न रूचो, गांधीजींच्या आवडीनिवडींना आपले मानले. कस्तुरबाने गांधीजींच्या कठोर दुराग्रह आणि प्रकोपाच्या विषाचे नि:शब्द प्राशन केले होते. ती स्वाभिमानी महिला होती. तिने नवऱ्याचा सर्वांगीण विचार आणि साधना अनुभवली होती. या साधनेत आपले मूक पण संपूर्ण योगदान अर्पिले होते. ती गांधींच्या शक्तीची आदिस्त्रोत होती.’

(परिमळामाजी कस्तुरी, या प्रास्ताविक निवेदनातून).

कस्तुरबांचे हे जीवनचरित्र भारतातील सर्व भाषांमधून अनुवादित झाले पाहिजे. कौटुंबिक ताणतणाव आणि चारही मुलांचे संसार, आपल्या सुनांशी असलेले त्यांचे संबंध, या सगळ्यांचे नेमके तपशील यात आहेत. दक्षिण आफ्रिका आणि भारतातील वास्तव्यात कस्तुरबांशी ज्यांचा संपर्क आला, अशांची व्यक्तिचित्रे छान उतरली आहेत. 'सत्याचे प्रयोग 'या गांधीजींच्या आत्मकथेत कस्तुरबा आहेत; पण त्यात त्या झाकोळल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी ज्यांना ‘जगदंबा’ म्हटले, त्या जगदंबेचे विश्व किती मोठे होते आणि ती किती सामर्थ्यवान होती, याचा एक चैतन्यदायी प्रत्यय विश्वास पाटील यांच्या या ग्रंथामुळे वाचकांना येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com