खोट्यांच्या दुनियेतील 'खरा'माणूस

महेश टिळेकर
Tuesday, 1 October 2019

२००३ सालच्या माझ्या पहिल्या  आधार चित्रपटापासून ते वन रूम किचन या चित्रपटात,प्रत्येक सिनेमात हक्काचा कलाकार म्हणून विजू खोटे यांना हमखास मी भूमिका द्यायचो.माझ्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाचे आणि यशाचे ते साक्षीदार होते. 

एकदा का तुम्हाला नाव,पैसा,काम,मिळायला सुरवात झाली की अवतीभवती लोकांचा गोतावळा जमू लागतो,तुम्हाला मदतीसाठी उत्साहाने अनेकजण पुढे येतात(बऱ्याचदा स्वतःचा स्वार्थ बाळगून)पण तुम्ही कुणी नसताना निस्वार्थपणे तुम्हाला मदत करणारी माणसं 'खरी'माणसं म्हणून कायम तुमच्या हृदयात राहतात.२००३ सालच्या माझ्या पहिल्या  आधार चित्रपटापासून ते वन रूम किचन या चित्रपटात,प्रत्येक सिनेमात हक्काचा कलाकार म्हणून विजू खोटे यांना हमखास मी भूमिका द्यायचो.माझ्या प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाचे आणि यशाचे ते साक्षीदार होते. 

सुरवातीच्या संघर्षाच्या काळात मी टीव्ही मालिकांची निर्मिती दिग्दर्शन करायचो तेंव्हा अभिनेता विजू खोटे यांच्याशी परिचय झाला, 1997 साली मी दूरदर्शन साठी दिवाळी निमित्ताने एक विशेष कार्यक्रम केला त्याच्या शूटिंगसाठी ते पुण्यात आले, त्यावेळी ते हिंदी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप बिझी असायचे त्यातून वेळ काढून ते ट्रेनने पुण्यात आले,मी त्यांना त्यांच्या कामाचे दिलेले पैसे त्यांना हिंदीत मिळणाऱ्या पैश्यापेक्षा आणि मराठीत दिल्या जाणाऱ्या पैश्यापेक्षाही खूपच कमी होते,पण माझी सुरवात असल्यामुळे आणि मी नवीनच निर्माता दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी कोणतीच तक्रार न करता मी दिलेले पैसे स्वीकारले आणि सांगितले"तुला कधीही माझी गरज लागली तर नक्की सांग,तुझ्या बरोबर काम करायला मलाही आवडेल"त्यांच्या पुढे मी अगदीच नवीन होतो पण तरीही त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी बोललेल्या या वाक्यांनी धीर आला आणि ते माझ्यासाठी विजू खोटे ऐवजी  विजूदा झाले .पुढे मी  सातत्याने माझ्या टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी  त्यांना पुण्यात बोलवू लागलो,तेही आनंदाने यायचे,खाण्याचं त्यांना भारी वेड,त्यांची खाण्याची हौस मात्र मी आनंदाने पूर्ण करीत असे, पुण्यात कुठल्या ठिकाणी कोणता पदार्थ चांगला मिळतो ते पुण्यात राहून जितकं मला माहित नाही तितकं विजू खोटे यांना माहीत होतं. मुंबईत पण शुटींगाठी जाताना स्वतःच्या पैशातून सहकलाकारांच्या साठी सतत नवनवीन खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या विजू खोटे यांच्या सारखा खवय्या कलाकार मी तरी पाहिला नाही.त्यांच्या खाण्यावरच्या  या अती प्रेमामुळे  कधी मी त्यांना काळजीपोटी ओरडायचो त्यावर ते मस्करी करीत उत्तर द्यायचे ” या खाण्यावर शतदा प्रेम करावे ".ते ज्या ठिकाणी मुंबईत राहतात तिथं एक फरसाण विक्रेता आहे त्याचा धंदा फारसा चालत नव्हता तेंव्हा विजू दादांनी त्याला फरसानात इतर कोणते पदार्थ टाकल्यामुळे त्याची चव वाढेल ते सांगितले आणि त्यांनी सांगितले तसे केल्यामुळे त्या दुकानदाराच्या फरसाणची विक्री प्रचंड वाढली.विजू खोटे यांच्या सांगण्यामुळे फायदा झाल्यामुळे आजही तो दुकानदार विजू खोटे यांच्या नावाने ते फरसाण विकतो. एखाद्या खाद्य पदार्थाचा ब्रँड होणारे विजू दादा हे पहिले मराठी कलाकार असतील. माणसांच्या गोतावळ्यात  रहायला ,गप्पा मस्करी करायला त्यांना आवडायचं. 

१९ वर्षांपूर्वी माझ्या ’अफलातून ’या  पहिल्या मालिकेच्या शूटिंगसाठी  ते पुण्यात आले होते, त्यावेळी माझ्याकडे स्वतःची गाडी न्हवती, त्यामुळे नाईलाजाने हॉटेलपासून शुटिंगपर्यंत रिक्षानेच कलाकारांना घेऊन जाण्याची व्यवस्था करावी लागायची.सिटी पासून थोडं लांब असलेल्या ठिकाणी शुटिंग होतं त्यामुळे सकाळच्या वेळी सिटीमधून तिथे जायला रिक्शा सहज मिळाली रात्री शुटिंग संपल्यावर मात्र परत जायला रिक्षा शोधू लागलो पण रिक्षा मिळेना,थोडं अंतर चालून पुढे गेल्यावर नक्की रिक्षा मिळेल या आशेने मी,विजूदा चालत राहिलो त्यात पाऊस धो धो सुरू झाला आम्ही पूर्ण भिजून गेलो,थांबायला कुठे जागा नाही त्यामुळे चालत राहण्याशिवाय पर्याय न्हवता, त्यात दोन्ही हातात बॅगा, कसेबसे आम्ही चालत होतो,दोन एक किलोमीटरवर पुढे सुदैवाने रिक्षा मिळाली,मी मनातून घाबरलो होतो की आता हॉटेलवर गेल्यावर विजूदा चिडतील,हिंदीत काम केलेला कलाकार त्याला हा त्रास सहन नाही होणार,.हॉटेलवर पोचल्यावर मी त्यांची माफी मागितली,त्यावर ते  गंमतीने म्हणाले "तू स्वतःची गाडी घेशील तेंव्हा त्या गाडीत बसून भरपाई करून घेईन"..

पुढे कामं वाढली पुण्याहून मुंबईला जाणं वाढलं, लोकांच्या भेटी वाढू लागल्या.पुण्याहून बसनी मुंबईला जाऊन कामं उरकून पुन्हा पुण्यात परत यावं लागायचं, मुंबईतील बसच्या प्रवासात वेळ  खूप जायचा आणि ट्रेन च्या प्रवासात जीव गुदमरायचा.पण माझी ही अवस्था पाहून अनेक वेळा विजूदा त्यांची गाडी आणि ड्रायव्हर माझ्यायासाठी द्यायचे,कधी पेट्रोलचे पैसे घेतले नाहीत की कधी उपकाराची जाणीव करून दिली नाही,माझ्या आयुष्यातील संघर्षाच्या आणि यशाच्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत,मुंबई मध्ये माझं स्वतःच घर झालं त्यानंतर मी जेव्हा स्वतःची पहिली गाडी घेतली तेंव्हा त्यात विजू दादांना  बसवून मुंबईत फिरवले,त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले,त्यानंतर अनेकदा माझ्या  गाडीत बसून आम्ही एकत्र प्रवास केला,तेंव्हा ते गंमतीने विचारायचे"आठवतंय का तुला तुझ्याकडे गाडी नव्हती तेंव्हा आपण पावसात चालत गेलो ते?". माझ्यातर सगळं लक्ष्यात आहे'ते' दिवस 'ती' वेळ आणि आणि माझ्या वेळेला निस्वार्थपणे मदतीला पाठीशी उभे असणारे 'विजूदा'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh tilekar article