
प्रसाद रेशमे
महाराष्ट्र सौरऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य असून, राज्यात सध्या व्यापक स्वरूपात सौरक्रांती घडत आहे. घरगुती ग्राहकांना दैनंदिन वापरासाठी, शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी, उद्योजकांना कारखान्यांसाठी आणि वाहनचालकांना गाडी चार्ज करण्यासाठी असा सर्व प्रकारे सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी दिवसा आणि रात्री असा दोन पाळ्यात वीजपुरवठा होतो. शेतकऱ्यांची मागणी आहे की, केवळ दिवसा आणि भरवशाचा वीजपुरवठा करावा. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. या योजनेचा आता दुसरा टप्पा अमलात येत आहे. या योजनेत एकूण सोळा हजार मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प आहेत.