
पुन्हा एकदा परराज्यातील फास्टर नौकांचा समुद्रात धुडगूस
हर्णे - फास्टर नौकांचा (Faster Boat) समुद्रामध्ये (Sea) पुन्हा एकदा जोरदार धुडगूस चालु झाल्याने हर्णे बंदरातील पारंपरिक मच्छीमार (Fisher) चिघळला आहे. अनेक नौकांचे नुकसान होत असून शासनाचे (Government) याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. असा आरोप येथील मच्छीमारांकडून होत असताना या नौकांचा हा धुडगूस नाही थांबला तर तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही स्वतःला अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊ; अशी संतप्त प्रतिक्रिया मच्छीमारांमधून उमटत आहेत.
तालुक्यातील पाजपंढरी, हर्णै, दाभोळ, बुरोंडी, आडे, उंटबर, अडखळ, केळशी, कोळथरे, पंचनदी, ओणनवसे आदी गावांतून मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो या नौका हर्णै बंदरात मासेमारी करतात. या व्यवसायातील सुमारे १००० नौकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दहा हजारांवर रोजगार निर्मिती केली आहे. निर्यात योग्य कोळंबीसह इतरही मोठी मासळीची याच पट्ट्यात जास्त उपलब्धता असल्याने देशाला परकीय चलन मिळवून देण्यातही येथील मस्यव्यवसायाचा मोठा वाटा आहे. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून समुद्रात आधुनिक साहीत्याआधारे परप्रांतीय फास्टर नौका लहान मोठी सर्वच मासळी फार कमी अवधितच मारून नेत असल्याने येथील तुलनेने कमी प्रगत नौकांना मात्र हात हलवत परत यावे लागत आहे. त्यामुळे मासेमारीकरिता येणारा सर्वच खर्च नौकामालकांच्या अंगावर पडत आहे. हा खर्च कीती दिवस पेलायचा की मासेमारीच बंद ठेवायची का? असा गंभीर प्रश्न येथील मच्छिमारांपुढे उभा राहीला आहे. गेले दोन ते तीन महिने या फास्टर नौकांकडून अश्याच प्रकारची मासळीची लूटमार सुरू असून या बंदरात मासळीची आवकच कमी झाली आहे. कित्येक वेळा मासळीच मिळत नसल्याने खलाशांचा पगार कसा काढायचा? ही मोठी चिंता लागून राहीली आहे.
हेही वाचा: सिंधुदुर्ग झालं आता राज्याकडे लक्ष - नारायण राणे
कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, व उत्तन आदी ठिकाणच्या या आत्याधुनिक फास्टर नौका सरळसरळ १२ नॉटिकल मैलावर येऊन मासेमारी करत असतात. या नौका फक्त जयगड पासून ते श्रीवर्धन पर्यंतच्या बंदरात मासेमारी करत असतात. कारण इतर ठिकाणच्या पर्ससीननेटच्या मोठ्या नौका यांना हुसकावून लावतात. परंतु या परिसरात तेवढ्या क्षमतेच्या नौका नसल्याने याठिकाणी हे परराज्यातील मच्छीमार घुसखोरी करत आहेत. याना या परिसरात कोणीही अटकाव करू शकत नाही. कारण त्या नौकांवरील खलाशी समोर अडवायला येणाऱ्या कोणत्याही नौकेवर हल्ला करण्यासाठी पूर्ण सशस्त्र तयारीने मासेमारी करिता आलेले असतात; असे येथील मच्छीमारांनी सांगितले.
डिसेंबर २०२१ या महिन्यात ज्यावेळेस फिशरीज खात्याच्या दापोली तालुक्याच्या अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी या येथील मच्छीमारां समवेत आपली खात्याची गस्तीनौका घेऊन पाहणी करायला गेल्या असता त्यांनाही त्यावेळेस किमान ५० ते ६० नौका आढळून आल्या. त्यावेळी देखील एका नौकेचे अवैध मासेमारी करत असल्या कारणाने फक्त कागदपत्र काढून घेतले. कारवाई मात्र काहीच झाली नाही. म्हणजे कारवाईसाठी जिल्ह्यातील संबंधित शासकीय यंत्रणा कमी पडते आहे अशी खंत येथील मच्छीमारांनी व्यक्त केली. गेल्या आठवडाभरात हर्णे बंदरातील नौकांच्या मासेमारीच्या जाळ्यांचं लाखो रुपयांचे नुकसान या फास्टर नौकांनी केले आहे . तसेच पाजपंढरी येथील मच्छीमार हेमंत चोगले यांच्या नौकेला जोरदार धडक देऊन लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे येथील मच्छीमार बांधव प्रचंड संतप्त झाला आहे.
हेही वाचा: Sindhudurg : 3 पक्ष एकत्र असताना पराभूत झाले, याला अक्कल म्हणतात
'सरकारकडून कठोरपणे कडक करण्याबाबतचा कायदाही पारित होत नाही. जाणून बुजून सरकार या आमच्या समस्येकडे दुर्लक्ष करून आमच्यावर अन्यायच करत आहे. लवकरात लवकर या फास्टर नौकांच्या अवैध मासेमारीवर काहीही कारवाई नाही झाली तर आम्ही मच्छीमार दापोली तहसील कार्यालया समोर स्वतः अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊ. आमच्या जीवन मरणाचा हा प्रश्न उभा राहिला आहे. आमच्याकडे आता काहीही पर्याय राहिलेला नाही'; अशी संतप्त प्रतिक्रिया दापोली पंचायत समितीचे माजी सभापती रऊफ हजवाने यांनी व्यक्त केली.
'आम्हा पारंपरिक मच्छीमारांना सरकारला जगवायचे असेल तर या अवैध मासेमारीवर योग्य ठोस कारवाई करावीच लागेल. कारण हे मच्छीमार फक्त मासळीच लुटून नेत नसून आमच्या नौकांचे देखील नुकसान करत आहेत. आम्हा मच्छीमारांच्या मासेमारी करताना लावलेल्या जाळी तोडून जातात. चार दिवसांपूर्वी पाजपंढरी येथील हेमंत चोगले यांच्या नौकेला जोरदार धडक देऊन पशार झाले. अश्या विचित्र घटना या फास्टर नौकांकडून होत आहेत. यांच्यावर या भागामध्ये शासनाने त्वरित याठिकाणी मासेमारीकरिता बंदी आणण गरजेचे आहे. अन्यथा आम्ही रस्ता रोको आंदोलन करू आणि यामध्ये होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल; असा इशारा हर्णे बंदर कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर यांनी दिला आहे.
Web Title: Fastest Boats Other State Disturbance Sea
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..