esakal | राज आणि नीती : माओवादाकडून ‘मनी’वादाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Chin

राज आणि नीती : माओवादाकडून ‘मनी’वादाकडे

sakal_logo
By
मनीष तिवारी

भारतीय धोरणकर्त्यांसमोरील सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल, तर ते चीनची २१ व्या शतकातील वर्तणूक आणि प्रेरणा यांचे आकलन करून घेण्याचे. मोठे स्थित्यंतर घडवून आणताना या देशाने, तेथील कम्युनिस्ट पक्षाने जनसामान्यांचा पाठिंबा गमावला नाही, याचे मर्म समजून घ्यायला हवे.

यंदाच्या जुलै महिन्यात काँग्रेस आणि माझ्या नात्याला चार दशके पूर्ण झाली, तशी पाहता काँग्रेसची स्थापना ही १८८५ मध्ये झाली. पण माझ्या पक्षातील कामाचा श्रीगणेशा हा १९८१ पासून ‘नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’तून (एनएसयूआय) झाला. अगदी तळागाळामध्ये काम करणाऱ्या राजकीय पक्षाचे तत्त्वज्ञान आणि त्याची संघटनात्मक ठेवण याचे मला फार पूर्वीपासूनच आकर्षण वाटत आले आहे. पुढे नव्वदच्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा (आययूएस) अध्यक्ष झाल्यानंतर ही उत्सुकता आणखीनच वाढली. ‘आययूएस’ ही पॅराग्वे येथील संघटना होती. जगभरातील १२२ देशांतील १५५ संघटनांची ती प्रतिनिधित्व करते. अगदी त्या वेळेपासून चीनमधील कम्युनिस्ट पक्षाविषयी उत्सुकता वाटत असे. किंबहुना त्या पक्षाचे एक प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे. सध्या जगभरात चिनी कम्युनिस्ट पक्षाची चर्चा असून प्रत्येकजण या पक्षाकडे उत्सुकतेने पाहतो आहे.

एक जुलै रोजी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण झाली. इतिहासाचे अनेक अभ्यासक या पक्षाची स्थापना २३ जुलै १९२९ रोजी झाल्याचा दावा करतात. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या जन्माचा काळ हा १८३९ ते १९३९ असा मानला जातो. याच काळामध्ये चीनची जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर नाचक्की होत होती. अनेक बड्या देशांच्या दृष्टीने चीन हे तेव्हा अत्यंत मागास असे राष्ट्र होते. या देशांनी तसे करारदेखील चीनवर लादले होते. कधी काळी फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या शांघायमध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाची सदस्य असणाऱ्या काही मोजक्या मंडळींची बैठक पार पडली होती. त्या बैठकीला माओ झेडुंग हे देखील उपस्थित होते. माओंनी पुढे ४४ वर्षे चिनी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व केले. या चर्चेत तत्कालीन सोव्हिएत सरकारचा पाठिंबा असणारे दोन परकी कोमिसारदेखील सहभागी झाले होते. जगभरामध्ये होत असलेल्या कम्युनिझमच्या प्रसाराला हातभार लावणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. या मंडळींच्या गोपनीय खलबतांमधून चिनी कम्युनिस्ट पक्षाचा जन्म झाला. आजमितीस हा पक्ष केवळ चीनमधील सत्ताधारी पक्ष नसून त्याची जनमानसावर पोलादी पकड आहे.

२६ डिसेंबर १९९१ साली सोव्हिएत महासंघाचा डोलारा कोसळला. यानंतर जगात सध्या अस्तित्वात असलेले चीनचे अर्थ- राजकीय प्रारूप (मॉडेल) हे एकमेव मानावे लागेल. चीनमधील साधारपणे १९२० चा काळ लक्षात घेतला तर प्रत्येकाला स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेण्यात अभिमान वाटत असे. चिनी कम्युनिस्ट पक्ष एखाद्या वणव्यासारखा देशभर विस्तारला, त्याने वाटेत येणाऱ्या प्रत्येक विरोधकाचा सोयीने खात्मा करून टाकला. कधीकाळी राष्ट्रीय फौजांशी चिवटपणे झुंज दिल्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी सैन्याशीही त्याने झुंज दिली. चिनी कम्युनिस्टांनी १९४९मध्ये मजबूत अशी कम्युनिस्ट देशांची बांधणी केली. हे डावे राष्ट्र काही दिवसच टिकेल, असा अंदाज तेव्हा काही अभ्यासकांनी व्यक्त केला होता. चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि रेड आर्मीवर दीर्घकाळ माओंची सत्ता होती.

असा जन्मला राष्ट्रवाद

४ मे १९१९पासून सुरू झालेला संघर्ष चीनला एक वेगळी कलाटणी देणारा ठरला. पहिल्या महायुद्धाच्या काळात पाश्चात्त्य शक्तींनी चिनी वसाहतींना जर्मनीच्या ताब्यातून चीनकडे सोपविले. याच काळामध्ये चीनमध्ये पाश्चात्त्यविरोधी राष्ट्रवादाला उकळी फुटली. वैभवशाली चीनच्या निर्मितीचे स्वप्न खऱ्या अर्थाने याच काळामध्ये लोकांच्या मनात रुजले. चिनी राष्ट्रवाद आणि मार्क्सवादालादेखील याच काळात मजबूत असा पाया तयार झाला. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या यशामागचे खरे कारण हे बदलाच्या वाऱ्यांचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या सामर्थ्यामध्ये आहे. चीन नवे बदल करताना कधीही आपल्या विचारधारेशी तडजोड करत नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाने कडवट अशा क्रांतिकारी सैन्याची उभारणी केली यामुळे देशात पक्षाचे नेतृत्व मजबूत तर राहिलेच; पण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय कटकारस्थानांचा देखील त्यांना समर्थपणे मुकाबला करता आला.

ग्रेट लिप फॉरवर्ड (१९५८ ते १९६२) आणि सांस्कृतिक क्रांती (१९६६-१९७६) ही दोनच उदाहरणे पाहा. या काळात केवळ कुपोषणामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. सांस्कृतिक क्रांतीच्या काळामध्ये कथित भांडवलशाही समर्थक आणि चिनी नेतृत्वाला विरोध करणाऱ्यांना मार्गातून हटविण्यात आले. या काळामध्ये चिनी रेड गार्ड्‌सनी अनेक विचारवंतांचे निर्दयीपणे खून केले. या काळामध्ये वीस लाखांपेक्षाही अधिक लोकांना प्राण गमवावे लागले होते. माओंचे १९७६ मध्ये निधन झाल्यानंतर चीनमध्ये अराजकसदृश स्थिती होती. माओंच्या काळामध्ये चीनमध्ये अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या;पण कम्युनिस्ट पक्षाची देशावर मजबूत पकड कायम राहिली. तिआनमेन चौकात १९८९मध्ये झालेल्या आंदोलनाने चिनी जनमानस अक्षरशः ढवळून निघाले होते; पण त्यामुळे लोकांची चिनी कम्युनिस्ट पक्षाप्रती असणारी कटिबद्धता मात्र तसूभरदेखील ढळली नाही. चीनने पक्षाची विचारधारा जनमानसात घट्टपणे रुजविली. पक्ष आणि देशाचे अर्थकारण यांचे चिनी महायंत्र विनाव्यत्यय धडधडत असते. चीनचा प्रवास हा माओवादापासून निरंकुश भांडवलशाहीच्या दिशेने झालेला दिसतो. पुढे डेंग आणि त्यांच्या वारसदारांनी साडेतीन दशकांच्या काळात त्याला अधिक संघटित रूप दिले. हे स्थित्यंतर म्हणजे मोठे आव्हान होते, पण ते त्या देशाने पेलले. आर्थिक समृद्धी वाढली, की एकाधिकाराची पोलादी पकड ढिली होऊ लागते, लोकशाहीचे वारे खेळू लागते, वगैरे समीकरणांना चीनने धक्का दिला. अद्यापतरी तसे काही झाल्याचे दिसत नाही.

शी जिनपिंग यांनी २०१२मध्ये सूत्रे स्वीकारल्यानंतर स्थित्यंतराची ,आर्थिक ताकद वाढविण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाली. या स्थित्यंतराच्या यशाचे मर्म हे पक्षाने धोरणात्मक आघाडीवर अचानकपणे घेतलेल्या यू-टर्नमध्ये दडलेले नसून, हे सगळे बदल त्यांना चिनी जनमानसात खोलवर रुजविता आले यात आहे. भारतीय धोरणकर्त्यांसमोरील सर्वांत मोठे आव्हान कोणते असेल, तर ते चीनची २१ व्या शतकातील वर्तणूक आणि प्रेरणा यांचा अभ्यास करण्याचे. आपण चिनी कम्युनिस्ट पक्ष कशापद्धतीने काम करतो हे समजून घेत नाही तोवर आपल्याला त्यांच्या नेतृत्वाबाबत, तेथील व्यवस्थेच्या चलनवलनाबद्दल काही आडाखे बांधता येणार नाहीत. भारतासारख्या देशांत पक्ष आणि सरकार या दोन पूर्णपणे भिन्न अशा संस्था आहेत. पण चीनमध्ये ते दोन्ही एकवटलेले आहेत. हा फरकही नीट समजून घ्यावा लागेल. तो तसा घेतला नाही तर चिनी वाटचालीचे रहस्य कळणे अवघड होईल. माओवादाकडून मनीवादाकडे जाताना चीनला कोणते अडथळे आले आणि ते त्यांनी कसे ओलांडले हेही नीट ध्यानात घेण्याची गरज आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर आपणही इतर देशांप्रमाणे चीनबाबतची वेगवेगळी अज्ञानजन्य मते कवटाळत राहू. पण तसे होणे देशाच्या हिताचे नाही.

(अनुवाद - गोपाळ कुलकर्णी)

loading image