esakal | Loksabha 2019 : बदललेला बाज! (अग्रलेख)
sakal

बोलून बातमी शोधा

political flags

Loksabha 2019 : बदललेला बाज! (अग्रलेख)

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

निवडणुकीच्या आधीच्या दोन टप्प्यांत राष्ट्रवाद आणि सुरक्षा या मुद्यांवर भाजपने भर दिला होता; पण तिसऱ्या आणि सर्वाधिक जागा असलेल्या तिसऱ्या टप्प्यात प्रचाराचा बाज बदलून टाकताना भाजपने आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा समोर आणण्याची खेळी केली आहे.

संपूर्ण देशाचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात सर्वाधिक ११६ जागांसाठी आज मतदान होत असले, तरी या टप्प्यात प्रचाराचा बाज आरपार बदलून गेला आहे. पहिल्या दोन टप्प्यांत १८६ जागांसाठी मतदान झाले आणि आजच्या मतदानामुळे त्रिशतकी मजल पार पडणार आहे. हा टप्पा भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा आहे; कारण या प्रमुख पक्षांचे अध्यक्ष अमित शहा व राहुल गांधी यांचे भवितव्य आज ‘इव्हीएम’मध्ये बंद होणार आहे. शहा हे गुजरातेत गांधीनगरमधून निवडणूक लढवत असून, त्यांच्यासमवेत गुजरातेतील सर्व २६ जागांसाठी आजच मतदान होत आहे. राहुल गांधी यांचे भवितव्य केरळमधील वायनाड येथील मतदारांच्या हाती असले, तरी ते अमेठीतूनही मैदानात आहेत. सत्ताधारी भाजपप्रणीत ‘रालोआ’साठी महाराष्ट्रातील १४ जागांवर होत असलेले मतदान कळीचे ठरणार आहे. या अटीतटीच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली, तेव्हा पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर पाकपुरस्कृत ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने केलेला भीषण हल्ला आणि नंतर त्याला हवाई दलाने दिलेले ठोस प्रत्युत्तर यामुळे राष्ट्रवाद व देशाची सुरक्षा हे मुद्दे ऐरणीवर आले होते. मात्र, त्यानंतर बघता बघता प्रचाराचे मुद्दे बदलत गेले आणि आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला चार दिवस राहिले असताना, भाजपने ‘साध्वी’ प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देऊन निवडणुकीतील उर्वरित टप्प्यांत केवळ हिंदुत्ववादावरच जनता कौल मागण्याची खेळी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१४ मध्ये लोकसभेत निखळ बहुमत मिळवले, तेव्हा हिंदुत्ववादाचा मुद्दा भाजपसाठी ‘समृद्ध अडगळ’ बनला होता. गुजरातमध्ये तीन निवडणुका जिंकणाऱ्या मोदी यांच्या ‘गुजरात मॉडेल’ची चर्चा होती आणि जनतेला ‘अच्छे दिन!’ नावाचे स्वप्न दाखवण्यात आले होते. त्याची पूर्ती झाली की नाही, यावर चर्चा न करता अखेर भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांना पुढे करण्याचा अर्थ स्पष्ट आहे.

स्वत:ला साध्वी म्हणवून घेणाऱ्या प्रज्ञासिंह यांनीही भाजपने सोपविलेला ‘रोल’ चोख निभावण्याचे ठरविले असावे. अन्यथा मुंबईवरच्या ‘२६/११’ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेले ज्येष्ठ पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांना आपल्या शापामुळेच मृत्यू आला, असे बेताल विधान त्यांनी केलेच नसते.भाजपही त्यामुळे अडचणीत आला आणि या तथाकथित साध्वीला ‘जर-तर’च्या भाषेत का होईना माफी मागणे भाग पडले. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही करकरे यांच्या गौरवपर उद्‌गार काढावे लागले. या पार्श्‍वभूमीवर पुढच्या पंधरवड्यात प्रचाराची दिशा अधिकाधिक आक्रमक होत जाणार, असे स्पष्ट दिसू लागले आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील अनेक कळीच्या जागांवर मतदान होत आहे. त्यात प्रथम क्रमांकावर आहे तो सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघ. दस्तुरखुद्द मोदी यांनी या टप्प्यात महाराष्ट्रात घेतलेल्या अनेक सभांमध्ये थेट शरद पवार यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व पवार करत असल्यामुळे मोदी यांनी त्यांना ‘टार्गेट’ करणे स्वाभाविक म्हणावे लागेल. मात्र, या टप्प्यात खरी रंगत आणली ती राज ठाकरे यांनी गावोगावी थेट मोदी यांचेच पूर्वीचे व्हीडिओ दाखवून त्यांच्याबरोबरच शहा यांच्यावर चढवलेल्या सप्रमाण हल्ल्यांमुळे. या हल्ल्यांमुळे भाजप आणि मुख्यत: शिवसेना किती अस्वस्थ आहे याची साक्ष मुंबईतील राज यांच्या सभेस परवानगी देण्याच्या प्रश्‍नावरून घालण्यात आलेल्या घोळामुळे मिळालीच आहे. आता राज यांच्या सभांचे नेमके काय परिणाम होतात, ते बघण्यासाठी निकालांपर्यंत थांबावे लागणार आहे. याच टप्प्यात उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या मैनपुरी मतदारसंघात त्यांच्या समवेत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी घेतलेल्या सभेमुळे उत्तर प्रदेशातील वातावरण आणखी गरम होणार, याची प्रचिती आली आहे. जवळपास २५ वर्षांनी उत्तर प्रदेशातील हे दोन बडे नेते आपले हाडवैर विसरून एकाच व्यासपीठावर आले, हे या टप्प्यातील प्रचाराचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. आता या आक्रमक हिंदुत्वाच्या बाजाला विरोधक कसे उत्तर देतात, हे पुढच्या टप्प्यांच्या प्रचारात दिसून येईल. मात्र, या साऱ्या रणधुमाळीत रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा यासारखे मुद्दे पार कुठल्या कुठे वाहून गेले आहेत आणि हेच या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचे ठळक ‘वैशिष्ट्य’ म्हणावे लागेल.

loading image
go to top