ढिंग टांग : ‘ते’ पुन्हा पुन्हा येतात..!

प्रिय जयंत्रावजी, सप्रेम जय महाराष्ट्र. पत्र लिहिण्यास कारण की सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. प्रचाराचा धडाका सुरु आहे.
lok sabha election meetings jayant patil sharad pawar maharashtra politics
lok sabha election meetings jayant patil sharad pawar maharashtra politicsSakal

प्रिय जयंत्रावजी, सप्रेम जय महाराष्ट्र. पत्र लिहिण्यास कारण की सध्या निवडणुकीचे दिवस आहेत. प्रचाराचा धडाका सुरु आहे. पण आपल्या सर्वांचे एकमेव शत्रू नमोजीभाई वारंवार महाराष्ट्रात येऊन मुलुखगिरी करु लागले आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यांच्यासारख्या महानेत्याने सारखेसारखे महाराष्ट्रात येणे बरे नाही.

ते आले की आसपासच्या चार-पाच मतदारसंघातले वारे बदलून जातात, असा आजवरचा अनुभव आहे. येत्या दोन दिवसांत तर त्यांच्या सहा सभा होणार आहेत. याला काहीतरी उपाय काढला पाहिजे. महाराष्ट्राच्या शत्रूला इथली दारे बंद झालीच पाहिजेत. आपण सारे एकजुटीने लढत आहोत. काहीतरी सुचवा.

आपला. पटोलेनाना. (हातवाले.)

ता. क. : मी सध्या भयंकर बिझी आहे. अन्यथा उपाय काढला असता!

माननीय उधोजीसाहेब, जय महाराष्ट्र. आत्ताच नानाभाऊंचे पत्र मिळाले. तुम्हालाही पाठवले आहे का? दिल्लीहून नमोजीभाई वारंवार महाराष्ट्रात येऊ लागल्याने त्यांना चिंता लागली आहे. काहीही काळजी करु नका, असे मी त्यांना उलट टपाली कळवत आहे.

साक्षात ‘पेटती मशाल’ आपल्या ‘हातात’ असल्यावर विजयाची ‘तुतारी’ आपणच फुंकणार नाही तर कोण? (एकाच वाक्यात तिन्ही निवडणूक चिन्हे आणण्याचा नम्र प्रयत्न केला आहे…थँक्यू!) हे वाक्य त्यांना ऐकवणार आहे.

माझ्या मते नमोजीभाई महाराष्ट्रात वारंवार येतात, याचे प्रमुख कारण इथे त्यांची डाळ शिजणार नाही, असे त्यांना वाटत असावे. त्यांनी दोन दिवसात सहा सभा घेतल्या तर आपण चार त्रिक बारा सभा घेऊ. त्यांच्या महाराष्ट्रवाऱ्या थांबवल्याच पाहिजेत हे खरे. बघू. भेटीअंती बोलूच. (मी येईन बांदऱ्याला. थँक्यू.)

कळावे. आपला. जयंत्राव पाटील. (तुतारीवाले)

ता. क. : काढतो काहीतरी आयडिया!

माझ्या तमाऽऽम मित्रपक्षाच्या नेत्यांनो, रात्र वैऱ्याची आहे. दिवसही वैऱ्याचाच आहे. आणि तो वैरी पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात येवोन कडमडतो आहे. त्याला म्हणावे, विमानाचे चपटे नाक थोडे तिकडे वळवोन गुजराथेत निघोन जाणे, येथ न येणे!! येता महाराष्ट्री, जाता…फटफटी!! (ऐतिहासिक वाक्यानुसार ‘येता जावळी, जाता गोवळी’ या टाइपचे यमक जुळवायचे होते.

ऐन वक्ताला सुचले नाही. पण भावना समजून घेणे!) दिल्लीचा गनिम पुन्हा पुन्हा येतो कारण त्याच्या पायाखालील वाळू सरकली आहे. आमच्या भयानेच गनिमाला रात्र रात्र (दिल्लीत) झोप लागत नाही, सकाळच्या प्रहरी उठोन महाराष्ट्रात धाव घेतो.

गेल्या दोन दिवसांत गनिमाने सहा सभा लावल्या आहेत. काय ते आलिशान शामियाने, काय ती भाडोत्री गर्दी, काय ती भाषणे, काय ती दूषणे!! कितीही तोंडच्या वाफा दवडल्या तरी उपयोग व्हायचा नाही. औंदा रणमैदानात गनिमाचे पानिपत होणारच!! केल्याशिवाय राहणार नाही!! जय महाराष्ट्र.

उधोजी (पेटती मशाल)

ता. क. : कधीही भेटीस येणे! मित्रांस दरवाजे कायम उघडेच आहेती, आणि मीदेखील बांदऱ्यातच आहे!! उ. ठा.

नानासाहेब-

जय महाराष्ट्र. घोडामैदान दूर नाही. पण तुम्ही दरवेळी दिल्लीचे प्रमुख नेते महाराष्ट्रात बोलावून त्यांना येथे धुमाकुळ घालू देता, हे गैर आहे. या मऱ्हाटी मुलखात ही परक्यांची मुलुखगिरी सहन केली जाणार नाही. त्यांना बऱ्या बोलाने रोखा.

तुम्ही त्यांना दरवेळी ‘आवजो’ असे म्हणता, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात येतात, असे आम्हाला आढळून आले आहे. हिंमत असेल तर यापुढे त्यांना ‘आवजो’ असे म्हणू नये! मग बघा, आम्ही कशी तुमची गठडी वळतो.

कळावे. (नाव सांगणार नाही.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com