किशाभाऊंचे स्वप्न सत्यात उतरताना...

२३ एप्रिल हा दिवस स्व-रूपवर्धिनीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार
Kishabhau Patwardhan swarupvardhini
Kishabhau Patwardhan swarupvardhini
Summary

२३ एप्रिल हा दिवस स्व-रूपवर्धिनीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार

स्व-रूपवर्धिनीच्या चऱ्होली (जि. पुणे) येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन रविवारी (ता.२३) होत आहे. त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मांडलेले विचार..

२३ एप्रिल हा दिवस स्व-रूपवर्धिनीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. या दिवशी आळंदीजवळील चऱ्होली येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आणि प्रस्तावित वसतिगृहाचे भूमिपूजन विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिताताई भिडे यांच्या हस्ते होणार आहे.

वर्धिनीच्या परिवारातील सर्व सदस्य आणि हितचिंतकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. कौशल्य विकास केंद्राच्या वास्तूचे पूर्ण झालेले बांधकाम ही विशिष्ट उद्देशाच्या पूर्ततेसाठी चिकाटीने व ध्येयधुंदीने (पर्पज, पर्सीव्हरन्स अँड पॅशन) केलेल्या प्रयत्नांची कहाणी आहे. समाजातील वंचित व उपेक्षित घटकांमधील मुली व महिलांना उपजीविकेसाठी उत्तम कौशल्ये पुरवणे, हा यामागचे वर्धिनीचा मुख्य उद्देश.

कै. किशाभाऊ पटवर्धन यांनी १९७९मध्ये मंगळवार पेठेत स्व-रूपवर्धिनीची सुरवात केली. तेथेच नंतर उभ्या राहिलेल्या वास्तूत पेठा व वस्ती भागातील मुलांसाठी बालवाडी सुरू झाली. या मुलांना सोडण्यासाठी येणाऱ्या आयाबायांसाठी काही व्यावसायिक प्रशिक्षणाचे वर्ग सुरू झाले. कै. पुरुषोत्तमभाई श्रॉफ आणि कुंतीताई मुजूमदार यांचा त्यात पुढाकार होता.

त्यातून प्रारंभी शिवणवर्ग सुरू झाला. समाजातील वृद्ध नागरिक आणि घरीच अंथरुणावर खिळून पडलेल्यांची शुश्रुषा ही समस्या लक्षात आली. केईएम रुग्णालयाच्या संचालक कै. बानु कोयाजी यांच्या मार्गदर्शनातून १९९० मध्ये सहायक परिचर्या वर्ग (असिस्टंट नर्सिंग कोर्स) सुरू झाला. अशी विविध कौशल्ये व रुग्णसेवा प्रशिक्षणामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील पाच हजारांहून अधिक महिला व त्यांची कुटुंबे पायावर उभी राहिली. स्व-रूपवर्धिनीला त्याचा अभिमान वाटतो.

समाजातील मोठ्या वर्गाला दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढून स्वाभिमानाने व प्रतिष्ठेने जगण्याची संधी मिळायला हवी. त्या दृष्टीने महिलांसाठी विविध प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता येईल का, असा विचार कै. किशाभाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात आला.

त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, २००४ मध्ये किशाभाऊंचे दुःखद निधन झाले. पण त्यांचे स्वप्न वर्धिनीच्या कार्यकर्त्यांनी विरू दिले नाही. संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमभाई श्रॉफ यांनी २००७ मध्ये चऱ्होलीजवळची स्वतःची एक एकर जागा वर्धिनीला देणगी स्वरूपात दिली.

या जागेवर कौशल्य विकास केंद्राची इमारत उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. कालांतराने पुरुषोत्तमभाईंचे निधन झाले, तरी शिरीष पटवर्धन व वर्धिनीच्या टीमने या स्वप्नांचा पाठपुरावा सुरूच ठेवला.

या वास्तूच्या उभारणीत अनेक अडथळे होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात चऱ्होली परिसरात रस्ता होता, तरी तो प्रत्यक्ष जागेपर्यंत २०१८पर्यंत पोचला नव्हता. दरम्यानच्या काळात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वास्तूच्या बांधकाम आराखड्याला महापालिकेची परवानगी मिळायला नोव्हेंबर २०१९ उजाडला. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले, तर चार महिन्यांतच कोरोनाची साथ सुरू झाली.

मोठ्या प्रमाणावर निधी उभारण्याचे आव्हानही कार्यकर्त्यांपुढे होते. परंतु, निराश न होता व न थकता ध्येयाचा पाठपुरावा करणे यालाच तर जिद्द म्हणतात. त्यासाठी शिरीष पटवर्धनांनी केलेल्या प्रयत्नांचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. मदतीसाठी अनेक व्यक्ती, संस्था व उद्योग पुढे आले. या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या मोठ्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.

विस्ताराचे नवे पाऊल

कौशल्य विकास केंद्र हे स्व-रूपवर्धिनीच्या विस्ताराचे नवे पाऊल आहे. या जूनपासून तिथे नवे प्रशिक्षण वर्ग सुरू होतील. महिलांसाठी विविध व्यावसायिक कौशल्ये- विशेषतः आरोग्य क्षेत्राशी संबंधित सहायक कौशल्यावर (पॅरामेडिकल) त्यात भर असेल.

तसेच, फिरत्या प्रयोगशाळेचे आधारभूत केंद्र म्हणून नवी सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा तिथे उभारण्यात येईल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थ्री डी प्रिंटिंग आदी आघाड्यांवरील नवोन्मेष केंद्रेही तिथे साकारतील.

मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात स्व-रूपवर्धिनी पुढील काळात एक आघाडीची संस्था म्हणून पुढे येईल, असा मला विश्वास आहे. विद्यार्थ्यांना केवळ रोजगारक्षम बनवण्यापुरते वर्धिनीचे उद्दिष्ट सीमित नाही, तर समाजाच्या बदलत्या गरजांचे भान राखत भविष्यातील कौशल्यांचे प्रशिक्षण देणारे केंद्र यातून उदयाला येईल. या प्रकल्पाची योजना आखतानाच ग्रामीण व आदिवासी भागातील युवतींसाठी निवासी वसतिगृहाची कल्पना वर्धिनीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होती. त्याचे भूमिपूजनही यावेळी होत आहे. या वसतिगृहाच्या

बांधकामासाठी आणि कौशल्य विकास केंद्राच्या संचालनासाठी समाज वर्धिनीला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास वाटतो. मात्र, केवळ आर्थिक मदत नव्हे, तर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या सक्रिय सहभागाची वर्धिनीला आता आवश्यकता आहे.

स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षांत विकसित भारताचे स्वप्न साकारण्याच्या देशव्यापी प्रयत्नांतील वर्धिनीचा हा खारीचा वाटा असणार आहे. आत्मविश्वासाने भारलेली व आत्मनिर्भर युवा पिढीच्या घडणीतून आत्मनिर्भर भारताकडे जाण्याचा हा मार्ग आहे.

चार दशकांची वाटचाल

स्व-रूपवर्धिनीने गेल्या ४३ वर्षांत विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहताना मला केवळ विश्वस्तांमध्येच नव्हे, तर सर्व युवा कार्यकर्त्यांमध्ये समाजाबद्दलची अतीव संवेदनशीलता व बांधिलकी दिसते. समाजाला भेडसावणारा एखादा प्रश्न नजरेस आल्यावर स्वस्थ न बसता त्याच्या सोडवणुकीसाठी वर्धिनीचे कार्यकर्ते प्रयत्न करतात. त्यासाठी नव्या उपक्रमांची योजना करतात.

सायंकालीन शाखा, बालवाडी, फिरती विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गरजू महिलांसाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण या सर्वांतून वर्धिनीच्या संस्थापकांची ध्येयदृष्टी आपल्या नजरेस पडते. हा स्व-रूपवर्धिनीच्या कार्याचा आत्मा आहे. तो संस्थेचे केवळ वर्तमान घडवत नाही, तर त्याच्या भविष्याचीही घडण करत आहे. एक ‘दुर्दम्य आशावादी’ म्हणून स्व-रूपवर्धिनीच्या उज्ज्वल भविष्याबद्दल संपूर्ण विश्वास वाटतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com