मर्म : नक्राश्रू; पण कोणाचे?

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य कारण हे उत्तर प्रदेशातील प्रचारात मायावती यांनी मोदी राजवटीत दलितांवर झालेल्या अत्याचारांचा मांडलेला मुद्दा हेच आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य कारण हे उत्तर प्रदेशातील प्रचारात मायावती यांनी मोदी राजवटीत दलितांवर झालेल्या अत्याचारांचा मांडलेला मुद्दा हेच आहे.

अलवार येथे 26 एप्रिल रोजी ही बलात्काराची घटना घडली आणि त्या महिलेच्या पतीने 30 एप्रिल रोजी पोलिसांत तक्रारही नोंदवली. मात्र, राजस्थानातील मतदान 29 एप्रिल आणि सहा मे या टप्प्यांत पार पडल्यानंतरच त्यासंबंधातील "एफआयआर' नोंदवण्यात आला, याचा अर्थ स्पष्ट आहे. राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने मतदान पार पडेतो, ही दुर्दैवी, पण भीषण घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. गेहलोत यांच्या सरकारला "बसप'च्या सहा आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मायावती यांनी या मुद्यावरून सरकारचा पाठिंबा काढून का घेतला नाही, असा प्रश्‍न मोदी यांनी उपस्थित करून "आता मायावती या दलितांवरील अत्याचारांबाबत ढाळत असलेले अश्रू हे "नक्राश्रू' आहेत,' अशी टीका केली. 

मोदी यांनी नेमक्‍या उत्तर प्रदेशातील प्रचारातच हा मुद्दा काढण्यामागे अर्थातच राजकारण आहे; कारण तेथे मायावती यांची दलित मतपेढी आहे. त्यानंतर मायावती गप्प राहणे शक्‍यच नव्हते. त्यांनी मोदी यांच्या गेल्या पाच वर्षांच्या राजवटीत दलितांवर कसे अत्याचार झाले, याचा पाढा तर वाचलाच; शिवाय गुजरातेत उना येथे दलितांना कशी अमानुष मारहाण झाली, याचीही आठवण करून दिली. अर्थात, हेही राजकारणच आहे.

राजस्थानातील मतदान होईपर्यंत गेहलोत सरकारने अलवारमधील घटनेबाबत "एफआयआर' न नोंदवण्यामागेही राजकारणच होते. यावरून घ्यायचा तो बोध इतकाच की सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते विचार करते ते राजकीय हितसंबंध लक्षात घेऊनच. मायावती दलितांच्या नावाने नक्राश्रू ढाळत असतील, तर उना प्रकरणानंतर मौन बाळगलेल्या मोदी यांना दलितांबद्दल कणव दाटून येते, ती ही घटना कॉंग्रेसच्या राज्यात घडली, म्हणूनच. त्यामुळे नक्राश्रू नेमके कोण ढाळत आहे, हा प्रश्‍न असला, तरी दलितांचा वापर सारेच राजकारणी आपल्या सोयीनुसार करून घेत असतात, हेच खरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marma article in sakal on Loksabha Election 2019