Law of Trademark I राजकीय पक्षांची नावे आणि ट्रेडमार्क कायदा काय सांगतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

law of trademark political parties

राजकीय पक्षांचे नाव आणि चिन्हांचे ट्रेडमार्क रजिस्टर होऊ शकतं का याबद्दल कुतूहल असेल तर नक्की वाचा....

राजकीय पक्षांची नावे आणि ट्रेडमार्क कायदा काय सांगतो?

Advocate नंदिनी चंद्रकांत शहासने, पुणे

महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी अधिकाधिक रोचक होत आहेत. एकनाथ शिंदे पक्ष-बदल न करता मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत आणि भाजप युतीमधे आहे. याप्रकारची व्यवस्था ही भारतीय कायदेप्रणालीची किमया आहे. संबंधित व्यवस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयामधे याचिका दाखल असून त्याविषयक अधिक चर्चा याचिकेवरील निर्णयानंतर करणे योग्य आहे. 'शिवसेना' या नावाभोवती सर्व राजकारण चालू असून भविष्यात शिवसेनेच्या नावाखाली नक्की कुठल्या राजकीय घडामोडी घडतील याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्षांचे नाव आणि चिन्हांचे ट्रेडमार्क रजिस्टर होऊ शकतं का याबद्दल कुतूहल असेल तर नक्की वाचा. (political party name and trademark laws in maharashtra)

ट्रेडमार्क म्हणजे व्यापार चिन्ह. ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत नोंदणी करताना कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार विशिष्ट वर्गाअंतर्गत व्यापार चिन्हाची नोंद करता येते. त्यानुसार वर्ग ४५ हा सामाजिक संस्था, समाजसेवा या उद्देशांसाठी लागू होतो. कुठल्याही राजकीय पक्षाचा हेतू हा प्रामुख्याने समाजसेवा असतो. मग प्रश्न हा की विशिष्ट राजकीय पक्षाच्या नावाची ट्रेडमार्क म्हणून नोंदणी करता येईल का? वर्ग ४५मध्ये अथवा इतर कुठल्या वर्गात सदर उद्देशांसाठी राजकीय पक्षाच्या नावाची व्यापार चिंन्ह म्हणून नोंद करता येते का?

कुठलाही शिक्का, ध्वज, स्वाक्षरी, चित्र, लेखन हे बोधचिन्ह असू शकते. मात्र कायद्यानुसार, काही नावे किंवा चिन्हे व्यवसायिक वापरासाठी वापरता येत नाहीत. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्क्स, पेटंट आणि डिझाइन अशा शासकीय यंत्रणेतून नावासंबंधीच्या वापराचे नियमन होते. एम्ब्लेम अँड नेम्स (प्रिव्हेंशन ऑफ इम्प्रोपर युज ) [The Emblems and Names (Prevention of Improper Use)] कायद्यात काही निषिद्ध शब्द आणि बोधचिन्हांची सूची दिलेली आहे. अशा नावांचा किंवा बोधचिन्हांचा व्यावसायिक कारणासाठी वापर करायचा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते.

सदर कायद्याच्या कलम ३ आणि ४ (बी) नुसार राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिन्हांची ट्रेडमार्क नोंदणी करता येत नाही. ट्रेडमार्क कायदा, १९९९ च्या तरतुदींनुसार, भारतात कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे नाव किंवा निवडणूक चिन्ह, ट्रेडमार्क कायद्याच्या कलम ९ नुसार ट्रेडमार्क किंवा व्यापार चिन्ह म्हणून नोंदले जाऊ शकत नाही. म्हणजेच निवडणूक चिन्ह किंवा राजकीय पक्षाचे नाव हे ट्रेडमार्कच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

नावात काय आहे हा प्रश्न आजच्या स्पर्धात्मक युगासाठी अत्यंत गंभीर आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता एका विशिष्ट नावामागील इतिहास, मानसिकता, भावना आणि अर्थकारण किती गंभीर आणि क्लिष्ट असू शकते याची जाणीव सगळ्यांना होत आहे किंवा आज ना उद्या ती होणार आहे. उदाहरणार्थ, , THE EMBLEMS AND NAMES (PREVENTION OF IMPROPER USE) ACT, 195० म्हणजेच बोधचिन्हे आणि नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) कायदा, १९५० नुसार भारतीय युगपुरुष, राजकारणी व्यक्तींची नावे जसं की महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांची ट्रेडमार्क नोंदणी होऊ शकत नाही. परंतु, ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज दाखल करताना या सर्व गोष्टी ई-फाइलिंग प्रणालीमधे पहिल्या जात नाहीत. अर्ज केल्यानंतरच त्याची संबंधित सरकारी यंत्रणेकडून तपासणी केली जाते.

महाराष्ट्रातील सध्याचे धक्का-राजकारण पाहता शिवसेना, भारतीय जनता पक्ष अशा मोठ्या पक्षांची नावे, त्यांचे प्रतिनिधित्व करणारी चिन्हे, या पक्षातील महान नेते यांच्या नावांच्या ट्रेडमार्क मालकीसाठी कोणी ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडे अर्ज करू शकतो का असा जर प्रश्न मनात येत असेल तर त्याचं उत्तर सकारात्मक आहे परंतु अशी नावे खरोखर ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत नोंदिकृत होतील का याचा न्यायनिवाडा संबंधित अधिकारीच करू शकतील.

शेवटी काय, पोटाची खळगी भरण्यासाठी खूपच कमी गोष्टी लागतात, जगाच्या पाठीवर 'नाव' लौकिक मिळावा यासाठी खरंतर माणूस आयुष्यभर झटतो. नाम प्रतिष्ठेसाठी प्रत्येकाचे समाजव्यवस्थेबरोबर काहीना काही राजकारण चालूच असते. या नामाची जपवणूक करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याएवढे अवघड असते हेच खरे.