तारांगणाचे अंतरंग! 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 26 February 2019

लॉस एंजलिसच्या भव्य डॉल्बी सभागारात उतरलेल्या तारकादळांच्या गर्दीसमोर यंदाचा "ऑस्कर'चा सोहळा नेहमीच्या दिमाखात पार पडला. दर वर्षी हा सोहळा ह्या ना त्या कारणाने गाजतोच.
 

लॉस एंजलिसच्या भव्य डॉल्बी सभागारात उतरलेल्या तारकादळांच्या गर्दीसमोर यंदाचा "ऑस्कर'चा सोहळा नेहमीच्या दिमाखात पार पडला. दर वर्षी हा सोहळा ह्या ना त्या कारणाने गाजतोच.

कधी तो एखाद्या पुरस्कार विजेत्याच्या तडकफडक भाषणाने गाजतो, तर कधी सूत्रधाराच्या आचरट विनोदी वक्‍तव्यांनी. कधी सोहळ्यात वर्णविद्वेष, निर्वासितांचे प्रश्‍न, राजकीय मल्लिनाथी अशा गोष्टींचे प्रतिबिंब पडते, तर कधी चक्‍क चुकीच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार दिला जाऊन गोंधळ उडतो. यंदा असे काही घडले नाही. कारण ह्या 91 व्या ऑस्कर सोहळ्याला मुळी सूत्रधारच नव्हता. पुरस्कार देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांनीच आपापल्या वाट्याचे काम करून सूत्रधार अनावश्‍यक असतो, हेच जणू दाखवून दिले. रसिकांनी अपेक्षिलेल्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले हे खरे; पण काही पुरस्कारांच्या घोषणांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. 

रुख बलसारा नामक, भारतीय वंशाचा, पण झांझिबारला जन्मलेला एक तरुण रॉक संगीताचे नवे व्याकरण रचत जातो आणि फ्रेडी मर्क्‍युरी ह्या मंचनामाने सारा संगीताचा माहौल एकहाती बदलून टाकतो, त्याची हृदय हेलावणारी कहाणी "बोहेमियन ऱ्हॅप्सडी' या नितांतसुंदर चित्रपटाने चार पुरस्कार पटकावले. फ्रेडी मर्क्‍युरीची मध्यवर्ती भूमिका साकारणारा रॅमी मलिक सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.

"ग्रीन बुक' ह्या चित्रपटाने तीन पुरस्कार पटकावले. हा चित्रपटही साठीच्या दशकातला एक विख्यात जॅझ पियानोवादक आणि संगीतकार डॉन शर्ली आणि त्याचा इटालियन ड्रायव्हर-कम-बॉडीगार्ड टोनी व्हालेगोंगा ह्यांच्या नात्यातील व्यामिश्रता दाखवतो. कृष्णवर्णीय डॉन शर्ली साकारणाऱ्या मेहर्शला अलीने सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. "नेटफ्लिक्‍स'च्या गाजलेल्या "रोमा' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषिक चित्रपटाचा पुरस्कार मिळवलाच; पण त्याचे दिग्दर्शक अल्फोन्सो क्‍युरॉन सर्वोत्तम दिग्दर्शक ठरले. शिवाय त्यांनी छायालेखनाचाही पुरस्कार पटकावला. अर्थात, हे चित्रपट बाजी मारणार असे वाटत होते, तथापि अन्य चित्रपटही तोडीस तोड, किंबहुना आशयाच्या दृष्टीने उजवेच होते. उदाहरणार्थ, "ब्लॅकक्‍लान्समन' हा चित्रपट कृष्णवर्णीयांची घरे जाळणाऱ्या अतिरेकी संघटनेची पाळेमुळे खणून काढणाऱ्या एका कृष्णवर्णीय डिटेक्‍टिवची कहाणी सांगतो. नामवंत दिग्दर्शक स्पाइक लीच्या ह्या अप्रतीम गुन्हेपटाची आशयघनता खूपच उजवी होती, पण त्याऐवजी "ग्रीनबुक'ला झुकते माप मिळाले. त्याचा राग ली ह्याने तिथल्या तिथे व्यक्‍त करून सोहळ्याला पाठ दाखवली. "द फेवरिट' ह्या 18व्या शतकातील महाराणी ऍन हिची विक्षिप्त कहाणी सांगणाऱ्या "द फेवरिट"मधील भूमिकेसाठी विख्यात अभिनेत्री ऑलिव्हिया कोलमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने अभिजात चित्रपटांची बूज राखली गेली. 

नेटफ्लिक्‍स'सारख्या "ओव्हर द टॉप' (ओटीपी) प्लॅटफॉर्म्स आणि इंटरनेटच्या महाजालामुळे ऑस्कर विजेत्या चित्रपटांचा खजिना आता घरबसल्या उपलब्ध आहे. जणू अवघे तारांगण एका रिमोट कंट्रोलनिशी आता रसिकांच्या घरातच अवतरते. त्याचे अंतरंग मात्र हॉलिवूडला दर वर्षी होणाऱ्या अशा ऑस्कर सोहळ्यात असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marma Article In Sakal On Oscar