दृष्टिकोन : आम्ही विरोधक जरूर असू...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन देशाबाबत केलेली विधाने सभ्यतेची मर्यादा ओलांडणारी होती. ते हेतूतः हिणकस स्वरुपाचे राजकारण करत आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Summary

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन देशाबाबत केलेली विधाने सभ्यतेची मर्यादा ओलांडणारी होती. ते हेतूतः हिणकस स्वरुपाचे राजकारण करत आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन देशाबाबत केलेली विधाने सभ्यतेची मर्यादा ओलांडणारी होती. ते हेतूतः हिणकस स्वरुपाचे राजकारण करत आहेत. आपल्या राजकारणासाठी ते स्टालिन आणि माओच्या भाषेचा वापर करत आहेत.

ही खूप जुनी, तीसेक वर्षांपूर्वीची आठवण आहे. वर्ष नेमके आठवत नाही, पण बहुधा १९८६ ते ९० या काळात कधीतरी घडलेली ही घटना आहे. (कै.अटलजी त्यावेळेला भाजपचे खासदार होते, विरोधी पक्षनेतेसुद्धा नव्हते. कारण तेव्हा भाजपकडे तेवढे संख्याबळ नव्हते. ते परदेश दौऱ्यावर गेले होते. एका ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारत सरकारच्या धोरणांचे समर्थन केले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, ‘तुम्ही विरोधी पक्षाचे नेते असूनही सरकारच्या धोरणांचे समर्थन कसे करता?’ अटलजींनी दिलेले उत्तर तेथे जमलेल्या सर्वांनाच थक्क करणारे होते. अटलजी म्हणाले होते, ‘मी विरोधक असलो तर काँग्रेसचा विरोधक आहे, भारत सरकारचा नाही. येथे मी भारताचा नागरिक म्हणून आलो आहे, मी माझ्या देशाच्या सरकारचीच बाजू मांडणार. आमचं जे काही भांडण असेल ते आम्ही आमच्या देशात करू, परदेशात आम्ही एकत्रच आहोत.’

तशीच दुसरी आठवण सध्याच्या पंतप्रधानांची आहे. नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. वर्ष २०१०-११ असेल. मोदी चीनच्या दौऱ्यावर होते. चीनमध्ये गेल्या-गेल्या त्यांनी भारतीय राजदुताची भेट मागितली. दोन तास त्यांची भेट झाली. भेटीत विविध विषयांवर भारत सरकार काय भूमिका मांडते, हे त्यांनी समजावून घेतले. भेट संपताना राजदुतांनी मोदींना विचारलं, ‘सर, आपले आणि या सरकारचे टोकाचे मतभेद आहेत. तुमची मतेसुद्धा वेगळी आहेत, मग सरकारची भूमिका का समजून घेताय?’ मोदींनी उत्तर दिलं होतं, ‘इथे मी भारताचा नागरिक आहे. इथे असेपर्यंत माझ्या देशाच्या सरकारचे जे मत तेच माझे मत असेल. नकळत सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळं बोललं जाऊ नये, यासाठी मी तुमच्याकडून विषय समजावून घेतले!’

राहुल यांचे विपरीत वर्तन

राहुल गांधींनी अलीकडेच ‘केंब्रिज’मध्ये जी वक्तव्ये केली ती वाचल्यानंतर या घटना स्वाभाविकपणे आठवल्या. अर्थात कै. अटलजी, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात काही मूलभूत फरक आहेत. अटलजी, मोदी दोघेही अतिशय सर्वसामान्य घरात जन्मलेल्या व्यक्ती आहेत. या घटना घडल्या तेव्हा पुढे जाऊन आपण पंतप्रधान होऊ शकतो, अशी शंकासुद्धा त्यांच्या मनात नव्हती. पंतप्रधानपद हा आपला वंशपरंपरागत हक्क आहे, असा भ्रम त्यांच्या मनात असण्याचा मुद्दाच नव्हता. म्हणूनच नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात निर्माण झालेल्या अवघड पेचप्रसंगात भारताचे नेतृत्व तेव्हाचे विरोधी पक्षनेते असलेल्या वाजपेयींकडे विश्वासाने सोपवले. अनेक पाश्चात्य राजकारणी व पत्रकारांसाठी ती अपूर्व घटना होती. पण वाजपेयी यांनी पंतप्रधानांचा आणि देशाचा विश्वास सार्थ ठरवला. तो पेचप्रसंग भारताच्या बाजूने सोडवूनच ते परत आले होते.

गेल्या आठ वर्षांमध्ये राहुल गांधी ज्या-ज्या वेळेला परदेशात जाऊन बोलले त्या-त्या वेळेला त्यांनी नेमके उलटे वर्तन केले आहे. या वेळेला ‘केंब्रिज’मध्ये बोलताना तर त्यांनी सभ्यतेच्या मर्यादाच ओलांडल्या. आर्थिक दिवाळे निघालेल्या पाकिस्तान आणि श्रीलंकेबरोबर भारताची तुलना केली. ज्या दिवशी राहुल गांधी ही असली विधाने करत होते, त्याच्या काही दिवस अगोदर, १३ मे रोजी, विविध देशांकडील परकी चलनाच्या साठ्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार चीन, जपान आणि स्वित्झर्लंड यांच्यानंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. त्या यादीत अमेरिका तेराव्या, राहुल गांधी ज्या ब्रिटनमध्ये बोलत होते ते पंधराव्या, तर राहुल गांधींचे आजोळ असलेले इटली सतराव्या स्थानावर आहे.

ज्यांच्या रांगेत भारताला बसवण्याची त्यांची इच्छा आहे ते पाकिस्तान ७६व्या आणि श्रीलंका १८९व्या स्थानावर आहेत. सोन्याच्या साठ्यामध्ये आपण नवव्या, तर पाकिस्तान ४३व्या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या संकटानंतर भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे जागतिक बँकेने मान्य केले आहे. याच काळात भारताने आपल्या देशातील दारिद्र्य जवळपास दूर केले आहे. ‘‘India has almost eradicated extreme poverty and brought down consumption inequality to its lowest levels in 40 years,’’ असेही जागतिक बँक म्हणते. पण, यापैकी राहुल गांधींना काहीच दिसत नाही अथवा ऐकू येत नाही.

हिणकस राजकारण

राहुल गांधी यापेक्षाही एक घातक खेळ हेतूत: खेळत आहेत. ‘भारत हे राष्ट्र नसून राज्यांचा समूह आहे,’ असा दावा ते पुन्हा पुन्हा करीत आहेत. आपला दावा किती खरा आहे हे दाखवण्यासाठी ते भारताच्या राज्यघटनेचा वापर करीत आहेत. त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या सर्वांच्या माहितीसाठी आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील संबंधित ८१ शब्दांचा भाग मी येथे देतो.

‘WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a SOVEREIGN DEMOCRATIC REPUBLIC and to secure to all its citizens JUSTICE, social, economic and political; LIBERTY of thought, expression, belief, faith and worship; EQUALITY of status and of opportunity; and to promote among them all FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity of the Nation; IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.

या भागात कुठेही ‘Union of States’ हा शब्द वापरलेला नाही. इथे केवळ ‘Nation’ हाच शब्द वापरला आहे. मुळात Union of States आणि United States यात देखील प्रचंड फरक आहे. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत बोलताना हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. त्यावेळेला Federation of States आणि Union of States यातला फरक उलगडून सांगताना ते म्हणतात की, ‘भारतात अनेक राज्ये असली तरी हे राज्यांनी एकत्र येऊन केलेले Federation of States नाही. ती पूर्वीपासूनच ‘राष्ट्र’ म्हणून एकत्र आहेत. प्रशासकीय कारभाराच्या सोयीसाठी ही राज्ये वेगवेगळी आहेत. त्यांना या राष्ट्राबाहेर पडण्याचा अधिकार नाही. The country is one integral whole, it’s people a single people living under a single imperium derived from a single source.’

तरीसुद्धा राहुल गांधी पुन्हा पुन्हा खोटे बोलताहेत. पंतप्रधानपदावरील आपला वंशपरंपरागत हक्क डावलला, या तीव्र भावनेमुळे ते हिणकस राजकारण करत आहेत. आपल्या राजकारणासाठी ते स्टालिन व माओच्या भाषेचा वापर करत आहेत. राहुल गांधी ‘केंब्रिज’मध्ये जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्याबरोबर कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी होते. ‘भारत नावाचे कोणतेही राष्ट्र अस्तित्वात नाही, जे काही आहे तो अठरा राष्ट्रांचा समूह आहे. त्या सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे,’ ही भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १९३४मध्येच घेतलेली आहे. आजतागायत त्यांनी ती मागे घेतलेली नाही किंवा चुकीची आहे असे म्हटलेले नाही. अशा पक्षाच्या नेत्याबरोबर बसून राहुल गांधी त्यांचीच भाषा बोलत आहेत. या देशाच्या एकात्मतेला व अस्तित्वाला खरा धोका कुठून आणि कोणता आहे, हे जनतेने समजून घ्यावे.

(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत.)

madhav.bhandari@yahoo.co.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com