नव्या पद्धतीने शिकू आनंदे

a l deshmukh
a l deshmukh

मार्च महिन्यात शालान्त परीक्षा सुरू होत आहे. या वर्षीपासून या परीक्षा ‘ज्ञानरचनावाद’ या तत्त्वानुसार होत आहेत. शिक्षणातून सांगकाम्यांच्या फौजा तयार करायच्या नसून सर्जनशील मनुष्यबळ घडवायचे आहे. त्या दृष्टीने या संकल्पनेचे मर्म विशद करणारा लेख.

२ ००५ चा राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा व २०१० चा राज्य शैक्षणिक आराखडा यामध्ये महाराष्ट्राची सद्य शैक्षणिक स्थिती नेमकी काय आहे हे मांडले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत, ते पुढीलप्रमाणे ः १) ज्ञानाचे नाते शाळेबाहेरील जीवनाशी जोडणे म्हणजेच विद्यार्थ्यांना ज्ञानाचे उपयोजन करायला शिकवणे. २) शिक्षण घोकंपट्टीमुक्त करणे म्हणजेच पाठांतराचे प्रमाण कमी करणे, ३) अभ्यासक्रम पाठ्यपुस्तिकापलिकडे नेणे. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनास प्रवृत्त करणे. ४) तार्किक क्षमता व सर्जनक्षमता विकसित करणे. कृतीवर भर देणे. ५) परीक्षापद्धत लवचिक करणे. ६) सद्यःस्थिती किंवा आधुनिक परिस्थितीला सामोरे जाणे. ७) लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढविणे. वरील मुद्दे पायाभूत मानून जून २०१८ पासून इयत्ता पहिली, आठवी व दहावीसाठी नवा अभ्यासक्रम, नवी पाठ्यपुस्तके व नवी मूल्यमापन पद्धत सुरू झाली आहे. ही नवी प्रणाली ‘ज्ञानरचनावाद’ या तत्त्वज्ञानावर आधारित आहे.

ज्ञानरचनावाद शिकण्यासंबंधीचे एक तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वज्ञानाचे एक गृहीत असे आहे की, विद्यार्थी आपल्या अनुभवांचा चिकित्सक विचार करून ज्या जगात आपण राहतो त्या जगाबद्दलचे आकलन आपले आपणच विकसित करणे. त्या आकलनाची आपली म्हणून वेगळी रचना तो करीत असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकणे म्हणजे आपल्या मानसिक प्रतिमानांशी जुळवून घेण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास किंवा उजळणी करताना गटात चर्चा करणे, त्यावरून निष्कर्ष काढणे, निष्कर्ष काढण्यास अडचण आली तर शिक्षकांचे, पालकांचे मार्गदर्शन घेणे, अपेक्षित आहे. ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग म्हणजे आपले पूर्वानुभव किंवा पूर्वज्ञान वापरून त्याचा नव्या ज्ञानाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करणे. प्रत्येकाचे पूर्वानुभव वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रतिसादातील विविधता आणि वेगवेगळेपणा हे  ज्ञानरचनावादामध्ये अपेक्षित आहे. विचार करणे, तो व्यक्त करणे, शंका काढणे, आपली जिज्ञासा, कुतूहल सतत जागृत ठेवणे, अवांतर-पूरक-संदर्भीय वाचन करणे, आंतरजालाचा वापर करणे, आपले आपण शिकण्यास समर्थ होणे इत्यादी गोष्टी ज्ञानरचनावादाचे फलित आहे. हे सर्व संशोधन प्रक्रियेशी जोडले तर अधिक चांगले.

ज्ञान प्रेषित होत नसून ज्ञानाची निर्मिती होत असते. निर्माण झालेल्या ज्ञानावर भर देण्यापेक्षा ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेवर भर दिला जातो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, शिकवण्यापेक्षा शिकावे कसे हे शिकवणे यावर भर दिला जातो. ज्ञान एका साठ्यातून घेऊन दुसरीकडे हस्तांतरीत करायचे नसते. ज्ञान निर्मितीसाठी बुद्धीला चालना देणारे वातावरण शैक्षणिक संस्थांनी निर्माण करून द्यावे. नवे घटक समजून घेत असताना स्वमत, स्वानुभव, स्वविचार, स्वकल्पना, स्वप्रयत्न याला ज्ञानरचनावादात फार महत्त्व आहे. काय, कसे आणि किती वेळ शिकायचे याचे निर्णय शिकणाराने स्वतःच घ्यायचे असतात. क्रियाशीलता, सहकार्य, विचारप्रक्रिया व संशोधन यामधून आपोआप शिक्षण घडते.

चार भिंतींच्या आत, बाकांच्या गराड्यात आणि ५०-६० विद्यार्थी असलेल्या वर्गात ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकविणे अवघड आहे; पण अशक्‍य नाही. यापुढील काळात आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर ज्ञानरचनावादाचा अवलंब करावाच लागेल. ज्ञान हे विद्यार्थ्यांकडून आणि विद्यार्थ्यांमधेच निर्माण होत असते, विकसित होत असते हा विचार मनात ठेवून वर्गाध्यापन व्हावे. ज्ञानरचनावादी पद्धतीने शिकवायला नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेळ जास्त लागतो. शिक्षकांना त्यांच्या परंपरागत अध्यापन पद्धती, मानसिकता, दृष्टिकोन, कृती किंवा विचार करण्याच्या पद्धती बदलाव्या लागतील. जो घटक शिकवायचा आहे, त्याची उद्दिष्टे काय आहेत, त्याच्या आशयात कोणत्या रचना लपलेल्या आहेत, त्या शोधल्या पाहिजेत. शिकवता-शिकवता मूल्यमापन कसे करायचे, हे समजून घेतले पाहिजे. वर्गरचनेत लवचिकता आणली पाहिजे. दोन जवळच्या बाकांवरच्या ६-६ विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्यामध्ये गटचर्चा व आंतरक्रिया घडवून आणल्या पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला नवे काम आणि भागीदार मिळाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, स्वयंअध्ययन कसे होते, याचे प्रत्यंतर येते, तसेच स्वतः शिकावे, कसे याचा अनुभव मिळतो. वर्गशिक्षकाने आपल्या वर्गातील ६/६, ७/७ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाकरिता कायमस्वरूपी गट करावेत. हे गट घरी, शाळा सुटल्यानंतर शाळेत सतत गटचर्चा करतील. शिक्षकांनी गृहपाठ म्हणून गटचर्चेसाठी उपयुक्त किंवा पूरक प्रश्‍न द्यावेत, यामधून आपोआप नकळत ज्ञानरचनावाद रुजेल.

शिकणे म्हणजे भोवतालच्या परिस्थितीचा अर्थ लावण्यासाठी चालविलेला शोध आहे. अर्थ समजण्यासाठी चालविलेला शोध आहे. अर्थ समजण्यासाठी संपूर्णतः किंवा भागशः आकलनाची आवश्‍यकता असते. त्यामुळे शिक्षणप्रक्रिया सुट्ट्या भागावर लक्ष केंद्रित न करता मूलभूत संबोधांवर लक्ष केंद्रित करते. चांगले शिकण्यासाठी शिकणाराची मानसिकता कशी आहे हे समजून घेणे आवश्‍यक आहे. शिकण्याचा हेतू केवळ बरोबर उत्तरे पाठ करणे, लक्षात ठेवणे किंवा कुणीतरी सांगितलेल्या अर्थांचे चर्वण करणे नव्हे तर शिकणाऱ्याने स्वतःच्या अर्थांची आपली अशी रचना तयार करणे अपेक्षित आहे. शिकणारा प्रत्येक जण अद्वितीय असतो, त्याला आतून काहीतरी वाटते म्हणून तो शिकत असतो. शिकण्याची प्रेरणा अंतःस्फूर्त असते. ती बाह्य प्रलोभनांवर अवलंबून नसते. त्यामुळे मिळालेल्या माहितीच्या पलीकडे जाणे शिकणाराला शक्‍य होते. शिकणारा हे सर्व आपल्या मानसिक प्रक्रियेच्या साहाय्याने करीत असतो. बोर्ड परीक्षेच्या कृतिपत्रिका सोडविण्यासाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे सर्व लक्षात घ्यावे; तसेच प्रत्यक्ष परीक्षेत कृतिपत्रिका सोडवताना याचा वापर करावा. शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्यांना फक्त प्रोत्साहन द्यावे, सुसंवाद साधावा, चर्चा कराव्यात म्हणजे अपेक्षित यश निश्‍चित मिळेल.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात अनेक प्रयत्न करूनही शिक्षण हे शिक्षककेंद्रीच राहिले आहे. शिक्षण ही शिक्षक आणि विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थी, समाज आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रियातून विकसित होणारी प्रक्रिया असून तिच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आहे. हा मूलभूत विचार आहे. प्रत्यक्षात असे घडत नाही. शिक्षणप्रक्रियेत शिक्षकाला मुख्य स्थान व विद्यार्थ्याला दुय्यम स्थान दिले गेले. शिक्षक अधिक क्रियाशील - कृतिशील व विद्यार्थी अधिक आळशी बनत चालले. शिक्षक ज्ञान देणारा, विद्यार्थी ते निमूटपणे घेणारा या भूमिका पक्‍क्‍या झाल्या. त्याचा परिणाम संपूर्ण समाजात दिसू लागला. बॉस सांगेल तेवढेच आपले काम, तेवढेच आपण करायचे ही विचारसरणी दृढ झाली. सांगकाम्यांच्या फौजाच फौजा तयार झाल्या. स्वतः विचार करणे, निर्णय घेणे, स्वानुभव वापरणे, नावीन्यपूर्ण कल्पना सुचवणे, स्वमत व्यक्त करणे, प्रत्येक काम माझे आहे या भावनेने करणे हे विचार मागे पडले. ज्ञानरचनावादी पद्धतीमधून हे सर्व साध्य होईल. विद्यार्थ्यांना हे संस्कार शाळेतून झाले की उद्याचे नागरिक सक्षम, समर्थ, सकारात्मक तयार होऊन समाज निकोप होईल, विकासाकडे वाटचाल सुरू होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com