Loksabha 2019 : बंगभूमीतील दंगा (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली.

बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली.

दे शातील यंदाच्या ‘लोकशाहीच्या महाउत्सवा’चे सांगता पर्व जवळ येऊन ठेपले असतानाच, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे. तो मतदान यंत्राच्या माध्यमातून होणाऱ्या शांततामय स्पर्धेचा राहिलेला नाही. प्रतिस्पर्ध्यांना मारहाण करून त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करण्यात काही गैर आहे, ही भावनाच जर बोथट होऊ लागली असेल; तर तो लोकशाहीला असलेला सर्वांत मोठा धोका आहे. पण, लोकशाहीचा उठताबसता उच्चार करीत नेमके त्याच्याशी विसंगत वर्तन राजकीय पक्षांकडून घडते आहे. मंगळवारच्या या घटनांत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोघांचीही जबाबदारी आहे, यात शंका नाही. ही निवडणूक आहे; युद्ध नव्हे, याचाच सत्तेच्या या स्पर्धेत बेभान झालेल्यांना विसर पडला आहे. ममतादीदी आणि मोदी यांच्यातील वाग्‌युद्ध खरे तर मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासूनच सुरू झाले होते आणि त्यातून दंग्याधोप्याच्या ठिणग्याही उडत होत्या. त्याचाच कहर मंगळवारी सायंकाळी अमित शहा यांच्या कोलकता विद्यापीठापासून सुरू झालेल्या ‘रोड शो’च्या वेळी बघायला मिळाला.
बंगालमध्ये एकोणिसाव्या शतकात घडून आलेल्या प्रबोधनाचे उद्‌गाते ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या कॉलेजजवळ शहा यांचा ‘रोड शो’ येताच ‘तृणमूल’ व भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या सुरू झाल्या आणि त्यात विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या ठिकऱ्या उडाल्या. प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याचे यापेक्षा विदारक दर्शन कोणते असू शकते? संपूर्ण देशात मतदानाचे सहा टप्पे शांततेत पार पडले असताना, नेमके बंगालमध्येच असे प्रकार घडत आहेत, हे ममतादीदी, तसेच बंगालमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हजारो जवान तैनात करणारे केंद्र सरकार या दोघांच्याही हितसंबंधांवर प्रकाश टाकणारे आहे. त्यामुळेच आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरीत ईश्‍वरचंद्रांच्या पुतळ्याची मोडतोड ही ‘तृणमूल’च्या कार्यकर्त्यांनीच बंगाली अस्मिता चिथावण्यासाठी केल्याचा आरोप शहा यांनी केला आणि त्याला तितकेच आक्रमक उत्तर ‘तृणमूल’चे प्रवक्‍ते डेरेक ओब्रायन यांनी या पुतळ्याच्या मोडतोडीचे व्हिडिओ समोर आणत दिले आहे.

गेल्या लोकसभेत मोदी यांनी उभ्या केलेल्या लाटेच्या जोरावर भाजपने उत्तर प्रदेशात ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या. गुजरात आणि राजस्थानमध्येही सर्व म्हणजे ५१ जागा भाजपने जिंकल्या होत्या. या वेळी त्यात वाढ होण्याची शक्‍यता नसून, उलट उत्तर प्रदेशात मायावती-अखिलेश आणि अजितसिंह यांच्या आघाडीमुळे मोठी घट होऊ शकते, असा अंदाज आहे. या पट्ट्यात गमावलेली प्रत्येक जागा बंगालमधून भरून काढण्याचे मनसुबे मोदी-शहा यांनी रचले होते आणि बंगालमध्ये डाव्या पक्षांनी गमावलेला जनाधार आपल्या बाजूने येईल, यासाठी रणनीती आखून दोन वर्षांपूर्वी कामही सुरू केले होते. त्याचे दृश्‍य स्वरूप पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपच्या मतांत झालेल्या भरघोस वाढीमुळे बघावयास मिळाले होते. त्यामुळेच भाजप आता ममतादीदींशी अटीतटीच्या झुंजीत उतरला आहे. ममतादीदीही प्रतिपक्षाच्या डावपेचांचाच वापर करून उत्तर देत आहेत. बंगालमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवणे त्यांना भाग आहे; अन्यथा राष्ट्रीय राजकारणातील त्यांचे वजन कमी होईल. ते परवडणारे नाही. आचारसंहिता धाब्यावर बसविण्यात, हाती असलेल्या यंत्रणांचा बेमुर्वतपणे वापर करण्यात त्या भाजपइतक्‍याच हमरीतुमरीने उतरल्या आहेत. भाजपची रणनीती ही दंगलींमधून होणारे ध्रुवीकरण हीच राहिलेली आहे. मोदी यांचे नाव भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करताच, अवघ्या चार दिवसांत उत्तर प्रदेशची सूत्रे अमित शहा यांच्या हाती देण्यात आली आणि त्यानंतर लगोलग मुझफ्फरनगरमध्ये दंगल उसळली होती. त्याच धर्तीवर गेली दोन वर्षे रामनवमीचा मुहूर्त साधून बंगालमध्ये दंगेधोपे होत आहेत. तेव्हापासून ‘तृणमूल’ आणि भाजप यांच्यात संघर्षाच्या ठिणग्या उडत आहेत.

गुजरात, तसेच अन्य हिंदीभाषक पट्ट्यात गमावलेल्या जागांची भरपाई बंगाल आणि ओडिशामधून झाली नाही, तर भाजपला मोठा फटका बसू शकतो आणि त्याची परिणती कदाचित सत्तांतरातही होऊ शकते. त्यामुळेच ‘इंद्रप्रस्था’वरील आपले राज्य कायम राखण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद बंगालमध्ये पणास लावली असून, ममतादीदीही त्यांच्याशी कडवी झुंज देत आहेत. या रणसंग्रामाची अंतिम फेरी येत्या रविवारी आहे. तोपावेतो बंगाल असाच धुमसत राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 west bengal election and amit shah road show in editorial