‘भारत’ संकल्पनेचा प्रभावी भाष्यकार

लक्ष्मीकांत देशमुख
मंगळवार, 14 जानेवारी 2020

महान उर्दू शायर कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दीची सांगता (१४ जानेवारी) आज होत आहे. त्यानिमित्त त्यांचे मोठेपण विशद करणारा लेख.

भारताचे एक श्रेष्ठ लेखक प्रेमचंद यांनी निव्वळ रंजनवादी लेखनाचा कडकडीत निषेध करीत ‘हमें खूबसूरती का मेयार बदलना होगा,’ असं म्हणत सौंदर्यवादाची नवी व्याख्या केली. कामगारांच्या-शेतकऱ्यांच्या श्रमानं थकलेल्या चेहऱ्यात आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्त्रीच्या राठ पडलेल्या हाताच्या घट्ट्यात सौंदर्य पाहायला कलावंतांनी आपली नजर विकसित केली पाहिजे, असे ते म्हणत. साहित्याविषयक जाणिवांवर पडलेल्या या प्रभावातून कैफी आझमी नावाच्या शायराकडे वळलो आणि त्यात गुंततच गेलो. ‘झनकार’, ‘आखिर-ए-शब’ आणि ‘आवारा सजदे’ या काव्यसंग्रहातल्या उच्च दर्जाच्या शायरीसोबत ‘हीर रांझा’ आणि ‘गर्म हवा’ या दोन हिंदीमधल्या माइलस्टोन चित्रपटांची पटकथा व संवाद (हीर रांझाचे तर पूर्ण पद्यमय संवाद) आणि ‘इप्टा’साठी लिहिलेली ‘आखरी शमा’, ‘जहर-ए-इश्‍क’ व ‘हीर रांझा’ ही काव्यमय नाटकं आणि दोन खंडातलं ‘नई गुलिस्ताँ’ खुमासदार गद्य व्यंग्यलेखन अशा साहित्याच्या सर्व महत्त्वाच्या प्रकारातलं लेखन कैफींनी केलं होतं; म्हणून त्यांना विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ उर्दू साहित्यिक म्हटलं जातं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

थक्क करणारी कविता
‘औरत’, ‘साँप’, ‘जिंदगी’, ‘दोपहर’, ‘नोहा’, ‘बहुरूपनी’ या व अशा अनेक कविता-नज्म ऐकताना आपण थक्क होतो. ‘औरत’सारखी स्त्रीच्या स्वातंत्र्य व समतेची कविता भारतीय साहित्यात दुसरी नाही; तसेच हिंदू-मुस्लिम धर्मांधतेवर भाष्य करणाऱ्या ‘दुसरा बनवास’, ‘सोमनाथ’, ‘साँप’, ‘बहुरूपनी’ आणि ‘लखनऊ तो नहीं’ यांसारख्या सेक्‍युलॅरिझमचा पुरस्कार करणाऱ्या कविता भारतीय साहित्यात लिहिणारे कदाचित कैफी एकमेव असावेत - नव्हे आहेत! त्या कविता कलात्मक आहेत. त्यांना सुंदर शब्दकळा लाभली आहे. हिंदू धर्म व इस्लाममधील वेचक संदर्भ घेत लिहिल्या आहेत. त्यामुळे ते अस्सल काव्य तर आहेच; पण त्याहून जास्त ते ‘आयडिया ऑफ इंडिया’ संकल्पनेचं काव्यमय भाष्य आहे!

कैफी आझमींचं जीवनही नाट्यपूर्ण आहे. घरात आधुनिक इंग्रजी शिक्षणाचं वातावरण असताना धार्मिक उपरती होऊन वडिलांनी कैफींना मदरशात धार्मिक शिक्षणासाठी पाठवणं; पण तिथून मौलवी न बनता मार्क्‍सवादी बनून बाहेर पडणं, जमीनदारीचा आराम सोडून १९व्या वर्षी समाजवादाच्या विचारानं भारावून जात कम्युनिस्ट होणं, हिंदी सिनेमातल्या प्रेमकथाही फिक्‍या वाटाव्यात असं प्रेमप्रकरण करणं, त्यात स्वत:च्या रक्तानं प्रेमपत्र लिहिणं; मग चित्रपटसृष्टीची चढ-उताराची कारकीर्द, पन्नाशीत अर्धांगवायू होऊन उर्वरित आयुष्य व्हीलचेअरवर जगणं, त्याची पर्वा न करता देशभर मुशायरा, पार्टीचं अथक काम... असं समृद्ध जीवन ते जगले. आयुष्याच्या अखेरीस दोन-अडीच वर्षं त्यांनी केवळ आपल्या गावाच्या विकासाला वाहून घेतले.

जागतिकीकरणाच्या रेट्यात, पैशाचं मोल वाढताना, माणसाचं महत्त्व संपताना कैफी आझमी यांचं उन्नत माणसाचं स्वप्न सतत आठवायला हवं... कैफीचा आवाज ऐकायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laxmikant deshmukh article Kaifi Azmi