esakal | भाष्य : माध्यमांची वाटचाल तिसऱ्या पर्वाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Media

‘सातत्यपूर्ण बदल’ हे वैशिष्ट्य आता माध्यमविश्वाची नवी ओळख म्हणून पुढे येत आहे. त्याला संधी मानून माध्यम व्यवहार करणारेच टिकाव धरू शकतील. तंत्रज्ञान, खर्चिक सुविधा, प्रसारणाची व्यापकता यापेक्षाही बदलांशी सुसंगत राहण्याची लवचिकता हीच आता यशावर शिक्कामोर्तब करणार आहे. 

भाष्य : माध्यमांची वाटचाल तिसऱ्या पर्वाकडे

sakal_logo
By
केशव साठये

‘सातत्यपूर्ण बदल’ हे वैशिष्ट्य आता माध्यमविश्वाची नवी ओळख म्हणून पुढे येत आहे. त्याला संधी मानून माध्यम व्यवहार करणारेच टिकाव धरू शकतील. तंत्रज्ञान, खर्चिक सुविधा, प्रसारणाची व्यापकता यापेक्षाही बदलांशी सुसंगत राहण्याची लवचिकता हीच आता यशावर शिक्कामोर्तब करणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्या वर्षात भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योग दोन लाख कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोचेल, असा अंदाज ‘इंडिया ब्रॅंड इक्विटी फाउंडेशन’ने व्यक्त केला आहे. गेल्या दहा वर्षांतील माध्यमवाढीचा वेग पाहता हे सहजसाध्य असे उद्दिष्ट आहे. पण, हे यश मिळवण्यासाठी माध्यम जगाला बदलत्या पर्यावरणाशी सुसंगत असा व्यवहार करावा लागणार आहे. आपल्या कार्यपद्धती, पारंपरिक दृष्टिकोन हे तावून सुलाखून घ्यावे लागणार आहेत. जिवंत अनुभव देण्याची क्षमता असलेला ‘आशय हाच येत्या दशकात राज्य करेल.’-  मनोरंजनाची विविध कवाडे जगभरातील प्रेक्षकांसाठी उघडणाऱ्या ‘नेटफ्लिक्‍स’ या जगविख्यात संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी रीड हास्टिंग्ज यांचे हे भाकीत आज प्रत्यक्षात येताना दिसत आहे. नव्या वर्षात पदार्पण करताना हे ध्येयवाक्‍य घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या माध्यमसंस्था तग धरतील, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. तुम्ही कोणतीही वेबसीरिज वा थ्रिलर पाहा.

अतिशय मनस्वी आणि प्रेक्षकांना ‘अनुभव’ देण्याची ताकद ज्या कथेत आहे, त्याच मालिका /चित्रपट कोट्यवधी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेत असल्याचे दिसते. वेबसीरिज आणि डिजिटल माध्यमांसाठी चित्रपट तयार करणारे ‘ॲमेझॉन प्राइम’, ‘एचबीओ’, ‘हॉटस्टार’ हेही आज परवलीचे शब्द झाले आहेत. याच जोरावर सेक्रेड गेम्स, मेड इन हेवन, काफिर, कोटा फॅक्‍टरी, फॅमिली मॅन, ब्रीद या मालिका, काही अप्रतिम स्टॅंडअप कॉमेडी लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्याचबरोबर आपला प्रेक्षक हा दुसरीकडे कुठे जाणार नाही, यासाठी त्यांच्या आवडीनिवडी त्यांचे प्राधान्यक्रम यांची नोंद अल्गोरिदमचा वापर करून या संस्था नियमितपणे करत आहेत. आपण कार्यक्रम सादर करायचे; प्रेक्षकांनी पाहिले तर पाहिले, या बाळबोध आणि व्यवसायाला मारक मनोवृत्तीला येत्या वेगवान दशकात अजिबात माफी नाही, हा संदेश घेऊन हे नवे वर्ष आले आहे. ‘यूट्यूब’ही व्हिडिओ शेअरिंगमध्ये जगभरात नाव असताना निर्मितीत उतरले. यातच दोन महिन्यांपूर्वी ‘ॲपल’ने उडी घेतली आहे. फोन निर्मितीत अग्रेसर कंपनीला आशय निर्मितीत उतरावेसे वाटणे, हीच युग बदलत असल्याची चिन्हे आहेत. 

या माध्यमांतून दर महिना वर्गणी भरून प्रेक्षक या वेबसीरिज पाहत असतात. ते प्रेक्षक टिकवणे, नवीन प्रेक्षकांची भर कशी टाकता येईल याचा सातत्याने विचार करून प्रेक्षक नावाच्या ग्राहकाला संतुष्ट ठेवत त्याच्या  चेहऱ्यावरची खुशी कायम ठेवण्याचे आव्हान मनोरंजन क्षेत्रात काम करत असलेल्या वेब कंपन्यांना आता मोठ्या प्रमाणात पेलावे लागत आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या वाहिन्यांनीही टुकार कथानक, सुमार विनोद, बेगडी संघर्ष, सपक रहस्य यांनी भारलेल्या निरस मालिकांचे गुऱ्हाळ आता थांबवावे. ‘टीआरपी’ हा जाहिरातदारांसाठी आणि वाहिन्यांसाठीही अतिशय फसवा असा सापळा आहे. तो अधिक असलेल्या मालिका आणि कार्यक्रम हे बऱ्याच वेळा अभिरुचीचा ‘लसावि’च दाखवीत असतात. त्यात अडकत गेल्यास त्यातून बाहेर येण्याचे मार्ग अधिकाधिक दुस्तर होत जातील, याची नोंद मनोरंजनात्मक कार्यक्रम तयार करणाऱ्या वाहिन्यांनी ताबडतोब घेतली पाहिजे. तरुण प्रेक्षक, मोबाईल माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मनोरंजनाची चव चाखलेला प्रेक्षक आता या सुमाराच्या सद्दीतून बाहेर पडण्यास उत्सुक आहे.

‘बातमीच्या दुनिये’ची बातमी
नव्या युगाशी जुळवून घेताना भारतीय वृत्तवाहिन्यांसमोरचे आव्हान तर आणखी तगडे आहे. स्वतःची नेमकी ओळख नाही हे त्यांचे मोठे दुखणे आहे. एकमेकांचे अनुकरण करताना आपण चेहरा नसलेली माध्यमे होत चाललोआहोत, याचे भान त्यांना अद्यापही आलेले नाही. मुळात यातील अनेक वाहिन्या वर्षानुवर्षे तोट्यात चालवल्या जात आहेत. उत्तम प्रारूप असलेली, बातम्यांकडे गंभीरपणे पाहणारी, त्या गांभीर्याला अनुरूप असा तिला दृकश्राव्य पेहराव देणारी वृत्तवाहिनी ही कविकल्पना वाटावी इतकी ती अप्राप्य झाली आहे. ठळक, भडक, मोठी अक्षरे, ॲनिमेशनचा अनावश्‍यक वापर, संगीत आणि उच्चरवातील ध्वनी यांतील फरक माहीत नसलेली पार्श्वसंगीत योजना हे आजचे बातमी जगाचे वास्तव आहे. बातमी वेगवान करण्यासाठी अशी काही आयुधे लागत नाहीत. तिच्यात मुळात ऊर्जा आणि मूल्य असावे लागते हे बातम्या निवडीच्या वेळी ठरवता न आल्यामुळे हे विदारक चित्र पाहावे लागत आहे.

भाषेचा वापर, शब्दफेक, उच्चार, आविर्भाव यात आपण काही सकारात्मक बदल केले पाहिजेत, असे या वाहिन्यांना का वाटत नाही? नव्या पिढीला वास्तव आहे तसे बघायचे आहे. कोणत्याही उद्दीपित करणाऱ्या मालमसाल्याशिवाय निखळ सत्य पाहायचे आहे, त्यांना या वृत्तवाहिन्या निरर्थक वाटू शकतात. शिवाय आपण वेगळे आहोत, ‘एक्‍सक्‍लुझिव’ आहोत असे सांगणाऱ्या बहुतेक वाहिन्या सशुल्क होण्याचे धाडस दाखवताना दिसत नाहीत. सशुल्क बातम्यांपेक्षा हे व्यावसायिक प्रारूप त्यांना अधिक व्यावसायिक प्रतिष्ठा देईल. पण, चार पैसे मोजावेत असे प्रेक्षकांना वाटेल एवढा किमान दर्जा त्यांना द्यावा लागेल. 

‘लाईक्स’चा हव्यास
नव्या दशकाच्या उंबरठ्यावर जाण्यापूर्वी वृत्तवाहिन्यांनी आपले ‘स्टाइल बुक’ तयार करणे गरजेचे आहे. त्यातून वृत्तमूल्यांविषयी नेमका दृष्टिकोन, बातमी आणि संपादकीय टिप्पणी यांतील लक्ष्मणरेषा निश्‍चित करण्याची मानसिकता, तांत्रिक आणि आशय संबंधित बदलाशी जुळवून घेण्याविषयीचे धोरण प्रतिबिंबित व्हावे. तोट्यात चालणाऱ्या संस्था कधीही बंद होऊ शकतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. धबाधबा कोसळणारी माहिती, तिचे आशयात रूपांतरित करण्याचे कसब आणि त्या आशया- विषयानुसार कप्पे करून माहिती व्यवस्थापनावर द्यावा लागणार भर, ही आव्हाने त्यांना पेलायची आहेत.  केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर वैचारिक आणि सैद्धांतिक पातळीवर येणारी आधुनिक विचारसरणी याची आता चाहूल लागत आहे.

आत्ताआत्तापर्यंत ‘लाइक’ या बटणाचे आकर्षण माध्यम संस्था, व्यक्ती यांना वाटत असे. जितके अधिक ‘लाइक्‍स’ तितके तुम्ही लोकप्रिय, हा समज आता खोटा ठरत आहे. ‘इंस्टाग्राम’ने सात देशांत हे ‘लाइक बटन’ आपल्या ‘पोस्ट्‌’वरून हटवले आहे. उद्देश हा की ‘लाइक’साठी जीव खाली-वर होणाऱ्या वापरकर्त्यांची अस्वस्थता त्यांना कमी करायची आहे. त्यामुळे आपल्या कलाकृतीवर, मांडणीवर अधिक लक्ष ते केंद्रित करू शकतील, असा त्यांना विश्वास वाटतो. या आधुनिक विचारधारेत इतर समाजमाध्यमेही सामील व्हावीत अशी अपेक्षा. जागतिकीकरणाचे वारे सुरू होईपर्यंत दूरदर्शनचे साम्राज्य आपण पाहिले. त्यानंतरची २०-२५ वर्षे खासगी वाहिन्यांनी अधिराज्य केले, आता आपण वेब जगात वेगाने मार्गक्रमण सुरू केले आहे. खर्चिक सुविधा, प्रसारणाची व्यापकता, तंत्रज्ञानाची आधुनिकता याहीपेक्षा बदलाशी सुसंगत राहण्याची लवचिकता आणि प्रेक्षकांच्या वैयक्तिक गरजांचा वेध घेत त्यांचे खासगीपण जपणारी आशयनिर्मिती करणे हे माध्यम उद्योगांपुढील मोठे आव्हान आहे. आजचा प्रेक्षक हा या देशाचा नव्हे, तर जागतिक प्रेक्षक आहे हे समजून केलेली कार्यक्रम आखणीच या उद्योगातील यशावर शिक्कामोर्तब करणार आहे. नव्या वर्षाचा, नव्या युगाचा हाच सांगावा आहे.

loading image
go to top