Loksabha 2019 : अडवानींचे आत्मचिंतन! (अग्रलेख)

lk advani
lk advani

भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे.

भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या मार्गाने नवसंजीवनी प्राप्त करून देणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी अत्यंत सूचक भाषेत पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाची कानउघाडणी केली आहे. आज योगायोगाने गुढीपाडव्याच्या दिवशी भाजपच्या स्थापनेला ३९ वर्षे पूर्ण होत असताना अडवानी यांनी एक ‘ब्लॉग’ लिहून, ‘विरोधकांवर राष्ट्रविरोधी शिक्‍का मारता कामा नये!’ असे परखड बोल सुनावले आहेत. ‘विरोधकांना आपले ‘शत्रू’ समजता कामा नये, तर ते ‘राजकीय प्रतिस्पर्धी’ असतात आणि आपल्या मतांशी सहमत नसले, तरी त्यामुळे ते राष्ट्रद्रोही ठरू शकत नाहीत!’ असे भाष्य त्यांनी या ‘ब्लॉग’मध्ये केले आहे. अडवानींचे हे सारे चिंतन म्हणजे एका अर्थाने सध्या नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप आपल्या विरोधकांची संभावना ज्या पद्धतीने करत आहे; त्याबद्दल केलेले मतप्रदर्शनच असले, तरी या ‘ब्लॉग’मध्ये मोदींच्या नावाचा साधा उल्लेखही न करण्याचे धोरण अडवानी यांनी स्वीकारले आहे. त्यांचा हा ‘ब्लॉग’ म्हणजे एकेकाळचे त्यांचे शिष्योत्तम मोदी यांना ऐकवलेली ‘भगवद्‌गीता’च म्हणावी लागेल! त्याचे कारण म्हणजे त्यात ‘राजधर्मा’ची शिकवण तर आहेच; शिवाय भारतीय लोकशाहीतील विविधता व परस्परांबद्दलचा आदरभाव यांचाही गौरवाने उल्लेख आहे. अडवानी कोणे एकेकाळी नियमितपणे ‘ब्लॉग’ लिहीत असत. मात्र, २०१४ मध्ये मोदी यांनी त्यांची पंतप्रधानपदी निवड होताच अडवानी व अन्य नेत्यांची रवानगी ‘मार्गदर्शक मंडळा’त केली आणि अडवानी यांनी आपल्या ‘ब्लॉग’ला स्वल्पविराम दिला! त्यांचा शेवटचा ‘ब्लॉग’ हा २०१४ मधील प्रचार मोहिमेसंबंधात होता. त्यामुळे आताच त्यांना नव्याने ‘ब्लॉग’ लिहिण्याचा उमाळा का आला, हा जसा प्रश्‍न आहे, त्याचबरोबर त्यांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली असती, तर त्यांनी नव्याने ‘ब्लॉग’ लिहिला असता काय, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो!
अडवानी यांनी या ‘ब्लॉग’मध्ये ‘देश प्रथम, पक्ष नंतर आणि ‘मी’ सर्वांत शेवटी!’ असे एक सूत्रही सांगितले आहे. अडवानी यांचे हे सारे तत्त्वज्ञान म्हणजे मोदींच्या कार्यपद्धतीवर थेट टीकाच आहे. मात्र, मोदी हेही अडवानी यांच्याच शाळेतील एक चतुर विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी तातडीने एक ‘ट्विट’ करून अडवानी यांनी दिलेल्या या ‘मंत्रा’बद्दल त्यांना धन्यवाद दिले! मोदी चाणाक्ष असल्याने या ‘ब्लॉग’मधील अन्य भाष्याला मात्र त्यांनी चतुराईने बगल दिली! अर्थात, मोदी यांना अशा प्रकारे ‘राजधर्मा’ची शिकवण देण्याची पाळी भाजप नेत्यांवर काही पहिल्यांदाच आलेली नाही. २००२ मध्ये अहमदाबादेत ‘गोध्राकांडा’नंतर उफाळलेल्या भीषण दंगलीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने मोदी यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसू लागल्यावर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदी यांना ‘राजधर्मा’ची आठवण करून दिली होती. पुढे याच कारणास्तव मोदी यांचे मुख्यमंत्रिपद धोक्‍यात आले, तेव्हा अडवानी यांनीच त्यांची पाठराखण केली होती. त्याबद्दल आज मनात नेमक्‍या कोणत्या भावना आहेत, त्याही अडवानी यांनी या ‘ब्लॉग’मध्ये स्पष्ट केल्या असत्या; तर हा ‘ब्लॉग’ सर्वार्थाने पथदर्शक ठरू शकला असता. मात्र, सध्या भाजपमधील ‘भीष्माचार्यां’ची भूमिका अडवानी यथार्थपणे निभावत असल्यामुळे महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे त्यांनी कसोटीच्या प्रत्येक क्षणी मौनव्रतच स्वीकारले.

अडवानी हे भाजपच्या संस्थापकांपैकी एक नेते. वाजपेयी यांनी पक्षाच्या पहिल्याच अधिवेशनात दिलेला ‘गांधीवादी समाजवादा’चा मंत्र हा जनसंघाच्या हिंदुत्ववादाच्या मुशीत तयार झालेल्या स्वयंसेवकांच्या पचनी पडणे कठीणच होते. त्यानंतर अडवानी यांनीच पक्षाला रामजन्मभूमी आंदोलनाच्या मार्गावर नेले आणि त्यातूनच सत्तेचा सोपान साकार झाला, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने अडवानी यांनी प्रमोद महाजन यांच्याबरोबर ‘सोमनाथ ते अयोध्या’ अशी रथयात्रा काढली होती. अडवानी यांच्याच उपस्थितीत सहा डिसेंबर १९९२ रोजी हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त केली आणि देशभरात दंगलीचे तुफान माजले. मात्र, आज अडवानी जी काही ‘लोकशाहीतील विविधता आणि परस्परांबद्दलचा आदरभाव’ याची आठवण पक्षनेतृत्वाला करून देऊ पाहत आहेत, त्याचे त्या वेळी त्यांना स्मरण का झाले नाही? या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो म्हणजे अडवानी यांचे हे आत्मचिंतन म्हणजे निव्वळ ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि हे सारे तत्त्वज्ञान नेमके आताच त्यांना सुचावे, याचे रहस्य अर्थातच त्यांच्यावर मोदी-शहा यांनी सक्‍तीने लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com