मर्म : घसरणीचा अपेक्षित धक्का 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

शेअर बाजारावर कोणत्या गोष्टीचा किती आणि कसा परिणाम होईल, याचा अंदाज बांधणे कठीण. हा बाजार फक्त कंपन्यांच्या मूलभूत स्थितीवर न चालता अनेकदा बाह्य घटना आणि भावनिक आधारावर प्रतिक्रिया देताना दिसतो

शेअर बाजारावर कोणत्या गोष्टीचा किती आणि कसा परिणाम होईल, याचा अंदाज बांधणे कठीण. हा बाजार फक्त कंपन्यांच्या मूलभूत स्थितीवर न चालता अनेकदा बाह्य घटना आणि भावनिक आधारावर प्रतिक्रिया देताना दिसतो.

मध्यंतरीची लोकसभा निवडणूक असो वा नुकताच सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प असो, या बाजारात त्याचे अपेक्षित पडसाद उमटतातच. सोमवारीही तेच घडले. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सादर झालेल्या अर्थसंकल्पाने शेअर बाजाराची साफ निराशा केली आणि त्याचे अपेक्षित परिणाम बाजारात दिसले.

सेन्सेक्‍स तब्बल 792 अंशांनी कोसळला. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण होती. अर्थात, अर्थसंकल्प हे यासाठी एक निमित्त ठरले. कारण अर्थसंकल्पाबरोबरच अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी, आशियाई बाजारांतील घसरण, रुपया आणि कच्च्या तेलातील चढ-उतार, जून तिमाहीतील कंपन्यांच्या कामगिरीवर अपेक्षित असलेला विपरीत परिणाम अशा अन्य घटकांनीही या घसरणीला जोर दिला. सलग दोन सत्रांमधील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल पाच लाख कोटींनी घटले. परंतु चढ-उतार हा शेअर बाजाराचा स्थायी भाव आहे आणि इतिहासात असे प्रथमच घडले आहे, असेही नाही. बऱ्याचदा तत्कालिक घटनांचा या बाजारावर परिणाम होतो आणि तो अल्पकाळ टिकतो, असे अनेकदा दिसून येते. सोमवारच्या घसरणीकडेही या चष्म्यातून बघता येईल. मंगळवारी बाजार पुन्हा सावरला, हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. 

बाजारातील घसरणीच्या निमित्ताने यंदाच्या अर्थसंकल्पातील दोन प्रमुख तरतुदींची चर्चा प्रामुख्याने होताना दिसते. एक म्हणजे, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवर (एफपीआय) प्राप्तिकर अधिभार लावल्याने या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसणार, हे कळताच विक्रीचा सपाटा सुरू झाला. त्याचबरोबर नोंदणीकृत कंपन्यांमधील जनतेच्या किमान समभागधारणांची मर्यादा 25वरून 35 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याच्या तरतुदीचे पडसादही बाजारात उमटले. परंतु इतिहासात डोकावले, तर अशा प्रस्तावांची अंमलबजावणी एक- दोन वर्षांच्या कालावधीत केली जाते, असे दिसून येते. त्यामुळे या दोन्ही बाबींची तत्कालिक तीव्र प्रतिक्रिया उमटली असली, तरी ती फार काळ बाजाराला सतावेल, असे नाही. असे धक्केवजा निर्णय पचवत बाजार पुढे सरकतो, असेही इतिहास सांगतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी खूप घाबरून जावे, अशी स्थिती नाही, असे तज्ज्ञ सांगतात. शेवटी संयमाची शेअर बाजारात कसोटी लागते आणि कदाचित तसाच कसोटीचा काळ सध्या सुरू आहे, असे म्हणता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Main article in sakal on share market