प्रयत्ने पाण्यातील तेलही मिळे!

Representational Image
Representational Image

समुद्रात सांडलेले तेल परत मिळविण्यासाठी झालेले ताजे संशोधन अत्यंत उपयुक्त आहे. शोधण्यात आलेली नवी पद्धत वापरण्यास सोपी आणि पर्यावरणपूरक आहे, हे विशेष. 

पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीचा प्रश्‍न ज्वलंत बनला आहे. एकीकडे सर्वजण हे तेलसाठे मर्यादित आहेत, याविषयी सावध करतात. त्याचा बेसुमार वापर हा प्रश्‍न आहे. पर्यायी ऊर्जास्रोतांचा वापर करून हे इंधन काटकसरीने कसे वापरता येईल, याविषयीदेखील शास्त्रज्ञ- अभियंते कार्यरत आहेत. तेल व्यवसायावरचे आणखी एक संकट म्हणजे समुद्र- नदीच्या पृष्ठभागावर तेल सांडणे. याचे प्रमाण इतके मोठे असते, की फार मोठ्या पृष्ठभागावर लाखो बॅरल तेलाचा मैलोन्‌ मैल थर पसरतो आणि त्यामुळे संकटमालिकाच सुरू होते.

व्हेल्स, डॉल्फीन, सीओटरसारखे अनेक जलचर मरण पावतात आणि वाचलेच, तर भेसळयुक्त अन्न खाऊन मृत्युमुखी पडतात. छोटी कासवेही वाचत नाहीत. या सांडलेल्या तेलामुळे वातावरणाचे आणि किनाऱ्यावरच्या माणसांचे मोठे नुकसान होते. तेल पाण्यावर तरंगत असल्याने पाण्यावर आढळणारे समुद्र पक्ष्यांचे थवेच्या थवे नामशेष झालेले आढळतात. अशा प्रकारचे अपघात टाळण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी प्रत्यक्ष अपघातानंतरची परिमाणकारक उपाययोजना करणे एवढेच हाती उरते. यात प्राधान्य आहे तीन गोष्टींना. एक म्हणजे तेलाचा प्रवाह किनाऱ्यापर्यंत येऊ न देणे. प्राणिजीवनावर होणारे वाईट परिणाम कमीत कमी कसे होतील हे पाहणे. वाया गेलेले तेल परत मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि गमावलेल्या तेलाचे विघटन करून त्याचे वाईट परिणाम कमीत कमी होतील असे पाहणे. साहजिकच या संकटांचा सामना करण्यासाठी कोणत्याही एका पद्धतीचा वापर न करता, एकात्मिक व्यवस्थापनाची गरज आहे. या पद्धतीत यांत्रिकी, रासायनिक आणि जीवशास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो.

समुद्रातील तेल किनाऱ्यावर येऊ नये म्हणून तरंगणारे यांत्रिक अडथळे किंवा कुंपणाचा वापर केला जातो. समुद्र प्रवाह आणि वाऱ्याची दिशा याचा अभ्यास करून तेल प्रवाह किनाऱ्यापासून दूर थोपवता येतो. Dispersant या वर्गातली रसायने पायसकारी (Emulsifiers) आणि द्रावकांची मिश्रणे असतात आणि ती विमानातून किंवा बोटीतून फवारली जातात. त्यांचे मुख्य काम म्हणजे तेलाच्या थराचे छोट्या छोट्या (100 मायक्रॉन) द्रवबिंदूत रूपांतर करणे. जीवजंतूच त्याचे विघटन करतात.

समुद्रात दूरवर सांडलेत्या तेलाला आग लावून जाळून टाकणे योग्य ठरते. कित्येक वेळा स्थिर सागरात यंत्रसामग्री वापरून थोडे फार तेल परत मिळवता येते. या सर्व पद्धतींत काहीना काही तोटे आहेत. काहींत तेल परत मिळवता येत नाही, काहींत वनस्पती आणि मानवी हानी होते, काहींचा उपयोग स्थिर समुद्रातच करता येतो. त्यामुळेच शास्त्रज्ञ स्वस्त आणि परिणामकारक पद्धतीच्या शोधात असतात. मात्र, या सगळ्या पद्धतींपेक्षा तेल परत मिळवण्याचा चांगला मार्ग म्हणजे Sorbents म्हणजेच शोषके वापरणे. नैसर्गिक शेवाळी, व्हर्मिक्‍युलेट अगर विशिष्ट चिकणमाती यांच्या वापराशिवाय प्लॅस्टिकचे धागे, फळ्या वापरून तेल शोषणाची प्रक्रिया पार पाडता येते. मात्र त्यांची शोषणक्षमता कमी असल्याने वापर सीमितच होता. ही शोषके तेल शोषून घेतात; पण ती हाताळायला ठिसूळ असतात. 

या सर्व शोषकांमध्ये अत्यंत उपयुक्त व स्वस्त पद्धत शोधून काढलीय डॉ. के. सुरेशन या भारतीय शास्त्रज्ञाच्या चमूने. शोषक वर्गातली रसायने गेल्या काही वर्षांपासून वापरली जात आहेत; पण समान फवारणीसाठी ती गरम द्रावकातून वापरावी लागतात, त्यामुळे त्यांची परिणामकारकता सीमित होते. या भारतीय पद्धतीत त्यांनी जिलेटर शोषके सेल्युलोज लगद्याबरोबर वापरायचे ठरवले. यात तो लगदा आणि मॅनिटाल हे साखर गटातील रसायन यांच्या मिश्रणाचे हाइड्रोफोबिक गोळे तयार केले. ते पाणी व तेलाच्या मिश्रणात टाकले. थोड्याच वेळात त्यांनी फक्त तेल शोषून घेतले व ते सेल्युलोजपासून वेगळे झाले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या विशिष्ट अणुरचनेमुळे त्यांचे तेलयुक्त घन (जेल) पदार्थात रूपांतर होऊन ते पाण्यावर तरंगू लागले. ते गोळे पाण्यातून काढून घेऊन त्यापासून तेल परत मिळवले गेले. मुख्य म्हणजे गोळ्यांच्या वजनाच्या 16पट तेल त्यात शोषले गेले आणि त्यातील 100 टक्के तेल परत मिळवता आले.

दोन्ही घटक पदार्थ स्वस्त असल्याने ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरणे शक्‍य होईल. ते पर्यावरणास हानी पोचवणार नाहीत. याचा वापर सार्वत्रिक व्हावा, याकरिता आतापर्यंत बॉम्बे हाय, सौदी अरेबिया, रावा, सहारा, नायजेरिया, अबुधाबी आणि कुवैत येथे सापडणाऱ्या कच्च्या तेलावर याचे प्रयोग करण्यात आले. या तेलांचे गुणधर्म जरी वेगवेगळे असले, तरी या शोषकांचा उपयोग करून 100 टक्के तेल परत मिळवता आले आणि तेही तेल असलेल्या गोळ्यावर फक्त दाब देऊन. या शोधाला आता जागतिक मान्यता मिळाली आहे, असे त्यावरून म्हणता येते. तौलनिक अभ्यास करता उपलब्ध असलेत्या सर्व शोषकांपेक्षा या पद्धतीत तेल जास्त (16 पट) शोषले गेले आणि ते सोप्या पद्धतीने परतही मिळवता आले. सारांश, डॉ. सुरेशन (IISER तिरुवअनंतपुरम) यांनी शोधलेली नवीन शोषक पद्धत स्वस्त, वापरण्यास सोपी, पर्यावरणपूरक आणि सर्व शास्त्रीय कसोट्यांना उतरलेली असल्याने जगात कुठेही वापरता येईल अशी आहे. सध्या त्यांचे प्रयोग हे मोठ्या प्रमाणावर तेल परतावा कसा मिळेल, यावर चालू असून त्यानंतर सिद्ध झालेले तंत्रज्ञान लवकरच सर्वत्र वापरले जाऊ शकेल. आणखी एका दृष्टिकोनातून या शोधाचे महत्त्व आहे. मूलभूत व उपयोजित संशोधनाच्या काल्पनिक विरोधाभासाने सर्वांना संभ्रमित केले आहे. डॉ. सुरेशन यांचे हे संशोधन हे त्याबाबतीत मार्गदर्शक आहे. उच्च दर्जाच्या मूलभूत संशोधनावरच उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा पाया रचला जातो, या मूलभूत सिद्धांताचेच हे फलित आहे हे लक्षात घेऊन, हा विरोधाभास नाहीसा करण्यासाठी शास्त्रज्ञ कटिबद्ध होतील, अशी आशा आहे. अर्थात, हे संशोधन तेल समुद्रावर पसरून वाया गेल्यानंतरचे आहे. 'वेळेत घातलेला एक टाका पुढचे दहा वाचवतो', या उक्तीप्रमाणे नंतरच्या उपाययोजनेपेक्षा, असे तेल वाया जाऊ नये, या दृष्टिकोनातून नैसर्गिक आणि मानवनिर्मित अपघात टाळता येण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे जास्त शहाणपणाचे ठरेल. 


(लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com