
विरोधी पक्षातील सर्व समदु:खी मित्र आणि सहकारी यांसी- सर्वप्रथम सर्वांना शिमग्याच्या बिलेटेड शुभेच्छा.
ढिंग टांग : विपक्षी पत्र क्र. २!
विरोधी पक्षातील सर्व समदु:खी मित्र आणि सहकारी यांसी- सर्वप्रथम सर्वांना शिमग्याच्या बिलेटेड शुभेच्छा. काही कारणाने आपण सारे एकजुटीने उभे राहू लागलो आहोत, असे एक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
विरोधकांची एकजूट हा आपल्या देशातील एक मजेचा विषय असून ज्याप्रमाणे भारतीय लोकांना क्रिकेटचे सामने आणि हिंदी सिनेमे आवडतात, त्याचप्रमाणे ‘विरोधकांची एकजूट’ या विषयावरही खूप बोलायला आवडते.
तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यामुळे धावाधाव करणारे (काही) विरोधी नेते दमून भागून शेवटी कमळ पक्षाच्या तंबूतच आराम फर्मावण्यासाठी जाऊन बसतात, असे दिसून आले आहे. (तेथे गेल्यावर कोकम सरबत, लिंबूसरबत असेही मिळते, असे ऐकून आहे. खरे खोटे विचारले पाहिजे!)
काही नेते अजूनही टीव्ही कॅमेऱ्यांसमोर डरकाळ्या मारतात, त्यांनी सावध राहाणे आवश्यक आहे. असो. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले नेते कमळ पक्षात चंबुगबाळे घेऊन सामील झाले की लागलीच धुतल्या तांदळासारखे स्वच्छ चारित्र्याचे कसे होतात?
असा सवाल विचारणारे एक सामूहिक सह्यांचे पत्र आपण काही नेत्यांनी मा. प्रधानसेवकांना गेल्या आठवड्यात धाडले होते. (तुम्हाला आठवत असेल, कारण तुम्हीदेखील त्यावर सही केली होती!) या पत्राला आजमितीस उत्तर नाही. ते केराच्या टोपलीत टाकले गेले असेल तर ठीक आहे, परंतु, त्यावरील स्वाक्षरीकर्त्यांची (पक्षी : आपली!) यादी तपास यंत्रणांकडे गेली असेल तर मात्र चिंतेची बाब आहे.
मागल्या खेपेला एक नेता पोलिस ठाण्यात तक्रार गुदरण्यास गेला असता, त्याच्याविरोधातच एफआयआर नोंदवून घेऊन बाहेर आला! कमळ पक्षात विरोधी नेते गेले की त्यांच्यामागील चौकशीचा ससेमिरा अचानक गायब होतो, इतकेच नव्हे तर सदरील नेता ‘व्हीआयपी’ असल्याचा साक्षात्कार यंत्रणांना होतो.

अशाच एका नेत्याच्या मागे तपास अधिकारी लागले असताना अचानक राइट टर्न घेऊन नेत्याने कमळ पक्षाचे कार्यालय गाठले. तो बाहेर आला, तेव्हा त्याच तपास अधिकाऱ्याने त्याला साल्युट केला, असे ऐकिवात आहे! पुन्हा असो.
आपल्या स्वाक्षऱ्या असलेल्या पत्राचा दुरुपयोग होईल अशी भीती आता वाटू लागली आहे. आपल्या पत्राला लागलीच उत्तर आले नाही. उत्तर दिले ते कमळ पक्षाच्या नेत्यांनी! प्रधान सेवकांनी नव्हे!! त्यामुळेच पोटात गोळा आला असून काय करायचे, हे समजेनासे झाले आहे.
असल्याच सह्या आणि पत्ते गोळा करुन या लोकांनी भरपूर ‘डेटा’ गोळा केल्याची खबर आहे. हल्लीच्या युगात डेटा इज गोल्ड! आणि तेच आपण तपास यंत्रणांच्या हातात स्वत:हून देतो, असे माझे मत बनले आहे. यापुढे अशी पत्रे देऊ नयेत असे सुचवण्यासाठी मी हे निवेदन देत आहे.
मा. प्रधानसेवकांना पाठवण्यात आलेल्या पत्राखाली माझीदेखील सही होती. पण मी तसा सावध मनुष्य आहे. खोटीच सही गिरबटवून दिली असून विचारणा झाल्यास ‘तो मी नव्हेच’ असे सांगण्यास मोकळा आहे. उगीच आगीशी खेळ नको. हल्ली वय झाले असून दगदग झेपत नाही. राजकारण करावे, पण वेळवखत पाहून पवित्रा बदलावा, असे माझे मत बनले आहे.
कमळ पक्षाच्या मुख्यालयात राजकीय नेत्यांचे चारित्र्य धुण्याचे वॉशिंग मशीन असल्याची चर्चा मध्यंतरी होती. मी स्वत: बघून आलो! असे तेथे काहीही नाही, याची खात्री बाळगावी. तिथे थेट सदराच बदलून मिळतो! तो सुखी माणसाचा असतो, असे म्हणतात. पत्रोत्तर आले नाही तर मीदेखील सदरा बदलून घेण्याच्या विचारात आहे. आपण आपले बघावे! कळावे. एक बिनस्वाक्षरीचा विपक्षी नेता.