
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे २०२५ हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. आज संस्थेस २५ वर्षे पूर्ण झाली. या पंचवीस वर्षांच्या काळात सहकार क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे झाली. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून या महामंडळाची स्थापना करण्यात आली. ते स्वतः मंडळाचे पहिले अध्यक्ष होते व डॉ. सुधीरकुमार गोयल तत्कालीन सहकार आयुक्त हे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते. संस्थेचा प्रमुख उद्देश राज्यातील साखर उद्योगाच्या सर्वांगीण विकास करणे, त्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून कंपनी कायदा अंतर्गत नोंदणी झाले. राज्याचे अर्थमंत्री, सहकारमंत्री, सहकार व साखर विभागाचे आयुक्त, पणन संचालक हे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून होते. काळानुरूप नवीन शिखरे गाठायचे असेल तर कामकाजात बदल करणे क्रमप्राप्त असते, याच उक्तीनुसार संस्थेच्या संरचनेत व कामकाजात बदल करण्यात आले. सध्या महामंडळाचे अध्यक्ष हे राज्याचे सहकार मंत्री असून, राज्याचे सहकार आयुक्त,साखर आयुक्त व पणन संचालक हे पदसिद्ध संचालक आहेत.