#यूथटॉक  पर्यावरणाचा नाट्यजागर...

कोमल खामकर
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

पर्यावरण या विषयावर आज लिहिले, बोलले खूप जात आहे; परंतु तो आपल्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न आहे आणि आपलीदेखील त्याविषयी जबाबदारी आहे, याची जाणीव मात्र ठेवली जातेच, असे नाही. मानवाच्या अतिहव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास होत आहे आणि त्याला आपण ‘विकास’ म्हणतो आहोत; परंतु आपल्याला हे कळत नाही की, आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या मार्गावर चालत आहोत. निसर्गाचं चक्र असंतुलित होण्याला माणसाचा स्वार्थ आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. पर्यावरणातील मानवाच्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे विविध पर्यावरणीय समस्या आज आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.

पर्यावरण या विषयावर आज लिहिले, बोलले खूप जात आहे; परंतु तो आपल्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न आहे आणि आपलीदेखील त्याविषयी जबाबदारी आहे, याची जाणीव मात्र ठेवली जातेच, असे नाही. मानवाच्या अतिहव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास होत आहे आणि त्याला आपण ‘विकास’ म्हणतो आहोत; परंतु आपल्याला हे कळत नाही की, आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या मार्गावर चालत आहोत. निसर्गाचं चक्र असंतुलित होण्याला माणसाचा स्वार्थ आणि बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. पर्यावरणातील मानवाच्या अनियंत्रित हस्तक्षेपामुळे विविध पर्यावरणीय समस्या आज आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळेच पर्यावरण या विषयाला घेऊन ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ नाट्यसिद्धांताचे रंगकर्मी मंजुल भारद्वाजलिखित आणि दिग्दर्शित ‘पर्यावरण’ हे नाटक  जनसामान्यापर्यंत पोहोचवू पाहत आहेत. 

‘पर्यावरण’ नाटकात मी सहभागी झाले, याचे कारण माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे निसर्ग माझ्यापासून दुरावत चालला आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या कृत्रिम विकासामुळे माझं आणि निसर्गाचं अनमोल नातं तुटत चाललं आहे. एकीकडे आपण सुखी आणि सुंदर आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहतो; पण खरंच विचार केला पाहिजे, की आपलं सुख लालसेत तर बदलत नाहीये ना ? मी रंगकर्मी आहे. माझ्या कलात्मक साधनेनं आणि अभिनयानं सकारात्मक कर्म करत जगाला मानवतेच्या रंगानं मी रंगवू पाहतेय, प्रत्येकातला मानवीय निसर्ग जगवू पाहतेय. 

‘पर्यावरण’ हे नाटक केवळ निसर्ग वाचवण्यासाठीच नाही, तर प्रत्येक माणसात माणुसकीची संवेदना, भावना आणि विचार जागवते. आज माणुसकीला नावीन्याने अंकुरित करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. तसे झाले तर ही पृथ्वी, आपली भूमी अनंत काळासाठी चांगली राहू शकेल. नाटकानं आयुष्य बदलतं. नाटक केवळ मनोरंजन, प्रबोधन, संदेश पोचवण्यापुरतं मर्यादित नसतं. या नाटकाची बांधिलकी परिवर्तन घडवण्याची आहे. नाटक म्हणजे व्यक्तीला, समाजाला, जगाला सकारात्मक आणि कलात्मक दिशा दाखवण्याचा मार्ग आहे. मात्र, या मार्गावरून सगळेच चालतात असं नाही. मी याचा अनुभव घेतला. ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ नाट्यसिद्धांताच्या माध्यमाने स्वतःतल्या कलाकाराला ओळखलं आणि या मार्गावर निरंतर चालण्याचा निर्णय घेतला. चंदेरी दुनिया, झगमगाटापेक्षा मला माझी कला जनकल्याणासाठी कटिबद्ध असावी, असं वाटतं.

पर्यावरणीय संतुलन जपण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी प्रत्येकाची आहे. प्रत्येकाचा सहयोग इथं अपेक्षित असतो. त्यातल्या एकानंही लालसेपोटी स्वतःचा स्वार्थ साधला किंवा होणाऱ्या घटनेकडं दुर्लक्ष केलं तर संपूर्ण चक्र बिघडतं. आज तीच स्थिती उद्भवली आहे. पृथ्वीतलावरील लोकसंख्येपैकी केवळ दोन टक्के लोकांकडे आर्थिक स्वायत्तता असल्यामुळे सर्व नैसर्गिक संसाधनांचा निर्णय तेच घेतात. हेच दोन टक्के लोक बाकी ९८ टक्के लोकांना आणि निसर्गाला ‘भस्म्या’ झाल्यासारखे लुटत आहेत. यांच्या लुटण्याच्या वेगाला ना मर्यादा आहे, ना अंत. अशा परिस्थितीत कलावंतांनी प्रत्येक माणसाला आपल्या कलासाधनेनं जागृत करून, त्यांना स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद प्रदान करणं आवश्‍यक आहे आणि ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’चे रंगकर्मी या विषयाच्या माध्यमातून प्रत्येकामध्ये विवेक जागवत आहेत. जनसामान्यांत ही जागरूकता आणण्याचा हा प्रयत्न अशासाठी आहे की, ‘आता नाही तर मग कधीच नाही.’ या नाटकाच्या माध्यमातून आम्ही केवळ प्रश्न नाही मांडणार किंवा नुसते रेडीमेड समाधानही नाही देणार, तर आम्ही यातून प्रेक्षकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. त्याचबरोबर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी स्वतःची भूमिका स्पष्ट करण्यासाठीही त्यांना तयार करणार आहोत. हे नाटक ‘जगाच्या कोणत्या टोकावर काय होतंय, त्याचा माझ्याशी काय संबंध?’ या मानसिकतेवर थेट प्रहार करते. कुठलीही दुर्घटना झाली की ‘वाईट झालं!’ एवढं बोलून पुन्हा आपापल्या कामात व्यग्र होण्याऐवजी परिवर्तनाच्या विचारांना कृतीत आणले, तरच अपेक्षित बदल होऊ शकतील. गणेशोत्सवाच्या निमित्तानं, ‘पर्यावरण वाचवूया, मानवतेला जगवूया’ हा विचार घेऊन, कलात्मक साधनेच्या माध्यमातून आपल्या जननीला, म्हणजेच वसुंधरेला सुरक्षित करण्याची जाणीव आम्ही प्रत्येकात निर्माण करण्याचा ‘विवेकजागर’ करत आहोत. भविष्यात जीवन सुंदर व्हावं, यासाठी वर्तमानात पाऊल उचलणं गरजेचं आहे. आज पृथ्वीचं संवर्धन केलं, तरच भावी पिढीचं रक्षण होईल, यात शंका नाही.

(लेखिका मुंबईस्थित ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’च्या रंगकर्मी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: komal khamkar article youthtalk Environment