
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिक कृष्ण त्रयोदशी (मंगळवार ता. २२ नोव्हेंबर) आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथे कार्तिक कृष्ण त्रयोदशी (मंगळवार ता. २२ नोव्हेंबर) आहे. संजीवन समाधी म्हणजे जिवंतपणी समाधी घेणे असे नाही, तर चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत त्याठिकाणी ब्रह्मभावाने स्थिर राहावे, असा बोध आहे.
श्री ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी ही श्री क्षेत्र आळंदी येथे आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी नेमक्या कोणत्या स्वरूपाची आहे, अशी आशंका अनेकांच्या मनी निर्माण होते. यासाठी प्रथमतः समाधी म्हणजे काय याचा विचार करणे आवश्यक आहे. ‘समधीयते अनेन इति समाधी।’ ज्याच्याद्वारे अंतःकरणाचे समाधान केले जाते त्यास समाधी म्हणतात. समाधी या शब्दामध्ये ‘चिंतायाम्।’ हा मूळ धातू आहे म्हणजे. ज्या साधनाद्वारे भगवंताचे चिंतन केले जाते, त्यास समाधी असे म्हणतात. या प्रकारे समाधीचे शब्दमर्यादेत चिंतन आहे.
समाधीचा विचार प्रामुख्याने योग आणि वेदांत शास्त्रात केला आहे. वेदांत शास्त्रामध्ये निर्गुण ब्रह्माच्या प्राप्तीसाठी निदिध्यासन नावाचे साधन प्रतिपादन केले आहे. या साधनात अनात्माकार वृतीचा परित्याग करून वृत्तीचा आत्माकार प्रवाह अखंड सुरू ठेवावा लागतो. हे निदिध्यासन परिपक्व होते त्या अवस्थेला समाधी असे म्हणतात. योग शास्त्राचे सूत्रकार भगवान पंतजलींनी अष्टांग योगातील एक महत्त्वाचे अंग समाधी आहे. तिचे विवरण करण्यासाठी योग सूत्रातील समाधीपाद नावाचा एक विभाग खर्ची घातला आहे. त्यात योगशास्त्राच्या दृष्टीने समाधी म्हणजे काय त्याचे स्वरूप काय याचा अतीव सूक्ष्म विचार केला आहे. त्यात निर्बीज समाधीचा विचार सांगताना श्री पंतजली मुनी समाधीपादाच्या अखेरीस सांगतात,
तस्यापि निरोधे सर्वनिरोधान्निर्बीजः समाधिः॥१.५१॥
ऋतंभरा प्रज्ञा जन्य संस्कार नाहीसे झाल्यानंतर प्राप्त होणाऱ्या अवस्थेला निर्बीज समाधी म्हणतात. असा बराच विचार योगशास्त्रात समाधीसंबंधाने आला आहे. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संतांनी समाधीचा अंगीकार केला आहे. चित्कला मुक्ताईंनी समाधी घेतली आहे. या विषयी श्री नामदेव महाराज म्हणतात,
कडाडली वीज निरंजनीं जेव्हां । मुक्ताई तेव्हां गुप्त जाली ॥
गेलें निवारूनी आकाश अभूट । नामा म्हणे कोठें मुक्ताबाई ॥
एकदम विजेचा कडकडाट झाला आणि मुक्ताई आकाशात गुप्त झाली. हा जो चित्कला मुक्ताईनी स्वीकार केलेली समाधी आहे, ती आकाश समाधी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी समाधीचा अंगीकार केला आहे, तो जल समाधीचा आहे. काही संतांनी स्थल समाधीचा अंगीकार केला आहे. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अंगीकार केलेल्या समाधीविषयी श्री नामदेव महाराज म्हणतात,
देव आणि निवृत्ती यानी धरीले दोन्ही कर ।
जातो ज्ञानेश्वर समाधीस ॥
जाउनी ज्ञानेश्वर बैसले असनावरी । पुढे ज्ञानेश्वरी ठेवीयेली ॥
भीम मुद्रा डोळा निरंजनी लीने । झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥
ज्ञानराज माऊलींनी अंगीकारलेली समाधी आहे ती ‘संजीवन समाधी’ आहे. माऊली हे ज्ञान, भक्ती, योग या सर्वच क्षेत्रातील राजे आहेत. माऊलींची समाधी संजीवन आहे याचे कारण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच माझी समाधी ही संजीवन आहे असे प्रतिपादिले आहे. माऊली सांगतात,
समाधी साधन संजीवन नाम । शांती दय सम सर्वाभूती ।
शांतीची पै शांती निवृत्ती दातारु । हरिनाम उच्चारु दिधला तेणे ॥
परमशांती प्रदान करणाऱ्या सद्गुरू श्रीमन्निवृत्तीनाथानी जो मला हरिनामाचा उपदेश केला त्यामध्ये माझ्या समाधीला संजीवनता प्रदान करण्याचे सामर्थ्य आहे. या हरिनाम दिक्षेमुळे प्राप्त झालेल्या माऊलींची समाधी संजीवन स्वरूपाची अलौकिक समाधी आहे.
शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची संजीवकता त्यांच्या चरित्राच्या व वाङ्मयाचेद्वारा स्पष्ट केली आहे. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज म्हणतात,
श्रीज्ञानदेंवे येवुनी स्वप्नांत।
सांगितली मात मजलागी॥१॥
दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा।
परब्रम्ह केवळ बोलत असें॥२॥
अजान वृक्षाची मुळी कंठास लागली।
येवुनिं आळंदी स्थळी काढ वेगी॥३॥
ऐसे स्वप्न होता आलों अलंकापुरी।
जव नंदी माझारी देखिंले व्दार॥४॥
एका जनार्दनी पूर्व पुण्य फळलें।
श्रीगुरु भेंटलें ज्ञानेश्वर॥५॥
माऊलींच्या समाधीनंतर साधारण अडीचशे वर्षांनी ज्यांचा अवतार झाला, असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की माऊलींनी मला स्वप्नात येऊन ज्या अजानवृक्षाच्या सान्निध्यात मी समाधी घेतली आहे त्या अजानवृक्षाची मुळी माझ्या कंठास लागली आहे. हा स्वप्नदृष्टांत जेव्हा झाला, तेव्हा श्री नाथ महाराज अलंकापुरी आले आणि नंदीजवळची शिळा दूर करून समाधीस्थानी गेले तेव्हा दिव्य तेजःपुंज ब्रह्मरूप श्रीगुरू ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन झाले. अशा संजीवन स्वरूपाची श्री माऊली ज्ञानोबारायांची समाधी आहे. संजीवन समाधी महोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानीयांचे राजे महाकैवल्यतेजोनिधी माऊली श्री ज्ञानोबारायांना विनम्र अभिवादन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.