...माणसाला मरण नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sampdakiy
...माणसाला मरण नाही!

...माणसाला मरण नाही!

एका साधारण ताऱ्याच्या छोट्याशा ग्रहावरली वानरांची एक पुढारलेली जमात म्हणजे आपण! परंतु, विश्व जाणून घेण्याची क्षमता आपल्यात आहे, तेच आपलं वैशिष्ट्य…

- स्टिफन हॉकिंग,( stiffen hocking) विख्यात खगोलतज्ज्ञ व लेखक

काही खगोलतज्ज्ञांच्या(Astronomy) सिद्धांतानुसार आपले ब्रह्मांड(The universe) सतत ‘विस्तारते’ आहे. सुमारे साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या महास्फोटात विश्वाची निर्मिती झाल्या क्षणापासून हा गतिमान विस्तार सुरूच आहे. काही खगोलवैज्ञानिक कागदावर गणिते मांडून आपले विश्व शर्मिष्ठा नक्षत्राकडे वेगाने जात असल्याचे सांगतात. मथितार्थ एवढाच की, विश्वाचा हा अफाट पसारा उगाचच अनंतात ताटकळलेला नाही. गती हा त्याचा स्थायीभाव आहे. या पसाऱ्यातला प्रत्येक घटक, तीच गतिमानता अंगात भिनवून घेत अज्ञाताच्या दिशेने झेपावतो आहे. थांबला तो संपला, हाच तो विश्वाचा नियम. संपूर्ण विश्वालाच असे थांबणे मंजूर नसेल तर तुमच्या-आमच्यासारख्या य:कश्चित मानवप्राण्याचा काय पाड? अनंतातल्या अगणित नक्षत्रलोकांपैकी एक आपला, सूर्य नावाचा एक मध्यम आकाराचा किंवा प्रतीचा तारा. त्याचे आठ-नऊ ग्रहगोलांचे नगण्य लटांबर. त्या लटांबरातल्या एका वसुंधरानामे ग्रहावरले आपण सारे जीवजंतू.

हेही वाचा: वाटचाल... एका समाजाभिमुख दैनिकाची

पण हा सारा लवाजमा चालला आहे तरी कोठे? आणि कशाला? या प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही अज्ञातच आहेत. काही का असेना, सारे काही एका विशिष्ट गतिमानतेवर टिकून राहणार आहे, आणि त्या गतीविना सारे काही हरपणार आहे, एवढे नक्की. त्या गतीचे नियम पाळणे हाच खरा विश्वधर्म होय. ‘नव्या वर्षाचा नवा सूर्य’ वगैरे विशेषणे, उपमा-उत्प्रेक्षा या काव्यगोष्टीतली वर्णने म्हणून ठीक आहेत, परंतु, खगोलाला काव्याची गोडी नसते, तिथे लागू असतात ख-भौतिकाचे नियम. ज्या कॅलेंडरबरहुकूम आपण सारे पृथ्वीवासी जगणे ओढत नेतो, त्यातले वर्ष, महिने, आठवडे, दिवस हे कालखंड माणसाने आपल्या सोयीने पाडलेले तुकडे असतात. विश्वाच्या पसाऱ्यात त्या तुकड्यांना काहीच मोल नाही. कॅलेंडर सोडा, रोज उगवणारा सूर्यसुद्धा काही नवाबिवा नसतो. माणसाच्या दुनियेत मात्र भौतिकाचे हे नियम सरसकट लागू होत नाहीत. या नियमांना श्रद्धा, काव्यकल्पनांची जोड देत देत त्यांचा स्वीकार करायचा, हा मानवी स्वभाव आहे. किंबहुना, चराचराला आपल्या जीवनमानात बसवण्याच्या दीर्घ प्रक्रियेलाच संस्कृतीचे वहन म्हटले पाहिजे. म्हणूनच नवे वर्ष उजाडताच सामान्य माणूस नव्या उत्साहाने आपल्या, त्याच सहस्त्ररश्मी सूर्याकडे नव्या उमेदीने, नव्या नजरेने पाहातो. नतमस्तकही होतो. विश्वाचे आर्त मनात सामावून घेण्याची ही माणसाची धडपड स्पृहणीय म्हणावी लागेल.

हेही वाचा: पुन्हा एकदा परराज्यातील फास्टर नौकांचा समुद्रात धुडगूस

माणूस नावाचा प्राणी चतुष्पादाचा द्विपाद झाला, तेव्हाही हाच सूर्य उगवत होता. त्याच सूर्याकडे पाहात त्याने अग्निला वश केले असणार आणि त्याच आभाळातील चांदव्याकडे पाहात चाकाचा शोध लावला असणार. नक्षत्रलोकात त्याने आपली श्रद्धास्थाने शोधली; परंतु उत्क्रांतीच्या कुठल्याही टप्प्यावर माणूस कधीही थांबला नाही. किंबहुना तो थांबला नाही, हेच त्याचे यश आहे. जीवनाची गतिमानता टिकवणे यातच सार्थक आहे, याची खात्री मानवाला पटली, तिथेच त्याच्या उत्क्रांतीचे रहस्य सामावले आहे.

याच गतिमानतेच्या नियमानुसार, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी भिंतीवरले जुने कॅलेंडर खिळ्यावरुन उतरेल. गतसालात हरवलेले क्षण आणि गमावलेले आप्त यांच्यासकट त्याची गुंडाळी होईल. ‘जुने जाऊ द्या मरणांलागुनी’ असे स्वत:च्या मनाला बजावत, त्याच त्या खिळ्यावर नवेकोरे कॅलेंडर टांगायचे, हीच तर जगाची रीत आहे. पलिकडल्या साली, वर्षअखेरीला अवघे जग कोरोनाच्या घातक विषाणूने जेरीला आले होते. विषाणूचे पारिपत्य करु शकणाऱ्या प्रतिबंधक लसी अद्यापही प्रयोगशाळातच होत्या. गेल्या वर्षी लसींचे अमोघ अस्त्र माणसाच्या हातात आले. त्याच कैफात दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या लाटेशी मुकाबलाही केला गेला.

हेही वाचा: कालीचरणला 13 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

येत्या २०२२ सालात तरी मास्क-मुखवटे त्यागून निर्वेध हिंडता येईल, असे वाटू लागले होते. सरत्या वर्षाला निरोप झोकात देण्याचे बेतही अनेकांनी रचले असतील. पण दंतकथांमधल्या इच्छाधारी सर्पाप्रमाणे अवतार बदलून या विषाणूने पुन्हा एकवार आपला फणा काढला. पुन्हा एकवार कवाडे बंद करुन बसण्याची वेळ माणसावर आली. गेली दोन वर्षे हे उघडझापीचे अनुभव आपण सारे घेत आहोत. दरवेळी थोडी उसंत मिळाली की सारे काही उघडावे, भीत भीत का होईना, सारे व्यवहार सुरळीत व्हावेत,आणि पुन्हा एकदा विषाणूने हल्ला करावा, असा खेळ चालू आहे. आज अवतरलेल्या नव्या वर्षाने पहिल्याच तारखेला तसले संकेत दिले आहेत. काळजी वाढवणारी परिस्थिती असली तरी हबकून जाण्याचे कारण नाही. कारण यावेळी माणसाचे हात रिकामे नाहीत. औषधयोजना, प्रतिबंधक लसी आणि प्राणवायूचा साठा अशी आयुधे आता आपल्यापाशी जमा आहेत. योग्य ती काळजी घेतली तर जीवनाची गती रोखण्याचे काही कारण उरणार नाही. अर्थात यातला ‘योग्य ती काळजी घेतली तर…’ हा वाक्याचा पूर्वार्ध महत्त्वाचा!आपल्याला गतीची गरज आहे, सद्गतीची नव्हे, एवढे भान ठेवले तरी पुरेसे आहे. गती हीच खरी शक्ती, आणि विजिगीषु वृत्तीच्या मानवजातीचेही तेच शक्तिस्थान. गतीचा नियम पाळला तर विषाणूपासून विध्वंसापर्यंत कितीही संकटे आली तरी बेहेत्तर - माणसाला मरण नाही! नवे वर्ष हाच सांगावा घेऊन उगवले आहे.

Web Title: Man Does Not Die Stiffen Hocking

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
go to top