ढिंग टांग : दिसते मजला सुखचित्र नवे..!

‘‘साहेब आज कुठली गाडी काढू?’’ असे चालकाने अदबीने विचारल्यावर आम्ही तोंडातल्या तोंडात बरळत खाजगी सचिवाकडे तिरसटून असे काही पाहिले की चालक तेथून पसार होत्साता मर्सिडिज गाडी घेऊनच आला
ढिंग टांग
ढिंग टांगsakal media

‘‘साहेब आज कुठली गाडी काढू?’’ असे चालकाने अदबीने विचारल्यावर आम्ही तोंडातल्या तोंडात बरळत खाजगी सचिवाकडे तिरसटून असे काही पाहिले की चालक तेथून पसार होत्साता मर्सिडिज गाडी घेऊनच आला. सचिवाने दार उघडून धरल्यावर मोजून सात मिनिटांनी आरामात डुलत डुलत येऊन आम्ही गाडीत बसलो. मंत्रालय परिसरातील पंचतारांकित हाटेलातील आलिशान सूटमध्ये शिरुन आम्ही अनुक्रमे एक हजार, अठराशे आणि चोवीसशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे व्यवहार मार्गी लावून भोजनासाठी उठलो. फक्त एक सूप आणि पावाचा तुकडा उचलून आम्ही उष्टावलो, आणि लगेच निघालो, कारण आमच्या गॉल्फ खेळाची वेळ झाली होती. गॉल्फ खेळता खेळता लांबवर सटका मारुन आम्ही चेंडू तळ्याच्या पल्याड टिकवला. क्याडी (पक्षी : गॉल्फ खेळात हा एक सहायक असतो म्हणे!) तत्परतेने चेंडू आणण्यासाठी तळ्यात कुदला.

बक्षीसाखातर आम्ही क्याडीच्या अंगावर एक पाश्शेची नोट भिरकावली. खेळता खेळता आम्ही जमिनींचे आणखी तीन व्यवहार मार्गी लावले. ‘सरकारी मंजुऱ्यांचे लोड घेऊ नका, मी आहे!’ असे आश्वासन संबंधितांना देऊन आम्ही पुन्हा गाडीत बसलो. घरी परतलो तर पाहातो तो काय, घरात पाहुणे आले होते. घराबाहेर तीनशेचाळीस ओबीव्हॅन आणि कॅमेराधारी पत्रकार सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवत होते.

‘‘ आम्ही आयकर वाले आहो!,’’ ते म्हणाले. घरातील ड्रावरे, कपाटे, तख्तपोशी, पलंगावरील गादीखालील पोकळ जागा, बाथरुमे, आदी ठिकाणी उपसून खुपसून ते काहीतरी धुंडत होते. तेवढ्यात आणखी काही डझन गाड्या घराबाहेर थांबल्या. त्यातून आणखी काही सरकारी पाहुणे बाहेर पडले. आमची छाती अभिमानाने फुगली. ‘‘आम्ही ईडीवाले!’’ पाहुण्यांच्या एका गटाने सांगितले.

‘‘आम्ही सीबीआयवाले!’’ पाहुण्यांच्या दुसऱ्या गटाने सांगितले. ‘‘ आम्ही एनआयएवाले!’’ पाहुण्यांच्या तिसऱ्या गटाने सांगितले. पाठोपाठ एनसीबी, एबीसी, सीबीडी, डीसीबी, एनएलपी, अशा अनेक ‘वाल्यां’नी घर गजबजून गेले. मोठा ट्रक भरुन कागदपत्रे या पाहुण्यांनी जमा केली, आणि आम्हाला काही प्रश्न विचारले. त्यावर आम्ही तीनदा नाक, दोनदा कान आणि पाचदा डोके खाजवून जमेल तशी उत्तरे दिली...आमच्या पैशाची मोजदाद आकड्यात कशी सांगता येईल?

त्याच वेळी टीव्हीवर कुणी सोमय्या नावाचे टीव्ही पत्रकार आमच्या बेकायदा व बेनामी व बेहिशेबी शेतघराची मोजमापे प्रत्यक्ष भेटीत ‘लाइव्ह’ सांगत होते. आमची अशी देशभरात व स्वित्झर्लंडमध्ये ४० शेतघरे असल्याची माहितीही त्यांनी सांगून टाकली. वास्तविक आमची एकशेछप्पन्न शेतघरे आहेत. शिवाय लंडनमध्ये ४० एकरचे आवार असलेला व्हिलादेखील आहे. त्यामुळे चाळीस हा आकडा अपमानास्पद वाटल्याने आम्ही तेथल्या तेथे सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करुन टाकला. ‘पाहुण्यांना हवे-नको ते द्या’ अशा सूचना घरच्या नोकरमंडळींना करुन आम्ही पुन्हा गाडीत बसलो. चालकाने विचारले ‘आता कुठे साहेब?’ त्याला ‘अमूक अमूक उड्डाणपुलाखाली गाडी घे’ अशी सूचना तुटकपणे आम्ही केली.

…डोळे उघडले तेव्हा आम्ही उड्डाणपुलाखालीच लेटलेल्या अवस्थेत होतो. उशाला दोन कळकट, फाटके जोड, वाकडा चमचा, पोचे आलेली बशी, आणि टमरेल अशी मालमत्ता होती. शेजारच्या फुटपाथ्याने दाढी खाजवत विचारले, ‘‘काय बे, झोपेत हसत होतास, सपान पडलं काय?’’…गर्भश्रीमंतीची सुखस्वप्ने काय असतात, ते दरिद्र्याला काय माहीत? आम्ही फक्त मनातल्या मनात मुस्करलो, आणि कूस वळवून पुन्हा एकवार गुलाबी सुखचित्रामध्ये रमलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com