
मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना अमरावती नजीक श्रीक्षेत्र रिध्दपुरात होणार
श्रीदेवेंद्रुस्वामी-येरु संवादु…!
नअस्कार : मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना अमरावती नजीक श्रीक्षेत्र रिध्दपुरात होणार, ही घोषणा ऐकून माझं मराठी मन थरारुन गेलं. याच रिद्धपुरी चक्रधरस्वामींनी महानुभाव पंथ स्थापिन्नला. लीळाचरित्र ग्रंथ रचिला. महदंबेचे धवळे येथेच रचले गेले.
मराठी भाषेचं हे जन्मस्थान मानायला हवं. त्याच भूमीवर मराठी भाषा विद्यापीठ उभे राहणार या कल्पनेने माझ्या अंगी रोमांच उभे राहिले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायलाच हवं, या हेतुने हात शिवशिवू लागले. हाती लेखणी उचलली, आणि पाहता पाहता मन पुरातन काळात, कित्येक शतकं मागे गेलं…(पक्षी : डोळा लागला! )
स्थळ : कोथरुडु. काळ : कुठलाही!
मार्च मासाचा दिनु : मुंबाग्रामी उकाड्याचे अनुमानु : तेथी श्रीस्वामीये काई लिहो पाहे : तयांसी येरु भणे : का ओ स्वामी : आपण सर्वज्ञ : आपणिकांसी काय ठावें नाही ? : राजकारणु होए : अर्थकारणु होए : समाजकारणु होए : इलेक्शनु होए : सर्वकाही वाम हस्ताचा मलु होए : काये लिहिता?:
सर्वज्ञ स्वामी हासिन्नले : आणि भणितले : या येरुसी भीतरुं रिघों न देया : कवाडे घाला : अवचटां येईल : बा येरु, तुज काही कळेनाबा : येरु भणें : स्वामी, मी पुणे विद्यापीठाचा स्नातकु होए : स्वामी भणितलें : तरीच : महाराष्ट्रदेशी विद्यापीठे अमूपु : कव्हणी काई काई विशेखु : पुणे ग्रामु अथवा मुंबई ग्रामु : नागपुरु वा संभाजीनगरु : उत्तरु महाराष्ट्रु वेगळेची : मुक्त विद्यापीठु आणखी येर : इये विद्यापीठांचे वातुळ पीठी : शिक्षणाचे दळणु दळिले जाए : म्हणौनी स्वपक्ष विद्यापीठु त्याज्य : स्वग्राम विद्यापीठु त्याज्य : मुक्त विद्यापीठु ते विशेषत: त्याज्य : येरु संभ्रमे भंजाळिला : भणितला : विद्यापीठांचे आवारु : तेथ युवा येरु येरी यांचा संचारु : अगणित प्राध्यापकांचा पगारु : बारमाही होए : विद्यापीठांचे अंगणी : कव्हण उपाशी जाए? : आम्ही एकनाथपंथी होए : आम्हासी काय विद्यापीठांचे देणेदेणे ? : सर्वज्ञ भणितले : बा येरु, तुवा काही कळेना : विद्यापीठांच्या गर्दरानी : येक हवी संजीवनी : त्यायोगे ही भूमी : पवित्र होए : ऐसे वदोनी सर्वज्ञें : कागुदावरी रेघा काढिली : भणितले : येरु, एथ मराठी भाखा विद्यापीठ बांधिजे : जेणे ही रिद्धपुरी : होई मऱ्हाटी भाखेची ओवरी : येरुने पुशिलें : स्वामीये रेखा तर काढिली : मऱ्हाटी भाखा विद्यापीठाची घोषणा जाहली : पण याभीतुरी मेख आहे जी : सर्वज्ञ भणितले : मेख काह्याची? : येरु भणितला : विद्यापीठाचे प्रयोजन झाले : परंतु, नामांतराची सोय काय होए? एणेप्रमाणे देवेंद्रस्वामी- येरु संवादु संतोखे पार पडिला :
…जाग आली तेव्हा मराठी भाषा विद्यापीठाच्या नावासाठी शोधाशोध सुरु झाल्याचं कळलं! म्हटलं, चला, आणखी एक सोय झाली!!
कठीण शब्दांचे अर्थ : श्री देवेंद्रुस्वामी – ओळखा बरं?, येरु – येरुच!, भणितले – म्हटले, भीतरु : आतले. विशेखु : विशेषु, मेख- लोच्या, नामांतराची सोय – चळवळीला स्कोप याअर्थी (मराठी विद्यापीठाच्या नामकरणातच नामांतर चळवळीची बीजे पेरुन ठेवली तर भविष्यात सोपे जाईल, या अर्थी हा प्रश्न आहे. येरु पुणे विद्यापीठाचा स्नातक आहे, हे वर आले आहेच! असो. )