Loksabha 2019 : शिव्या आणि शाप! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

कलियुगात मंतरलेल्या जळाविना नुसत्या ध्वनिक्षेपकावरून शापवाणी उच्चारली तरी काम भागते. याचे कारण ‘शाप टेक्‍नॉलॉजी’  विकसित झाली आहे, हेच असावे...

कलियुगात मंतरलेल्या जळाविना नुसत्या ध्वनिक्षेपकावरून शापवाणी उच्चारली तरी काम भागते. याचे कारण ‘शाप टेक्‍नॉलॉजी’  विकसित झाली आहे, हेच असावे...

स दैव देवादिकांच्या सान्निध्यात राहणाऱ्या माणसांना नाहक त्रास देऊ नये. या देवमाणसांना फार तर लांबून नमस्कार करावा आणि पुढे जावे. उगीच कुरापत काढली तर एक म्हणता दुसरेच व्हायचे. शिवाय देवमाणसांचा शाप फार जोरदार लागतो म्हणतात. तोच देवमाणूस देवादिकांबरोबर राजकीय वर्तुळातही ऊठबस असलेला असेल, तर मग विषयच संपला. त्याच्या शापाची पॉवर डब्बल असते म्हणतात. हल्ली निवडणुकीच्या हंगामात अशा पॉवरफुल आणि कोपिष्ट साधुजनांचे पेव फुटल्याने जनसामान्यांनी जपून राहिलेले बरे. आपण बरे, आपले मतदान बरे! सत्ताधारी पक्षाचे उमेदवार श्रीमान साक्षीमहाराज यांनी गेल्याच आठवड्यात भर सभेत ठणकावून बजावले होते ‘‘मी संन्यासी आहे...मला मतदान केले नाहीत तर शाप देईन, शाप!’’ गरीब बिचाऱ्या मुमुक्षुंनी अशावेळी काय करावे? संन्याशाच्या शापाइतके भयंकर काहीही असू शकत नाही. श्रीमान साक्षीमहाराज आहेत विरागी वृत्तीचे. त्यांनी मिळवलेल्या अत्युच्च आध्यात्मिक पातळीपुढे सारे काही तुच्छ आहे. त्यांचे न ऐकून एखाद्या विक्षिप्त तार्किकाने उलट दुसऱ्याच पक्षाला मतदान केले तर, त्याचा सर्वनाश झालाच म्हणून समजा! तुमचे मतदान गुप्त असते हे खरे; पण ते साधुमहाराजांच्या अंतर्ज्ञानाला कळत नाही, असे नाही. त्यांच्या प्रबुद्ध मनात एक प्रकारचे दिव्य ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र बसवलेले असते म्हणे. त्यांना बरोब्बर कळते आणि मग त्यांना मत न देणाऱ्याला शाप लागतो म्हणे.

याच पक्षाच्या दुसऱ्या एक साध्वी आहेत. नुकत्याच, म्हणजे केवळ ७२ तासांपूर्वीच त्या या पक्षात आल्या आणि नियतीचा रेटा बघा, त्यांना लागलीच मध्य प्रदेशातून उमेदवारीदेखील मिळाली. आता या साधू, साध्वी, योगी, बाबाजी अशा संन्याशांनी अचानक राजकारणात, तेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याचे कारण काय? असा प्रश्‍न काही नास्तिक विचारतील. खरे तर त्यांना उत्तरेच देऊ नयेत!.. तर या साध्वींनी मालेगावात मशिदीसमोर स्फोट घडवून आणल्याचा आरोप आहे. अर्थात, त्यातून त्यांची निम्मीशिम्मी सुटका झाली; परंतु साडेसातीचे अखेरचे अडीचके बाकी असल्याने अजून थोडी दिक्‍कत आहे; पण काही हरकत नाही. या साध्वीजींचा अनन्वित छळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला त्यांनी तळतळून शाप दिला की, ‘‘तेरा सर्वनाश होगा...होगा...होगा...’’ आश्‍चर्य म्हणजे शाप दिल्यापासून महिनाभराच्या आतच हा पोलिस अधिकारी मुंबईत दहशतवाद्यांच्या गोळीबारात प्राण गमावून बसला. आता ही गोष्ट तर अवघ्या दहा वर्षांपूर्वीची आहे. त्यातून सर्वांसमक्ष घडलेली. तरीही काही तर्कदुष्ट यावर विश्‍वास म्हणून ठेवायला तयार नाहीत. काय करणार? ज्याचे त्याचे कर्म म्हणायचे आणि सोडून द्यायचे.

पूर्वीच्या काळी, म्हणजे फारच प्राचीन काळी साधुजनांना कमंडलूमधले मंतरलेले पाणी शिंपडून शापवाणी उच्चारावी लागायची. पाण्यात मंत्रऊर्जेचे सामर्थ्य वाहून नेण्याची क्षमता असते, असे म्हणतात. त्याचे शिंतोडे उडाले की असुर, गंधर्व किंवा मानव यांचे तेथल्या तेथे भस्म होत असे. बरेचसे साधू कोपिष्ट असतातच. त्यांच्या कोपाला बळी पडून त्या काळी लाखो शापित भस्मसात झाले असतील; पण कलियुगात ही ‘शाप टेक्‍नॉलॉजी’ चांगली विकसित होत गेली. मंतरलेल्या जळाविना नुसत्या ध्वनिक्षेपकावरून शापवाणी उच्चारली तरी काम भागते. पुढील काळात साध्या ‘व्हॉट्‌सॲप’ संदेशाद्वारे पाठवलेला शापही शतप्रतिशत बाधेल, असे तंत्रज्ञान येणार आहे म्हणे. येवो बापडे! आपण आपले जपलेले बरे. दोन वर्षांपूर्वी बिहारमध्ये लालूप्रसाद यादव नामक एका ‘पापात्म्या’ने ‘इस मोदी की लंका को २०१९ में मैं भस्म कर दूँगा’ अशी दर्पोक्‍ती केली होती. गृहस्थ आज कारागृहात खितपत पडले आहेत. काँग्रेसच्या एका नाठाळ उमेदवाराला परवा अशीच अद्दल घडली. तिरुअनंतपुरमच्या देवळात स्वत:ची तुला करायला गेलेले हे खासदारमहाशय तागडीतून कोसळले आणि कपाळमोक्ष की जाहला! हे सारे घडले ते साधुजनांच्या शापामुळेच बरे! अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अमलात आला असला तरी, या कायद्याचे हात आधिभौतिकाच्या पलीकडे थोडेच पोचतात? किंबहुना, जिथे कुठलाच ‘हात’ पोचत नाही, तिथे साधुजनांचा वावर राहतो.

काही अजाण लोक ‘कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसते’, अशी म्हण तोंडावर फेकतील; पण हे ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर करावे! चिंतातुरजनांच्या मनात साहजिकच एक भाबडा प्रश्‍न उभा राहील, की बुवा, ‘या शापाला उ:शाप काय?’ तर आहे, आहे! प्रत्येक शापाला उ:शाप हा असतोच. शापित जीवन जगायचे नसेल, तर लोकशाहीचे व्रत अंगीकारावे. मनोभावे लोकवृत्ती जपावी. सदसद्विवेकबुद्धीला स्मरून शुद्ध मनाने मतदानाच्या रांगेत उभे राहावे. शांत मनाने स्वत:चाच कौल घ्यावा, आणि ‘योग्य’ ते बटण दाबावे. मतदानयंत्रातून आलेला यांत्रिक ध्वनी तत्क्षणी या शापातून मुक्‍तता करील. एक अनिर्वचनीय आनंद मनात नांदू लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 election commission banned from campaigning in Indian leader in editorial