
महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरू लागल्याची चर्चा मागील काही वर्षे निरंतर सुरू आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेली हाणामारी हे तर राजकारण किती खालच्या पायरीवर आले आहे, याचे द्योतक आहे. या घटनेवर संताप व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘राज्यातील जनता आज आपल्याला, आमदारांना शिव्या देत आहे. कुण्या एका व्यक्तीची नाही तर येथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झालीय. आपल्या सगळ्याबद्दल बोलले जात आहे की हे सगळे आमदार माजले म्हणून… ही विधानसभा आमदार, मंत्री कर्मचाऱ्यांची नसून ती राज्यातील १४ कोटी जनतेची आहे. आमदार सत्तेचा गैरवापर करतो, असे लोकांचे मत तयार होते. या अधिवेशनात ज्या घटना घडल्या त्यामुळे काय संदेश घेऊन आपण लोकांसमोर जाणार? या विधानसभेतून समाजाला दिशा देण्याचे काम झाले पाहिजे. विचारातून, चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांतून संदेश जाणार असेल तर सगळ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे.