अग्रलेख : युतीची पुढची गोष्ट!

M Fadnavis attends Shiv Senas 53rd foundation day
M Fadnavis attends Shiv Senas 53rd foundation day

मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे.

शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राच्या कायमचा स्मरणात राहील. त्याचे कारण म्हणजे ‘आता युतीची पुढची गोष्ट सुरू होत आहे!’ असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या ५३व्या वधार्पन दिन सोहळ्यात केले. गेली चार वर्षे महाराष्ट्राच्या सत्तेत चतकोर-नितकोर का होईना वाटा उपभोगत भाजपवर रोज कडाडून आसूड ओढणाऱ्या उद्धव यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माघार पत्करली आणि युती केली, तेव्हाच ही ‘युतीची नवी गोष्ट’ सुरू झाली होती. मात्र, तो जनतेचा गैरसमज होता आणि खरीखुरी पुढची गोष्ट आताच सुरू झाली आहे! हा सोहळा अनेकार्थाने अनुपम होता. कारण, ‘वाघाच्या तोंडात, घालूनी हात, मोजतो दात...’ असा इशारा शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन वर्षांपूर्वी देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने या सोहळ्यास उपस्थित होते. तेथे केलेल्या भाषणातून त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. ‘बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसैनिकांपासून ऊर्जा घेण्यासाठी आपण येथे आलो आहोत,’ असे सांगून त्यांनी टाळ्या मिळवल्या. शिवाय, युतीत मोठा भाऊ कोण, हा प्रश्‍न नव्या गोष्टीतही रोजच्या रोज शिवसेना उपस्थित करत असतानाही, ‘उद्धव हे आपले मोठे बंधू आहेत!’ असे सांगून टाकले. चारच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आता तेच पुढचे मुख्यमंत्री असतील, अशा गर्जना शिवसेना नेते करत होते. शिवाय, वर्धापनदिनी शिवसेनेच्या मुखपत्रातून ‘पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!’ अशी द्वाहीही फिरवण्यात आली होती. फडणवीस यांनी मात्र ‘मुख्यमंत्री कोण, हा मीडियाने चघळण्याचा विषय आहे!’ असे सांगत या गर्जनांची खिल्ली उडवली. शिवाय, नेमक्‍या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधूनच त्यांनी नाणार येथील बहुचर्चित तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवला जाणार असल्याचा निर्णय विधानसभेतील एका लेखी उत्तरात देऊन मोठीच बाजी मारली.

मात्र, उद्धव हे फडणवीस यांच्या भाषणामुळे बिलकूलच बिचकून गेले नाहीत! उलट ‘आमचं सगळं ठरलंय!’ असे सांगत त्यांनी पुनःश्‍च एकवार ‘सगळे कसे समसमान पाहिजे!’ असे सांगत मुख्यमंत्रिपदावरील आपल्या दाव्याचा अप्रत्यक्षरीत्या पुनरुच्चार केलाच. शिवाय, भाजपपेक्षा आमचे हिंदुत्व कसे प्रखर आहे, हे दाखविण्याची संधीही त्यांनी घेतली. मात्र, त्याचवेळी चारच दिवसांपूर्वी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे दहा मंत्री शपथ घेत असताना शिवसेनेच्या पदरात मात्र फडणवीस यांनी अवघी दोनच मंत्रिपदे टाकली होती, याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. बाकी उद्धव यांचे सगळे भाषण हे शिवसैनिकांची समजूत काढण्याच्या सुरातच होते. उत्तर प्रदेशात बुआ आणि भतिजा म्हणजेच मायावती आणि अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडी केली होती. मात्र, ‘ती आघाडी केवळ सत्तेच्या लोभापोटी झाली होती आणि आमची युती मात्र ‘दिल से’ झाली आहे!’ असे उद्धव यांनी सांगून टाकले. याचा अर्थ शिवसैनिकांना समजला नसेल, असे बिलकूलच नाही. राज्याच्या सत्तेत पुन्हा वाटा मिळावा, यापलीकडे खरे तर शिवसेनेने आपला घोडा अडीच घरे मागे घेत केलेल्या या युतीला काहीही अर्थ नाही. चार वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद सन्मानाने स्वीकारल्यानंतर महिनाभरातच शिवसेना विरोधी बाकांवरून उठून मिळालेली मंत्रिपदे स्वीकारत सरकारमध्ये सामील झाली, याचे कारण १५ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यामुळे सत्तेच्या लोभापोटीच शिवसेना तेव्हा फुटीच्या उंबरठ्यावर उभी होती, हेच आहे. त्यामुळे आता आमची युती ही भावनिक आहे, वगैरे सांगणे म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ वारा!’ या उक्‍तीचे प्रत्यंतर आणून देण्यापलीकडे आणखी काहीच नाही.

मात्र, या पार्श्‍वभूमीवर नाणार प्रकल्पाच्या स्थलांतराकडे अधिक गांभीर्याने बघायला लागते. हा महाकाय तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणार येथे उभारण्यास शिवसेनेचा पर्यावरण, तसेच अन्य कारणांमुळे विरोध होता. मग आता रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प उभारला गेला, तर त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे काय, या प्रश्‍नाचे उत्तर खरे म्हणजे उद्धव यांच्याकडून या सोहळ्यात अपेक्षित होते. मात्र, फडणवीस यांना या सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली होती. कारण, या वक्‍तृत्व स्पर्धेत बाजी मारली ती फडणवीस यांनीच! त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, तेही स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात ‘युतीच्या या नव्या गोष्टी’त कथानक आणखी कशी वळणे घेते, ते बघण्यासाठी शिवसैनिकांना विधानसभा निकालांची वाट बघावी लागणार असली, तरी या गोष्टीचा उत्तरार्धही खरे म्हणजे त्यांना ठाऊक आहेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com