अग्रलेख : हे राम!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!  

सध्या जो हैदोस सुरू आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल, तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!  

लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचा एकूण दर्जा कमालीचा घसरल्याबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच अखेरच्या टप्प्यात भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण करून तळ गाठला. नथुराम आणि त्याचा विचार यांना प्रस्थापित करण्याचे प्रयत्न काही फुटकळ व्यक्ती वा संघटनांकडून होत असतात; परंतु सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराने तसा प्रयत्न करावा, हे गंभीर आणि धक्कादायक आहे. स्वतः प्रज्ञासिंह ठाकूर किंवा भाजप नेत्यांनी याविषयी कितीही खुलासे केले तरी जे बोलले गेले त्यातील विखार लपणारा नाही. लोकशाहीत कोणत्याच हत्येचे समर्थन होऊ शकत नाही; पण निवडणुकीला उभी असलेली व्यक्ती जर महात्म्याच्या हत्येचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन करीत असेल तर अशांची लोकशाहीवरील निष्ठाच बेगडी आहे, हे नक्की. गांधींना गोळ्या घालून संपवता येत नाही, हे एव्हाना कळून चुकले आहे. पण हा पराभव पचविणे काहींना जमत नाही. त्यांच्या पुतळ्याला गोळ्या घालण्याचा उपद्‌व्यापही उत्तर प्रदेशात मध्यंतरी झाला होता, तो याच वैफल्यातून.

यंदाची लोकसभा निवडणूक; विशेषतः त्यातील प्रचाराचे हिणकस स्वरूप देखील कुणी विसरू शकणार नाही. बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नक्षलवाद, दहशतवाद, सामाजिक तणाव, बालविवाहासारख्या कुप्रथा, कुपोषण, पाण्याच्या पुरेशा व दर्जेदार पुरवठ्याचा प्रश्‍न, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्‍न उग्र स्वरुपात आपल्यापुढे उभे असताना आपल्या नेत्यांनी निवडणुकीत प्रचार केला तो इतिहासपुरुषांच्या चांगले-वाईटपणावर आणि सैनिकांच्या शौर्यावर. एकूण सात टप्प्यांत होत असलेल्या या निवडणुकीचा शेवटचा टप्पा एका दिवसावर येऊन ठेपलेला असताना चुकून सुद्धा ठळकपणे जनतेच्या प्रश्‍नांची चर्चा झाल्याचे दिसले नाही. तोंडी लावण्यापुरते जनतेचे प्रश्‍न आणि एकमेकांवर फेकण्यासाठी अस्मिता व इतिहास पुरुषांची क्षेपणास्त्रे असे या निवडणुकीचे स्वरूप होते. पहिल्या दोन टप्प्यांनंतर काँग्रेसने प्रचाराला खऱ्या मुद्यांवर आणण्याचा प्रयत्न केला. भाजपचा जाहीरनामा येण्यापूर्वीच काँग्रेसने ‘न्याय’ योजना जाहीर करून गरिबीचा विषय राजकारणाच्या ऐरणीवर आणला आणि त्याला नोटाबंदीशी जोडले. पण, अवघ्या दोन-चार दिवसांत प्रचार भलत्याच वळणाला लागला. आधी हेमंत करकरे यांना भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी दिलेल्या कथित शापाचे प्रकरण गाजले आणि त्यानंतर अवघे राजकारण महात्मा आणि राजीव अशा दोन गांधींवर येऊन स्थिरावले. त्यात मध्येच ईश्‍वरचंद्र विद्यासागरही चर्चेत आले. लोककल्याणाचे मूलभूत विषय सोडून भलत्याच विषयांकडे प्रचाराची भाषणे वळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना, नकळत का होईना, विरोधकांनी बळ दिले. कमल हासन या अभिनेत्याने गोडसेला ‘हिंदू दहशतवादी’ संबोधून हा वाद सुरू केला. एवढेच बोलून तो थांबला नाही. प्रत्येक धर्माला स्वतःचा दहशतवादी असल्याचे वक्तव्यही त्याने केले. एका क्षेत्रात लोकप्रियता मिळाली, की आपण सर्वच विषयांत बोलण्यास मुखत्यार आहोत, अशी काहींची समजूत असते. कमल हासन यांच्या बाबतीतही तेच झालेले दिसते. पश्‍चिम बंगालमध्ये तर हद्दच झाली. एखादे युद्ध असावे, अशा रीतीने  हाणामाऱ्या झाल्या.

प्रश्‍न फक्त निवडणुकीपुरता नाही. या देशाचे सहिष्णुतेचे, सामंजस्याचे अधिष्ठान बदलून त्या जागी फक्त कडव्या आणि फसव्या राष्ट्रभक्तीला प्रतिष्ठित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोडसेला राष्ट्रभक्त  ठरवणारे भाजपचे नेते आणि त्यावर गहजब उडताच राजकीय सोय पाहून माफीनाम्याची व्यवस्था करणारी त्याच पक्षाची यंत्रणा हे अंतर्द्वंद्व पाहायला मिळाले. हे द्वंद्व नैसर्गिक नाही.  हे असे करायचे आणि त्यानंतर ते तसे करायचे, हे सारे ठरवून केले गेले. भारतातल्या सत्तरीपल्याडच्या लोकशाहीकडे सारे जग कुतुहलाने बघण्याचा काळ मागे पडून जागतिक समुदायाच्या भुवया उंचावलेल्या असताना हे घडले. आपल्या प्रचार मोहिमेत नको तितका थिल्लरपणा आल्याच्या टिप्पण्या आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या गेल्या. एकीकडे देशाचा मान-सन्मान जगात वाढत असल्याबद्दल छाती फुगवायची आणि त्याचवेळी या प्रतिमेवर शिंतोडे उडविणारी वक्तव्ये करायची, हे राजकीय नेत्यांचे दुटप्पी वर्तन देशाला मागे नेणारे आहे.  ‘विरोधक पाकिस्तानधार्जिणे आहेत’ किंवा ‘सत्ताधीश चोर आहेत’ अशा हीन प्रचाराचा कलकलाट दुनियेत आपली नेमकी कोणती प्रतिमा तयार करीत असेल? सुज्ञ माणसाला राजकारणाची शिसारी यावी, अशा पद्धतीचा प्रचार या वेळी केला गेला. त्याला भाजपचा मूळ मुद्यांपासून भरकटवण्याचा डाव जसा कारणीभूत आहे, तसाच त्यात विरोधकांनी त्या डावात अलगद सापडण्याच्या कमकुवतपणाचाही दोष आहे. सध्या जो काही  हैदोस घातला जातो आहे, त्यालाच लोकशाही म्हणायचे असेल तर आपल्याला आता मिळवण्यासारखे काहीही राहिलेले नाही. सामाजिक सद्‌भाव, सौहार्द आणि गांधीवादी सहिष्णुतेसारखे मिरवण्यासारखे जे काही होते, ते तर आपण संपवायलाच निघालो आहोत!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loksabha 2019 Pragya Thakur apologises for calling Nathuram Godse a patriot in editorial