राज आणि नीती : संस्कृतिसंघर्षाचा जागतिक पट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi and Pop
राज आणि नीती : संस्कृतिसंघर्षाचा जागतिक पट

राज आणि नीती : संस्कृतिसंघर्षाचा जागतिक पट

sakal_logo
By
मनीष तिवारी

अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर उद्‍भवलेल्या परिस्थितीत जागतिक संघर्षांना वेगळी दिशा मिळत आहे. या बदलांचा अन्वयार्थ सॅम्युअल हटिंग्टन यांच्या सिद्धांताच्या आधारे लावता येऊ शकेल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेवरील ९/११ चा भीषण दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर राबविलेल्या ‘ऑपरेशन एंड्युरिग फ्रीडम’ या मोहिमेमुळे तालिबानला अफगाणिस्तान सोडण्यास भाग पाडले. मात्र, आता तब्बल दोन दशकांनंतर तालिबानने अफगाणिस्तानात पुन्हा वर्चस्व निर्माण केल्याने अमेरिकी सल्लागार सॅम्युअल हटिंग्टन यांच्या ‘संस्कृतींचा संघर्ष आणि जागतिक व्यवस्थेची पुननिर्मिती’ या सिद्धांतावर पुन्हा एकदा आठवण होते. जगातील विविध संस्कृतींचा संघर्ष उलगडताना १९९३ मध्ये त्यांनी असे मत मांडले होते, की भविष्यात संस्कृतीच्या ओळखीचे महत्त्व वाढेल. जगातील सात-आठ महत्त्वाच्या संस्कृतीमधील परस्परक्रियेमुळे जगाला आकार मिळेल. यात, पाश्चिमात्य, कन्फ्युशियस, जपानी,हिंदू, इस्लामिक, रूढीवादी, लॅटिन अमेरिकी आणि आफ्रिकी संस्कृतींचा समावेश आहे. या संस्कृतींना एकमेकांपासून वेगळे करणाऱ्या सांस्कृतिक भेदांतून भविष्यातील सर्वांत मोठे संघर्ष उभे राहतील.

इस्लामिक आणि ॲग्लो सॅक्सन संस्कृतीला वेगळे करणाऱ्या दोषाबद्दल ते म्हणाले होते की, पाश्चिमात्य आणि इस्लामी संस्कृतीतील संघर्ष गेल्या १,३०० वर्षांपासून सुरू आहे. इस्लामच्या स्थापनेनंतर अरब आणि मूरिश लोकांनी पश्चिम व उत्तरेत प्राबल्य निर्माण केले. इ.स. ७३२ मध्ये फ्रान्समधील टूर्स शहरात वर्चस्व निर्माण करेपर्यंत त्यांचा हा पराक्रम सुरू होता. त्यानंतर, अकरा ते तेराव्या शतकादरम्यान मध्ययुगीन धर्मयोद्ध्यांनी इस्राईलमधील पवित्र भूमीत ख्रिश्चनांचे राज्य स्थापून तात्कालिक यश मिळविले. ओटोमन, तुर्कांनी चौदा ते सतराव्या शतकादरम्यान हे सत्तेचा लंबक पुन्हा विरुद्ध दिशेला नेत आखाती देश व बाल्कन प्रांतापर्यंत विस्तार केला. त्यांनी कॉन्स्टिटिनोपलही जिंकले तसेच व्हिएन्नाला दोनदा वेढा घातला. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ऑट्टोमन सत्ता संपुष्टात आल्यानंतर ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीने उत्तर आफ्रिका आणि आखाती देशातील बहुतांश भागांवर पाश्चात्त्यांचे नियंत्रण प्रस्थापित केले. दुसऱ्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी माघार घेण्यास सुरुवात केली. वसाहतवादी साम्राज्ये नाहीशी झाली. त्यानंतर सुरुवातीला अरब राष्ट्रवाद व नंतर इस्लामिक कट्टरतावादाचा उदय झाला.

पाश्चिमात्य देश ऊर्जेसाठी पर्शियाच्या आखातावर खूपच अवलंबून होते. त्यातून, तेलसमृद्ध असलेली मुस्लिम राष्ट्रे श्रीमंत झाली. अरब आणि इस्राईलदरम्यान अनेक युद्धे झाली. फ्रान्सनेही १९५० मध्ये अल्जेरियात निर्दयीपणे युद्ध केले. ब्रिटिश आणि फ्रेंच फौजांनी १९५६ मध्ये इजिप्तवर आक्रमण केले. अमेरिकी फौजाही १९५८मध्ये लेबॅनॉनमध्ये घुसल्या. त्यानंतर, अमेरिकेने लीबियावरही हल्ला केला. इराणविरुद्धही लष्करी कारवाई केली. आखातातील किमान तीन देशांच्या पाठिंब्यावर अरब व इस्लामिक दहशतवाद्यांनी आपली शस्त्रे परजली. पाश्चिमात्य देशांच्या विमानावर बॉम्बहल्ला करून पाश्चिमात्यांना ओलिस ठेवले. अमेरिकेने काही अरब देशांना इतरांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी पर्शियन आखातात मोठ्या प्रमाणावर लष्कर पाठविले. त्यानंतर, १९९० मध्ये अमेरिका व अरब देशांतील युद्धाला पूर्णविराम मिळाला.

युद्धामागचे हेतू

त्यानंतरच्या काळात ‘नाटो’नेही अस्थिरता व संभाव्य धोके लक्षात घेऊन नियोजन केले. खरे तर पाश्चिमात्य देश व अरब देशांच्या एकमेकांविरुद्धच्या लष्करी कारवाया कमी होण्याची शक्यता नाही. उलट त्या अधिकाधिक तीव्र होऊ शकतात. हटिंग्टन अभ्यासू होते. अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धचे युद्ध सुरू झाले. त्याअंतर्गत अफगाणिस्तानात २००१ मध्ये व नंतर २००३ मध्ये इराकमध्ये कारवाई करण्यात आली. त्यामागे पाश्चिमात्यांची प्रेरणा होती, तसेच सोशल मीडियाच्या मदतीने आखाती देशात ‘अरब स्प्रिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीची पार्श्वभूमीही होती. ट्युनिशिया, लीबिया, इजिप्त, येमेन आणि सीरिया आदी देशांत ही क्रांती झाली. त्यात काही देशांतील व्यवस्था बदलली तर काही देश यादवी युद्धाच्या दलदलीत उतरले. या युद्धातून ते अद्याप सावरलेले नाहीत. मोरोक्को, इराक, अल्जिरिया, लेबॅनॉन, जॉर्डन, कुवेत, ओमान आणि सुदानमध्ये आंदोलकांच्या रस्त्यावरील निदर्शनांनी सत्ताधीशांना अक्षरश: हादरवून टाकले. लोकांना आपापल्या देशातील राजवटी उलथून टाकायच्या होत्या.

ऑटोमन साम्राज्याच्या लयानंतर पश्चिम आशियातील जणू गोठलेल्या परिस्थितीच्या पुनर्रचनेला पाश्चात्त्यांनी हात घातला. शिया पंथाचा विस्तार आणि इराणमध्ये त्यांचे बस्तान बसणे हा त्याचा एक आनुषंगिक परिणाम होता. शियापंथीयांचे बाहुल्य असलेले क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये लेबनॉन, सीरिया,इराक व येमेन हे देश होते. हेजबोल्ला, हमास, हौथी व दक्षिण इराकी बंडखोर या सर्व गटांचे मूळ केंद्र इराण हे होते. पश्चिम आशियातील आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी इराणला या परिस्थितीचा फायदा होतो. निश्चितच फायदा होतो. ‘आयआरजीसी’चे दिवंगत कमांडर कासीम सुलेमानी यांनी या भागात मोठे नेटवर्क उभारले आणि इराणचा प्रभाव कितीतरी पटींनी वाढवला.

आज हाच शियाबहुल इराणला अमेरिकी महासत्तेच्या दृष्टीने सुरक्षेचे आव्हान म्हणून गणला जातो आहे. शी जिन पिंग यांचा चीन आणि इराण हे जागतिक अमेरिकी प्रभुत्वाला शह देऊ पाहणारे म्हणून समोर आले आहेत. या वास्तवाचा विचार केला तर वीस वर्षे तालिबानींविरुद्ध लढूनही त्याच लोकांच्या हातात अफगाणिस्तान सोपविण्यास अमेरिका तयार का झाली,याचा उलगडा होतो. तालिबान ही प्रामुख्याने सुन्नींची संघटना आहे. अफगाणिस्तानातील माघारीच्या निमित्ताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे निकामी करण्यात आल्याचा दावा अमेरिका करीत असली तरी अनेक संरक्षणतज्ज्ञ त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. एकूणच पश्चिम आशियातील शियांचे आणि विशेषतः इराणचे वाढते वर्चस्व कमी करण्यासाठी, त्या शियाप्रभावाला शह देण्यासाठी संतुलक बल म्हणून अमेरका तालिबानींकडे पाहात आहे. अफगाणिस्तानातील या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत व इतर देशांचे स्थान आणि भूमिका काय असेल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रृहद इस्लामी शक्ती आणि कोणाचाच मूलाहिजा न बाळगत वाढत चाललेली कन्फ्युशियस शक्ती यांच्या संघर्षाच्या कात्रीत सापडण्याची वेळ आलेल्या देशांना आता आपले ‘सांस्कृतिक भागीदार’ कोण असू शकतील, हे पाहावे लागेल. ॲन्ग्लो सॅक्सन संस्कृतीचे पीठ असलेल्या ‘व्हॅटिकन सिटी’ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भेटीचा अन्वयार्थ या घडामोडींवर नजर टाकल्यास लक्षात येतो. क्वाडमधील सहभाग ही त्याचीच परिणती आहे. ‘क्वाड-२’ची रचना सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहिली तर हा मुद्दा आणखी स्पष्ट होईल. अमेरिका (ॲन्ग्लो सॅक्सन), इस्राईल (यहुदी), भारत (संघ परिवाराच्या दृष्टिकोनातून हिंदू) आणि शिया व सुन्नी या दोघांच्या वर्चस्वाची धास्ती असलेला संयुक्त अरब आमिराती यांनी हा क्वाड गट बनलेला आहे. जगात घडत असलेल्या या ध्रुवीकरणाच्या आणि त्यात अंतर्भूत असलेल्या संघर्षांत नवे सत्तासंतुलन साकारण्यासाठी हटिंग्टन यांच्या सिद्धांतच योग्य आणि उपयुक्त ठरतो का, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

(लेखक काँग्रेसचे नेते व खासदार आहेत.)

(अनुवाद : मयूर जितकर)

loading image
go to top