Loksabha 2019 : नरेंद्र मोदी वि. राजीव गांधी (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही.

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले, तेव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारबरोबरच पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनाही एका अर्थाने मैदानात उतरवले होते. ‘काँग्रेसच्या साठ वर्षांच्या राजवटीत देशाची काहीच प्रगती झाली नाही. काँग्रेसला जनतेने साठ वर्षे दिली, मला साठ महिने द्या!’ असा त्यांच्या प्रचाराचा मुख्य रोख होता. मात्र, त्या निवडणुकीत घराणेशाहीच्या संदर्भात केलेल्या उल्लेखाशिवाय त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लक्ष्य केले नव्हते. यंदाच्या निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांत मात्र त्यांनी थेट राजीव गांधी यांना सामोरे आणले असून, आताची मोदी यांची लढाई सोनिया वा राहुल गांधी यांच्या नव्हे, तर राजीव गांधी यांच्याच विरोधात आहे, असे चित्र उभे राहिले आहे. त्याचे कारणही स्पष्ट आहे. राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठेच्या सात जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे, तर पंजाबमधील सर्व तेरा जागांसाठी १९ मे रोजी मतदान होणार आहे आणि या दोन्ही ठिकाणी राजीव गांधी यांचा थेट संदर्भ आहे. इंदिरा गांधी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर दिल्ली परिसरात भीषण हिंसाचार उसळला आणि त्यात अनेक शीख नागरिकांचा हकनाक बळी गेला. त्यामुळे दिल्ली व पंजाबमधील प्रचारात हा इतिहास उगाळून, होता होईल तेवढी मते फिरवणे, यापेक्षा राजीव गांधी यांना प्रचारात आणण्यामागे अन्य काही हेतू असू शकत नाही.

त्यामुळेच दिल्लीतील शीखविरोधी दंगलीनंतर राजीव गांधी यांनी केलेल्या ‘महावृक्ष उन्मळून पडला की धरती हादरतेच...’ या विधानाचे ‘ट्‌विट’ भाजपने केले आहे. शिवाय, राजीव गांधी यांची अधिकाधिक बदनामी करण्याच्या उद्देशाने बोफोर्स तोफाखरेदीतील गैरव्यवहार आणि ‘आयएनएस विराट’ या युद्धनौकेवरील त्यांची सहकुटुंब सहल यासंदर्भातही मोदींनी आरोप केले आहेत. गेल्याच आठवड्यात मोदी यांनी राहुल यांना शेवटच्या दोन टप्प्यांतील निवडणूक राजीव यांच्या नावावर लढवण्याचे आव्हान दिले आणि त्यानंतर प्रियांका गांधी यांनी हेच दोन टप्पे मोदी यांनी ‘नोटाबंदी व जीएसटी’ या दोन विषयांवर लढवून दाखवावेत, असे प्रतिआव्हान दिले होते. खरे तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सत्ताधारी पक्षप्रमुखाकडून, गेल्या पाच वर्षांत आपण काय केले आणि पुढच्या पाच वर्षांत काय करू इच्छितो, यासंदर्भात प्रचाराची अपेक्षा असते. मोदी मात्र या वेळीही आपण नेहरू, इंदिरा व राजीव गांधी यांच्याच विरोधात निवडणूक लढवत असल्याप्रमाणे प्रचार करीत आहेत. त्यामुळे ते विद्यमान सरकारचे प्रमुख आहेत की काँग्रेस सरकारच्या विरोधात लढत आहेत, असा प्रश्‍न मतदारांना पडला तर त्यात नवल नाही! शिवाय, ‘विराट’ युद्धनौकेवर राजीव गांधी परदेशी नागरिकांना घेऊन गेले होते, या मोदी यांच्या आरोपाचे खंडन माजी नौदलप्रमुख ॲडमिरल रामदास व अन्य ज्येष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी केले आहे. त्या पलीकडली बाब म्हणजे दस्तुरखुद्द मोदी हे अभिनेते अक्षयकुमार या ‘कॅनेडियन नागरिका’ला घेऊन ‘आयएनएस सुमित्रा’ युद्धनौकेवर कसे विहार करीत होते, याचा तपशील चित्रफितींसह समोर आला आहे. त्यामुळे राजीव गांधींच्या ‘कथित’ सहलीबाबत मोदी यांनी केलेल्या प्रचारामागील पितळ उघडे पडत आहे की नाही, याचा निर्णय अखेर मतदारांनाच करावा लागणार आहे.

एक मात्र खरे आणि ते म्हणजे निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत हातातून निसटत चाललेले ‘नॅरेटिव्ह’ मोदी यांनी पुनश्‍च एकवार आपल्या हाती आणण्यात यश मिळवले आहे. पहिल्या दोन टप्प्यांच्या प्रचारात राहुल व अन्य विरोधी नेत्यांनी नोटाबंदी, ‘जीएसटी’ व राफेल विमानखरेदीतील कथित गैरव्यवहार हे मुद्दे उपस्थित करून प्रचाराची दिशा आपल्या हातात ठेवली होती. प्रथम मोदी व भाजपने ‘राफेल’ला प्रत्युत्तर म्हणून ‘बोफोर्स’चा मुद्दा बाहेर काढत राजीव यांची ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ अशी संभावना करण्याचा प्रयत्न केला. बोफोर्स तोफाखरेदीत भले भ्रष्टाचार झाला असेल; मात्र त्याचे धागेदोरे राजीव गांधी यांच्यापर्यंत पोचत नसल्याचा निर्वाळा न्यायालयानेच नव्हे, तर विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तेव्हाच्या चौकशी समितीवर काम करीत असताना दिल्याचे आता स्पष्ट होत आहे. हे सारे प्रकार गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच सुरू आहेत, यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 narendra modi vs rajiv gandhi in editorial