भाष्य : गांधीविचारांतील लसावि!

Mahatma-Gandhi
Mahatma-Gandhi

तुमची विचारधारा, धर्म, जात, पंथ, प्रांत काहीही असले तरी देश चालवताना एका मध्यममार्गावर येऊन थांबावे लागते.या मुक्कामाचे नाव असते गांधी. देशातल्या ताणतणावांचा लसावि राष्ट्रपित्याच्या फॉर्म्युल्यानेच निघतो. गांधीजींच्या पुण्यातिथीनिमित्त...

झांबियाचे स्वातंत्र्यसैनिक आणि माजी राष्ट्राध्यक्ष डॉक्टर केनेथ कोंडा यांच्याबरोबर काही वर्षांपूर्वी ते भारतात आले असतांना दोन-तीन दिवस प्रवास करायची संधी मिळाली. आम्ही दांडी येथे गेलो असतांना ते गांधी पुतळ्यासमोर उभे राहिले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागले. कितीतरी वेळ त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते, ते काहीतरी पुटपुटत होते. बहुतेक त्यांच्या भाषेतली प्रार्थना असावी. आवेग शांत झाल्यावर मी विचारले `तुम्ही काय बोलत होतात?’ `मला नेल्सन मंडेलांनी या तुझ्या गांधींच्या नादाला लावले, कुठे तुझा देश, कुठे माझा देश? या तुझ्या महात्म्याचे बोट मंडेलांनी धरायला लावले आणि तुझ्या महात्म्याच्या बोटाला धरून आम्ही आमचा झांबिया स्वतंत्र केला. हा महात्मा फक्त तुमचा बाप नाही आमचा पण आहे लक्षात ठेव! इतकी वर्षे हात धरला आहेस आता आयुष्याच्या शेवटच्या काळात अजून घट्ट धर माझा हात हे सांगत होतो, तुझ्या देशात राहणाऱ्या माझ्या बापाला!

माझे आजोबा बाळासाहेब भारदे ख्यातकीर्त गांधीवादी.तेंव्हा मी नाशिकला राहायचो आणि आजोबा पुण्याला. डिसेंबर-जानेवारीत कुठल्याश्या कार्यक्रमाला जातांना सकाळीच आजोबा नाशिकला घरी आले. नाशिकची थंडी आणि आजोबा उघड्या जीपने आले होते. त्यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकाने पाठवली होती. मी आजोबांना म्हणालो, ‘‘आहो, या कसल्या कार्यक्रमांची निमंत्रणे स्वीकारता तुम्ही? पंच्च्याहत्तर वर्षाच्या माणसाला थंडीत उघड्या जीपने बोलावू नाही इतकीही ज्याला संवेदनशीलता नाही त्यांच्या कार्यक्रमाला जाता कशाला तुम्ही?’’ आजोबांनी मध्ये थांबवले, ‘‘हे बघ कार्यक्रमाला मागे ज्याचा बॅनर आहे त्याच्यासाठी जायचे नसते. समोर बसलेल्यांसाठी जायचे असते. त्यांना काय माहिती? मला उघडी जीप पाठवली आहे की बंदिस्त कार? बॅनरवाल्या नेत्यावर रागावून मी लोकांना नको भेटू? असे कसे चालेल?’’ असे म्हणून एखाद्या रथात बसावे तसे ते उघड्या जीपमध्ये बसले आणि  बॅनरसमोरच्या त्यांच्या जनार्दनाला भेटायला निघून गेले. अशी काही अगदी मौल्यवान गांधीवादी तुरळक माणसे आजही गावोगाव, देशोदेशी आहेत. जे आपापल्या परीने गांधीवादाला पुढे नेत असतात. काय असतील कारणे? का अजूनही टिकून असतील ही माणसे आणि विचारधारा?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा चालताबोलता माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत, असे गांधींबद्दल ख्यातनाम शास्त्रज्ञ आइन्स्टाइन म्हणाल्याचा उल्लेख आहे. आमच्या कॉलेजमधले मित्र मात्र `मजबुरी का नाम गांधीजी’ म्हणायचे आणि खिदळायचे. गांधी नावाचा चुकीचा माणूस महात्मा म्हणून निवडला यावर आमचा कॉलेजच्या दिवसात विश्वास होता. त्यामुळे सगळेच मित्र हे गांधीविरोधक तर सोडाच गांधींचा यथेच्छ उपहास करणारेच. त्यांचा चष्मा, खाण्याच्या पद्धती, बकरी, चरखा या सगळ्याचा यथेच्छ उपहास करायचो; जणू काही गांधी ही एक सार्वजनिक चूक होती जी गत ५०/६० वर्षे देश करत आला होता आणि आमच्याच पिढीला फक्त त्याचे आकलन झाले होते. गांधी सोपे होते. त्यांच्यामुळे कोणाच्याच भावना दुखावल्या जायच्या नाहीत. त्यांना काहीही बोलले तरी कोणाला काही फरक पडायचा नाही.

आधार गांधींचाच!
मला तर गांधींच्या काळाचीच गंमत वाटायची. शस्त्र हाती घेऊन लढायचे सोडून सत्याग्रह कसला करीत बसले? चे गव्हेरा, फिडेल केस्ट्रोसारखे नाशिकच्या रस्त्यांवर टॅंक उतरले असते, गोळीबार झाला असता, आजूबाजूच्या जंगलांमध्ये सैन्याची जमवाजमव केली असती, कॉलेजच्या वर्गात बॉम्बबिंब फोडले असते, फडफडत्या डोळ्यांनी पाहणाऱ्या पोरींना `काडतुसाच्या स्पर्शाइतका दुसरा कुठलाच स्पर्श मला पवित्र वाटत नाही’ वगैरे डायलॉग मारून क्युबन सिगारचा धूर सोडला असता आणि मग ब्रिटिशांना आम्ही घालवले असते तर या गोष्टी सांगायला आम्हांला मजा आली असती. सत्याग्रह,अहिंसा, सविनय कायदेभंग या बोअरिंग आयुधांनी स्वातंत्र्य मिळाले याचा असलाच तर थोडा संकोचच होता मनामध्ये. आमचा एक गबरू पैजेवर सांगायचा की, ब्रिटिशांना दुसऱ्या महायुद्धानंतर भारतासारखा मोठा देश चालवणे कठीण झाले. इंग्रज देश सोडून गेले असते तर त्यांची नाचक्की झाली असती. म्हणून त्यांनी गांधींना सेट केले आणि सांगितले की, तुम्ही काहीतरी आंदोलन करा म्हणजे आम्हाला निघून जाणे सोपे होईल आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.

आपल्याच राष्ट्रपित्याचा इतका उपहास करणारा हा देश! त्यांची टवाळी करतो, ज्या मूल्यांवर गांधींचे व्यक्तित्व उभे होते त्याची चेष्टा करतो. त्यांना त्यांचा समूह नाही, जात नाही, मुसलमान त्यांना हिंदू सनातनी मानतात, हिंदू त्यांना मुस्लिमधार्जिणे मानतात. सवर्णांना ते दलितांचे नेते वाटतात, दलितांना ते उच्चवर्णीयांचे वाटतात. कारखाने ज्यांना काढायचेत त्यांना त्यांच्या खेड्याकडे चलाचा विटाळ होतो. खेड्यातल्या लोकांच्या मनात त्यांच्या बाजूला बसलेले बिर्ला, बजाज शंका निर्माण करतात. सगळीच्या सगळी मुलं ज्याच्याकडे संशयाने पाहतात असा हा या देशाचा बाप! कश्यामुळे पुरून उरला असेल आपल्या नाठाळ मुलांना? सत्तेवर कोणीही आला अगदी त्यांना शिव्या देत देत सत्तेवर आला तरी त्यांना गांधी नावाच्या म्हाताऱ्याची काठी हाती घेऊनच सरकार चालवावे लागते हे कशामुळे होत असेल?

असंख्य विरोधाभासाच्या पायावरचा हा देश. दक्षिणेचा उत्तरेशी संबंध नाही आणि पूर्वेचा पश्चिमेशी. प्रत्येकाच्या आपापल्या धारणा आणि श्रद्धास्थाने. धर्म, जात, पंथ यांच्या असंख्य उभ्या आडव्या रेघा आणि काही भिंतीसुद्धा. किमान समान कार्यक्रमावर फक्त राजकीय आघाड्या बनत किंवा बिघडत नाहीत तर हा अक्खा देशचं काही किमान समान गोष्टींनी तोल सांभाळून आहे आणि हा तोल सांभाळणारी विचारधारा राष्ट्रपित्याची आहे. कधी डाव्या बाजूने जोर लावून सत्तेपर्यंत जाता येते, कधी उजव्या बाजूने जोर लावूनही सत्तेच्या शिखरावर चढता येते. एकदा का शीर्षस्थ स्थानी पोचलो की लक्षात येते, इतक्या उंचावर देशाचा तोल सांभाळायला तुम्हाला गांधी नावाच्या म्हाताऱ्याच्या काठीचा आधार घ्यावाच लागेल. जात, धर्म, पंथ, वर्ण याचे असंख्य ताण या देशाच्या सत्तेवर जेंव्हा प्रभाव टाकतात तेंव्हा या सगळ्या ताणांना नेमके नियंत्रित करणारा लसावि गांधीविचारात आहे. तुम्ही डाव्या बाजूला लंबक ओढत नेवून सत्तेवर आलात तरीही किंवा उजव्या बाजूला लंबक ओढत नेवून सत्तेवर आलात तरीही, इतक्या मोठ्या देशाला तुम्हाला जर चालवायचे असेल तर सत्तेच्या नादात इकडे तिकडे ओढत नेलेला लंबक तुम्हाला पुन्हा एकदा मध्यम मार्गावर आणावा लागतो आणि त्या मध्यावर तुमची माझी मजबुरी हसत हसत उभी असते जिचे नाव मोहनदास करमचंद गांधी.    

केनेथ कोंडा, आइन्स्टाइन, माझे आजोबा, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रभातफेऱ्या आणि सत्याग्रहात सामील सत्याग्रही या सगळ्यांचा पहिला पर्याय होते गांधीजी, तर आताच्या पिढीची मजबुरी आहेत गांधीजी! बकरीचे दूध पिऊन, खेड्यात सूत कातत बसले तरीही आणि सिलिकॉन व्हॅलीत कोड लिहीत बसले तरीही देशातल्या ताणतणावांचा लसावि राष्ट्रपित्याच्या फॉर्मुल्यानेच निघतो. तुम्ही त्यांना राष्ट्रपिता मानता की मजबुरी याने काय फरक पडतो?
(लेखक  व्यावसायिक असून  विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com