esakal | मन मंदिरा... : शिकणं अवघड जातंय?
sakal

बोलून बातमी शोधा

child girl

मन मंदिरा... : शिकणं अवघड जातंय?

sakal_logo
By
- डॉ. विद्याधर बापट

अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं एक छान वाक्य आहे. –

“Everybody is a Genius. But if you judge a fish by it’s ability to climb a tree, it will live it’s whole life, believing that it is stupid”

दोन वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्यासमोर स्वरा बसली होती. वय वर्षे ६. अतिशय गोंडस, लाघवी; पण थोडी जास्त चुळबुळ करणारी. टेबलवरचे पेपरवेट, पेन, टाचण्या वगैरे घेऊन काहीतरी आकार बनवण्यात मग्न. स्वत:च्याच विश्वात हरवलेली. आत्ममग्न. तिचं  ते हरवून जाऊन निर्मिती करणं सुद्धा बघत रहाव इतकं गोड होतं. तिची आई अस्मिता मात्र चिंतातूर, व्याकूळ. ‘सर, सगळे प्रयत्न करून झाले, रागवून झालं, प्रेमानं समजावून झालं, शिक्षा करून झाली. पण काहीही प्रगती नाहीय हीच्यात. ना धड नीट लिहिता येतं  ना धड वाचता येतं. साधे साधे शब्दोच्चार सुद्धा चुकतात. गणिताच्या नावानं शंख. निर्बुद्ध आहे म्हणावं तर मॉडेल्स बनवणं कसं जमतं? कुठलंही चित्र पहाते आणि तंतोतंत मॉडेल बनवते. पण त्यानं  काय भविष्य बनणार आहे का हिचं ? आतून तुटत चाललोय आम्ही दोघं. शाळेतून तक्रारींवर तक्रारी.

मी म्हटलं, ‘तुम्ही आधी शांत व्हा. आपण मुळात प्रॉब्लेम काय आहे हे समजावून घेऊ. मार्ग नक्की काढता येईल. तिच्या काही चाचण्या करूया. पुढच्या आठवड्यात भेटू तेंव्हा सगळं स्पष्ट होईल. आमचं बोलणं संपेपर्यंत छोट्या स्वराने एक छानसा मासा बनवला होता आणि शेजारी टाचणी ला रबर लावून एक गळ पेपरवेटवर टांगता ठेवला होता. मी तिच्याकडे पाहून हसलो. म्हणालो, ‘खूप मस्त बनवलंयस’. ती गोड हसली. पुढच्या आठवड्यात आम्ही भेटलो, तेव्हा तिच्या शाळेतल्या शिक्षिकाही बरोबर होत्या. मी म्हटलं ‘माझा अंदाज बरोबर निघाला. स्वराला अध्ययन अक्षमता आहे. आपण हे वास्तव स्वीकारायला हवं. आणि त्यातूनही तिच्यासाठी सुंदर आयुष्य कसं निर्माण करता येईल, हे पाहायला हवं. तिच्यातल्या चांगल्या क्षमतांचा विकास घडवून एक चांगलं भविष्य निर्माण करायचा प्रयत्न करायला हवा.

अस्मिताच्या डोळ्यात थोडी भीती आणि अविश्वास होता. ते नैसर्गिक होतं. शेवटी आईचं काळीज होतं. शिक्षिका म्हणाल्या, ‘ सर, थोडक्यात अध्ययन अक्षमतेविषयी सांगाल का? शाळा म्हणून आम्ही काय मदत करू शकतो? मुळात प्रॉब्लेम असू शकेल हे ओळखायचं कसं ? मी म्हणालो, ‘प्रथम लक्ष ठेवायचं, की आपल्या पाल्याला शाळेत शिकताना किंवा घरी अभ्यास करताना काही समस्या येतायत का? म्हणजे वाचणे, लिहिणे किंवा गणिते सोडवणे इत्यादी. हे सतत असेल तर अध्ययनअक्षमता असू शकेल. त्यासाठी वेळेतच मदत घ्यावी. हा काही बुद्धिमत्तेचा प्रश्न नव्हे. ह्या मुलांना मठ्ठ समजता कामा नये. त्यांच्या मेंदूमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने माहितीचे संकलन किंवा प्रक्रिया होते. मेंदू वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतो.

बऱ्याच वेळा Learning Disability ही Learning Differences प्रकारात मोडू शकते. म्हणजेच एखादी गोष्ट चाकोरी सोडून वेगळ्या पद्धतीनं शिकणं. ही मुलं इतर मुलांप्रमाणेच तल्लख असू शकतात. पाहाणे, ऐकणे आणि समजणे वेगळे असते. त्यामुळेच नवीन कौशल्ये आत्मसात करताना त्यांना कठीण जातं. अध्ययनअक्षमता प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असू शकते.  एखाद्या मुलाला वाचण्यात, एखाद्याला आकडोमोडीत, तर कुणाला उच्चारात अडचणी असतात. काहींना स्पेलिंग अवघड जातात. एखाद्याला समोरचा काय म्हणतोय किंवा काय शिकवतोय हेच कळत नाही. काहींना शब्द व त्याचा ध्वनी ह्यातील नातं लक्षात येत नाही, त्यामुळे शब्दोच्चारात वा आकलनात अडचणी येतात. अक्षरं, संख्या, रंग, आकार, आठवड्याचे दिवस लक्षात ठेवण्यात अडचण येते. बऱ्याच वेळा गतिमंदत्व असल्यास त्यामुळे किंवा त्यासोबत अध्ययनअक्षमता असू शकते.

यावर उपाय काय? ही मुलं म्हणजे लोढणं न समजता त्यांची बलस्थानं ओळखून त्यांना प्रोत्साहित करणं महत्त्वाचं. संयम व चिकाटीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. स्वराची कल्पनाशक्ती, मॉडेल बनवण्याची अफलातून क्षमता ह्याला प्रोत्साहन द्यायला हवं. जोडीला बाकीची कौशल्ये शिकवणे; ज्यायोगे तिला दैनदिन जीवनात उपयोग होईल. तिला कमी लेखणे चुकीचे. इतर मुलांशी तुलना न करता तिचा आत्मविश्वास कसा वाढेल हे पहाणे महत्त्वाचे. स्वरासारखीच काही मुलांना इतर कला विशेषत: संगीत व खेळ ह्यात गती असू शकते.” मी बोलायचा थांबलो, तेव्हा अस्मिता आणि स्वराच्या शिक्षिका ह्यांच्या चेहेऱ्यावर स्वस्थता दिसली नि निर्धार सुद्धा. दोन वर्षांच्या सामूहिक प्रयत्नांनंतर स्वरात खूपच प्रगती आहे. प्रवास अवघड असला तरी अशक्य नाही.

loading image
go to top